विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर   

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील हिंगणे खुर्द येथील विठ्ठलवाडी मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. मुखी विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा-माउली-तुकारामचा जयघोषाने परिसर दूमदूमन गेला होता. प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्राचीन मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण, दिंड्या, कीर्तन आणि भजनांचा गजर सुरु होता. 
 
श्री विठुनामाच्या गजराने शहरातील विठ्ठल मंदिर परिसर दुमदुमला. शहर परिसरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. ज्ञानोबा-माउली-तुकारामचा जयघोष घुमणार आहे. पहाटे महापूजा, अभिषेक, काकड आरती, दिवसभर धार्मिक कार्यक्रम दिवसभर शहरातील विविध मंदिरात दिसून आला. ठिकठिकाणी खिचडी वाटप करण्यात आली. साबूदाणा खिचडी, राजगिरा लाडू, साबूदाणा वडा या प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच तुळशींचे रोपे वाटप करण्यात आले.
 
अवघी पंढरी आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन गेली. त्याचेच प्रतिबिंब पुण्यातही दिसून आले. भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिर, नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर, टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासह (विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द) शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्या दिसून आले. तसेच आषाढी एकादशीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
 
भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक, महापूजा आणि काकड आरती झाली. सकाळपासून खिचडी वाटप करण्यात येणार आहे. भजन, हरिपाठासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिराच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले. पहाटे महापूजा, अभिषेक आणि काकड आरती झाली. महिला भजन मंडळाचा भजन तर ते सात वाजेपर्यंत दया कुलकर्णी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
 
श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणेच्या आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महापूजा, महाआरती झाल्यानंतर भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली. यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच मंदिराच्या संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये आरोग्य शिबिर पार पडले. विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भक्तिसंगीताचा कार्यक्रम अनुजा पंडित यांनी सादर केला.

Related Articles