हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला   

माळीनगरला तुकोबारायांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण   

सूर्यकांत आसबे 

सोलापूर  : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण बुधवारी सकाळी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत माळीनगर येथे पार पडले. संतश्रेष्ठ जगद‍्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी अकलूज येथील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी माळीनगरमध्ये पोहोचली. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण डोळ्यात साठवण्यासाठी लाखो वैष्णव माळीनगरीत जमले होते. माळीनगर व परिसरातील हजारो विठ्ठल भक्तांनी गर्दी केली होती. दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व ग्रामपंचायत माळीनगर, तसेच समस्त माळीनगरवासीयांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 
 
मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर वारकर्‍यांच्या विसाव्याची तयारी करण्यात आली होती, तसेच घरोघरी वारकर्‍यांना प्रसाद, भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हरिनामाच्या गजराने माळीनगर दुमदुमून गेले होते. डी सासवड माळी साखर कारखान्याच्या वतीने पाच हजार वारकर्‍यांना मिष्टान्नाची व्यवस्था केली. महात्मा फुले पतसंस्थेच्यावतीने सुद्धा वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी सोहळा दुपारी पुढील विसाव्यासाठी माळीनगरकरांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाला. 
 

Related Articles