बाजार समितीच्या कारभाराची चौकशी   

पणन संचालकांचे आदेश

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या अनेक निर्णयांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. तशा तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यानुसार आता सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणार आहे. राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी यासाठी अधिकृत आदेश काढले आहेत. विशेषत: ५१ मुद्द्यांची तपासणी केली जाणार आहे. सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
या चौकशीत निविदा प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, भाडे व नोटरी करार, इंधन पंप व्यवहार, प्रशासकीय निर्णय, मालमत्ता वापर, बांधकामे व कर्मचारी नेमणुका अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. ती संबंधित कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे. बाजार समितीच्या कामकाजावर सातत्याने तक्रारी येत होत्या. काही निर्णय नियमबाह्य असल्याचे आरोप झाले होते. विविध संस्था, संघटनांनी पणन संचालकांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची चौकशी अधिकार्‍यापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
या चौकशीत मालमत्तेचा वापर, उत्पन्न-खर्चातील तफावत, पारदर्शकता, कंत्राटी कामकाज आणि कर्मचार्‍यांच्या नेमणुकीतील प्रक्रिया तपासली जाणार आहे. चौकशीच्या आदेशामुळे समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे. सध्याच्या संचालक मंडळावरही या चौकशीचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related Articles