दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता पण आम्ही पलटवार करु   

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मोहम्मद शमीचे ट्विट

 
नवी दिल्ली : काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. आस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले. भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून एकही सामना गमावला नसल्याने भारतीय चाहत्यांना अंतिम फेरीतील विजयाबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. यानंतर भारतीय संघासह कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले. भारतीय संघातील खेळाडू देखील स्वप्न भंगल्याने निराश झालेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात सामना पाहण्यासाठी दाखल झाले होते. सामन्यानंतर त्यांनी खेळाडूंची भेट घेतली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा यांनी यांनी या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत.
 

मोहम्मद शमीचे ट्विट

 
मोहम्मद शमी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. दुर्दैवाने कालचा दिवस आमचा नव्हता. मी सर्व भारतीयांचे आमच्या टीमला संपूर्ण स्पर्धेत पाठिंबा देण्यासाठी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील विशेष आभार त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये येत आम्हाला बळ दिले असून आम्ही पुन्हा पलटवार करु, असे मोहम्मद शमीने म्हटले.
 

रवींद्र जडेजाकडून फोटो पोस्ट

 
रवींद्र जडेजाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला पण आम्ही काल कमी पडलो. आमचे  स्वप्न भंगले पण लोकांचा पाठिंबा कायम आहे. नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये भेट देत खेळाडूंना प्रेरणा दिली, असे जडेजा म्हणाला.
 
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत १० सामने जिंकले. मात्र, अखेरच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने केलेल्या सांघिक कामगिरीपुढे विजयाची मालिका कायम ठेवता आली नाही. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून पराभूत करत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. 
 

Related Articles