बँकांच्या नफ्यात मोठी घसरण   

वृत्तवेध 

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात मोठी घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ‘एनआयआय’ मध्ये म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्नातही मंदी आल्याचे दिसून येत आहे. यामुळे बँकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.मार्च २०२५ तिमाही बँकांसाठी फारशी चांगली नव्हती. या वेळी बँकांचा एकूण नफा फक्त एका अंकाने वाढला, जो गेल्या चार वर्षांमध्ये म्हणजेच १७ तिमाहींमध्ये पहिल्यांदाच दिसून आला. खासगी क्षेत्रातील बँकांची कमकुवत कामगिरी आणि देशातील सर्वात मोठ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या नफ्यात झालेली घट ही या मंदीचे प्रमुख कारण ठरली. निव्वळ व्याज उत्पन्नात (एनआयआय) देखील फक्त एका अंकाने वाढ झाली, तर मार्जिनवर सतत दबाव होता. रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरपासून बँकिंग प्रणालीमध्ये अतिरिक्त तरलता आणण्यास सुरुवात केली असून व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.
 
२९ बँकांच्या निव्वळ नफ्यात ४.९ टक्के वाढ झाली आहे. जी ९३८२८.३ कोटी रुपये होती; परंतु या वेळी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक नफ्याच्या बाबतीत मागे पडली. स्टेट बँकेचा निव्वळ नफा ९.९ टक्क्यांनी घसरून १८६४२.६ कोटी रुपये झाला. या नमुन्यात स्टेट बँकेचा वाटा वीस टक्के होता. स्टेट बँकेच्या कामगिरीचा एकूण आकडेवारीवर किती परिणाम होतो हे यातून दिसते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितपणे १३ टक्के वाढ नोंदवली आहे. जी ४८४०३ कोटी रुपये होती; परंतु ही वाढ गेल्या ११ तिमाहींमधील सर्वात कमी होती.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली असेल; परंतु खासगी बँकांची कामगिरी वाईट होती. खासगी क्षेत्रातील बँकांचा एकूण नफा २.५ टक्क्यांनी घसरून ४५४२४.९ कोटी रुपये झाला. गेल्या १३ तिमाहींमध्ये खासगी बँकांच्या नफ्यात घट झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण नफ्यात त्यांचा वाटा ५२.१ टक्क्यांवरून ४८.४ टक्क्यांपर्यंत घसरला. तो गेल्या आठ तिमाहींमधील सर्वात कमी आहे. बँकांच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (एनआयआय) देखील मंदी दिसून आली. या तिमाहीमध्ये ‘एनआयआय’ फक्त ३.७ टक्के वाढून २.१ लाख कोटी रुपये झाला, जी गेल्या १४ तिमाहींमधील सर्वात कमी वाढ होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ‘एनआयआय’मध्ये फक्त २.४ टक्के वाढ नोंदवली गेली, तर खासगी क्षेत्रातील बँकांनी ५.३ टक्के वाढ दर्शवली. हे आकडे बँकांच्या अडचणी स्पष्टपणे दर्शवतात. निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) अनेक तिमाहींपासून दबावाखाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेपो दरात घट होऊनही बँकांनी ठेवींचे दर कमी करण्यास उशीर केला. मार्च २०२५ च्या तिमाहीमध्ये २९ पैकी १९ बँकांनी वार्षिक आधारावर त्यांच्या ‘एनआयएम’ मध्ये घट नोंदवली. ही परिस्थिती बँकांसाठी चिंतेचा विषय आहे.

Related Articles