शिक्षणाचा प्रवासच चुकीच्या दिशेने...   

ऐसपैस शिक्षण, संदीप वाकचौरे

शिक्षणाचे क्षेत्र सतत विविध कारणांनी चर्चेत आहे. प्राथमिक स्तरावर तिसर्‍या भाषेच्या आणि विशेषता हिंदी विषयाच्या सक्तीचा विषय चर्चेला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर वाद उभा राहिला आहे. सांगली जिल्ह्यातील एका मुलीस नीटच्या परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून पालकांनी तिला ठार मारले. एकीकडे अध्ययनाचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्नांची भाषा होते आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पालकांच्या अपेक्षांचे ओझे पेलवत नाही. पालकांच्या मनात मार्कांच्या पलीकडे शिक्षणाचा विचार नाही. पालकांना शिक्षणाची उद्दिष्टे साध्य नाही झाली तरी चालतील मात्र पैकीच्या पैकी मार्क त्यांना हवे आहेत. त्यातून विद्यार्थ्याला माणूस म्हणून शिक्षणातून घडवायचे आहे का ? विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे का ? त्या वाटा चालायच्या असतील, तर किती आणि कोणते प्रयत्न केले जातात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होते आहे. ही स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. त्याचवेळी एकीकडे अभ्यासक्रम बदलतो आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत बदल घडून आणण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. सरकारी पातळीवर देखील त्यासंदर्भाने पावले पडत आहेत. हे सारे प्रयत्न होताना विद्यार्थ्यांना समग्र विकासाचा मार्ग सापडण्याची गरज आहे. आज शिक्षणाच्या नावावर जे काही थोपवले जाते आहे आणि जे काही वाईट घडते आहे, ते शिक्षणाचे फलित नाही. शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने घडवला जात आहे. तो प्रवास घडवताना मूलभूत शिक्षणाचा विचार केंद्रस्थानी नाही, तर त्यात काहींचेच हित सामावलेले आहे. स्वहिताकरीता शिक्षणाचा प्रवास चुकीच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. त्यातून शिक्षण बदनाम होते आहे. 
 
भविष्य अंधारमय
 
शिक्षण आणि नोकरीचा जोडलेला संबंध, विशिष्ट माध्यमात, विशिष्ट शाखेत, विशिष्ट अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यावर आवश्यक असलेले पॅकेजची अपेक्षा आणि प्रतिष्ठा यांचे नाते जोडले जाते आहे. शिक्षण घेतल्यावर भौतिक सुखाची उंचावलेली अपेक्षा. स्वविकास, आत्मिक विकास, प्रेमाचे नात्याची घट्ट वीण करणे, माणूस म्हणून स्वतःचा विकास करणे. विवेक आणि शहाणपणाची वाट चालणे याचा विचार शिकलेली माणसं करताना दिसत नाही. शिक्षणातून समग्र विकासासाठी पावले पडत नाही. त्या दिशेने प्रवास करावा असेही त्यांना वाटत नाही. आज हा मार्क केंद्रित शिक्षणाचा प्रवास आपल्याला कदाचित पॅकेज मिळवून देईल, मात्र भविष्यात जीवनात आनंद मिळून देईलच असे नाही. या विचारधारेमुळे आपण उद्याचे समाजाचे भविष्य अंधारमय करत आहोत. शिक्षण म्हणजे केवळ वर्तमानाचा विचार नाही, तर भविष्याची पेरणी आहे हे सतत लक्षात ठेवायला हवे. अन्यथा आजची वाट चुकली तर उद्याचा प्रवास अधिक अडचणीचा ठरणार आहे.
 
उद्यासाठीचे शिक्षण हे नेहमीच परीवर्तनशील असावे असे म्हटले जाते, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात असतो. शिक्षणाची धोरणे केवळ तात्पुरत्या स्वरूपातील मलमपट्टीसाठी करण्यासाठी नाहीत. शिक्षण हे समाज, राष्ट्र आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणाचा मंत्र म्हणून पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी बदल हा अपरिहार्य असतो. सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात आणि अध्यापनातील सुधारणांचा मुख्य भर दिला जात असतो. अलीकडे शिक्षणाच्या संदर्भाने समज वाढवण्याच्या आणि कसे शिकायचे ते शिकण्यावर, सध्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या पाठांतर संस्कृतीच्या शिक्षणापासून शिक्षण व्यवस्थेला दूर नेणे यांवर काम करण्याची गरज आहे. आपण जे शिकतो ते केवळ शब्दांची माळ असेल, तो केवळ शब्दांचा फुलोरा असणार असेल तर त्यातून शिक्षण हाती लागण्याची शक्यता नाही. शिक्षणाचा मूलभूत अर्थ खोलवर जाऊन जाणता येण्यासाठी आकलनाची गरज आहे. त्यामुळे शिकविणारा आणि शिकणारा हे दोन्ही घटक पाठांतर प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन शिकण्याची गरज आहे. 
 
