माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात   

माउलींच्या जयघोषात अश्वाने पूर्ण केल्या तीन फेर्‍या

सोलापूर, (प्रतिनिधी) : माउली माउलीच्या जयघोषात वेळापूर-पंढरपूर मार्गावरील ठाकूरबुवा यांच्या समाधी मंदिराजवळ नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी अनुभवला.
वेळापूरचा मुक्काम बुधवारी आटोपून गुरुवारी सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी ६ वाजता पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी  निघाला. हा सोहळा उघडेवाडी हद्दीत ठाकूरबुवा समाधी मंदिर येथे ८ वा. पोहोचला. यानंतर ८ वा.५ मिनिटांनी पालखी रथातून उचलून संपूर्ण रिंगणाला गोल नगरप्रदक्षिणा झाली. यानंतर ८ वाजून १५ मिनिटांनी पालखी रिंगण सोहळ्याच्या मध्यभागी ठेवण्यात आली. पालखीला वीणेकरी, पताकाधारी, तुलशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिलांनी गोल कडे केले. यानंतर ८ वाजून २४ मिनिटांनी जरीच्या पताकाधार्‍यांनी पाच फेर्‍या पूर्ण केल्या. यानंतर पालखी सोहळा प्रमुख व चोपदार यांनी रिंगण ८ वाजून २८ मिनिटांनी लावले. माउलींच्या अश्वानी तीन फेर्‍या पाऊण मिनिटात पूर्ण केल्या. यानंतर भक्तांनी टाळ्यांच्या गजरात माऊली माऊली गजर एकच केला.
 
यावेळी भाविकांनी अश्वाच्या टापाखालची माती मस्तकी लावण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. वारकर्‍यांनी ९ वाजून २५ मिनिटांनी पारंपरिक उडीचा, फुगडी, पावल्या, काटवट आदी खेळ सादर केले. हा गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी अनुभवला. या सोहळ्यानंतर पालखी ९ वाजून ३९ मिनिटांनी ठाकूरबुवा समाधी मंदिर पूजा आरती होऊन पालखी १० वाजता पुन्हा रथामध्ये  ठेवण्यात आली. यानंतर पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी तर टप्पा येथील माऊली व सोपानदेव यांच्या भेटी होऊन पंढरपूरच्या दिशेने भंडीशेगाव मुक्कामी मार्गस्थ झाला.  या सोहळ्यासाठी वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी भाऊसाहेब गोसावी व पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 

Related Articles