इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण   

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा या अंतरळ संशोधन संस्थांना भेटी देण्याची संधी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ३ टप्प्यांत होणार्‍या चाचणी परीक्षांचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यांत परीक्षेला १६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तब्बल १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
 
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्याचा उद्देश आहे. पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिक शास्त्र केंद्र (आयुका) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सहावी ते आठवी इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. ही परीक्षा पुर्णपणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
 
यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विज्ञान संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. दुसरी चाचणी पुढील आठवड्यात शनिवार  १९ जुलैला घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४१ केंद्रावर पहिली चाचणी शनिवारी (५ जुलै) ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यातून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट १० टक्के विद्यार्थ्यांची निवड दुसर्‍या परीक्षेसाठी (चाचणी) होणार आहे. दुसरी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तिसर्‍या टप्प्यांत आयुकामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Related Articles