मूलभूत विकास हवा
 
शिक्षणाचे उद्दिष्ट आकलनात्मक विकास करणे आहेच, मात्र त्याचवेळी विद्यार्थ्यांचे चांगले व्यक्तिमत्त्व घडवणे,एकविसाव्या शतकातील प्रमुख कौशल्ये आत्मसात केलेला विद्यार्थी घडवणे. अशा समग्र विकासाच्या बरोबर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हेदेखील आहे. विश्वातील ज्ञानाचा विचार केला तर ज्ञान हा एक अथांग खजिना आहे. शिक्षण हे एखाद्या व्यक्तीमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या परिपूर्णतेच्या रूपात ज्ञानाची अभिव्यक्ती होण्यास मदत करते. ही महत्त्वाची उद्दिष्टे गाठण्यासाठी अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्राचे सर्व पैलू पुनर्दिशाभिमुख आणि सुधारित करण्याची भूमिका यापूर्वी देखील अनेक धोरणात नमूद केली आहे. पूर्वप्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत शिकण्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकात्मीकरण आणि समावेशन करण्यासाठी विविध क्षेत्रांमधील विशिष्ट कौशल्ये, मूल्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्या मूल्यांचा विचार शिक्षणाच्या केंद्रस्थानी असायला हवा. त्यातून आपली संस्कृती आणि समाजाचे व्यवहार घडत असतात. समाजाची प्रगती म्हणजे केवळ भौतिक नाही तर त्यापलीकडे असलेल्या मूलभूत विकासाची अपेक्षा आहे. शिक्षणातून माणूस घडवायचा असेल तर त्यासाठी पावलांची वाट बदलण्याची गरज आहे. शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या रंजक प्रक्रियांद्वारे ही कौशल्ये आणि मूल्ये आत्मसात करणे अपेक्षित आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा आणि व्यवहार पद्धती विकसित करण्याची भूमिका प्रतिपादन केली जात आहे. शिक्षणाच्या बदलांच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर अभिलेखे, अहवाल येत आहेत, प्रशिक्षणे होत आहेत, मात्र त्याचा खरंच किती परिणाम साधला जातो याचाही विचार करण्याची गरज आहे. शिक्षणातील परिवर्तन हे केवळ धोरणे आखून साध्य करता येणार नाही, त्यासाठी शिक्षणातील कार्यरत असलेल्या मनुष्यबळाच्या मानसिक परिवर्तनासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न काही प्रमाणात निश्चित होत आहेत, मात्र त्या प्रयत्नाचे परिवर्तनाचे फलित फारसे हाती लागत नाही.
     
मुळात आपण वर्तमानात केवळ आशय, माहितीवर भर देतो. त्यातून माहितीचे वहन होते. माहिती असल्यामुळे आकलनात्मक शिकणे मागे पडते आणि पाठांतरावर भर दिला जातो. आपल्याला शिक्षण प्रक्रियेत खरोखर बदल करायचा असेल, शिक्षण तणावमुक्त करायचे असेल, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवे. त्या दृष्टीने गेली अनेक दशके सातत्याने बोलले जाते की, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करा. प्रो. यशपाल यांनी दिलेल्या अहवालाचा विचार करण्यात आलेला आहे मात्र त्याची अंमलबजावणीत्मक दृष्टिकोन विकसित करण्यात आपल्या व्यवस्थेला फारसे यश आले नाही.
 
शिक्षकांची मानसिकता
 
शिक्षणाचा संदर्भ केवळ माहितीशी जोडूनच प्रवास केला जात आहे. त्यासाठी  शिकवल्या जाणार्‍या आशयातील मजकूर कमी करण्याची गरज आहे. तसे घडले तर पाठांतरापासून सुटका होण्याची शक्यता आहे. अभ्यासक्रमातील मजकूर कमी करून प्रत्येक विषयातील अत्यावश्यक घटक राखले जातील.  चिकित्सक विचार, प्रश्नाधारित, संवाद आधारित आणि विश्लेषण आधारित शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाण्याची गरज आहे. मुळात हा विचार वर्गातील आंतरक्रियेशी संबंधित आहे. त्यासाठी शिक्षकांची मानसिकता किती बदलते हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत अनिवार्य मजकूर म्हणजे प्रमुख संकल्पनेचा विचार आहे. त्यासाठी कल्पनाशक्ती, उपयोजन आणि समस्या सोडवणे यावर लक्ष केंद्रित केले जाणे महत्त्वाचे आहे. शिकवणे आणि शिकणे अधिक परस्परसंवादी पद्धतीने केले जाईल. प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन दिले जाईल. अधिक सखोल आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी, वर्गातील सत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक मजेदार, सर्जनशील, सहयोगात्मक आणि शोधक उपक्रमांचा नियमितपणे समावेश असेल अशी अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोऱणात देखील व्यक्त केली आहे. 
 
आनंददायी शिक्षण
 
मुळात या वाटा शिक्षण तणावमुक्त करण्याच्या आहेत. शिक्षण तणावमुक्त झाले तर ते आनंददायी आणि अधिक सृजनशील होण्याची शक्यता आहे. आज घडणार्‍या आत्महत्या, तणावातून घडणार्‍या वाईट घटनांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. शिक्षण आनंददायी केले गेले तर शिक्षणातून सध्या समस्या निर्माण होता आहेत त्यावर मात करणे शक्य आहे. मात्र केवळ अभ्यासक्रम बदलून साध्य होईलच असे नाही. त्यासाठी वर्गातील आंतरक्रिया बदलाची गरज आहे, पण त्या बरोबर आपल्या मूल्यमापनातील विचारही बदलाच्या दिशेने जाण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला मार्कांपासून दूर जात अधिक समृद्ध अनुभवात्मक शिक्षणाची गरज आहे. सर्व स्तरांवर, अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब करणे. प्रत्येक विषयामध्ये मानक अध्यापन म्हणून प्रात्यक्षिक शिक्षण, कला आणि खेळ यांचा समावेश असलेले शिक्षण, कथाकथन आधारित अध्यापन इत्यादींसह वेगवेगळ्या विषयांमधील संबंध शोधणार्‍या समावेशाची गरज आहे. शैक्षणिक निष्पत्तींमध्ये आढळून येणारी तफावत दूर करण्यासाठी वर्गातील व्यवहार कार्यक्षमतेवर आधारित अध्ययनाची आवश्यकता आहे. मूल्यांकन साधनेदेखील शिकण्याच्या रूपात’, ’शिक्षणाचे मूल्यांकन’, ’शिक्षणासाठी मूल्यांकनांची आवश्यकता आहे आणि गेले काही वर्ष हा विचार सातत्याने पुढे येतो आहे. त्या दिशेने काम घडण्याची आवश्यकता आहे. मुळात आपली शिक्षण धोरणे, अभ्यासक्रम सर्वच गोष्टी या अत्यंत आदर्शवादाच्या पाऊलवाटा तुडवणार्‍या आहेत. मात्र वास्तव त्यापासून दूर आहे याची जाणीव सातत्याने होत जाते. त्यामुळे आदर्श, वास्तव यांचा मेळ घालण्याची गरज आहे. 
 
राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठीचे विषय निवडण्यासाठी जास्त लवचिकता आणि निवडीला वाव देण्याची अपेक्षा आहे. यामागे विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास अपेक्षित आहे. विद्यार्थ्याच्या आत जे दडले आहे ते बाहेर काढणे अपेक्षित आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि अगदी उच्च माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षण, कला, हस्तकला आणि व्यावसायिक कौशल्यांचा अंतर्भाव असण्याची गरज आहे. मुळात या विषयाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाची प्रक्रिया घडण्यास मदत होत असते. आज आपल्याकडे मार्क केंद्रित असलेल्या व्यवस्थेमुळे शारीरिक शिक्षण,कला यांसारखे विषय मागे पडले आहेत. या विषयांवर काम करावे असे शाळांना वाटत नाही याचे कारण त्यांच्यावर पैकीच्या पैकी मार्कांसाठी पालकांचा दबाव आहे. यासारख्या समग्र विकासाच्या दृष्टीने असलेल्या विषय योजनेचा गंभीरपणे विचार केला, तर विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचे आणि जीवन योजनेचे मार्ग स्वतः ठरवू शकतात. शिक्षणात त्याला काही ठरू देण्याची गरज आहे. वर्तमानात विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी शिक्षणासंबंधीचा समग्र विचार पालकच करू लागले आहेत. पाल्याला सातत्याने गृहीत धरले जात आहेत. त्यातूनच शिक्षणात गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एकात्मिक विकास आणि विषयांच्या तसेच अभ्यासक्रमाच्या निवडीला दरवर्षी संधी देणे हे माध्यमिक शाळांतील शिक्षणाचे खास वैशिष्ट्य असेल. अभ्यासक्रम, अभ्यासक्रमेतर किंवा सह-अभ्यासक्रम यामध्ये गणित, मानव्यशास्त्रे आणि विज्ञान यामध्ये ’व्यावसायिक’ किंवा ’शैक्षणिक’ शाखांमध्ये कोणतेही स्पष्ट विभाजन नसेल, विज्ञान, मानव्यशास्त्रे, गणित यांच्याबरोबरीने शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला ही व्यावसायिक कौशल्ये असलेले विषय शाळेच्या अभ्यासक्रमात सर्व वर्षांमध्ये समाविष्ट केलेले असतील. यामध्ये प्रत्येक वयोगटासाठी रंजक आणि सुरक्षितता यांचा विचार केलेला असेल असेही धोरणात नमूद केले आहे. मात्र धोरणाप्रमाणे सखोल चिंतनात्मक भूमिकेतून कार्यवाही करण्याची गरज आहेच.
 

Related Articles