राष्ट्रपती 30 नोव्हेंबर रोजी पुणे दौर्‍यावर   

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबर रोजी पुण्यात येणार आहेत. येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. लष्कराच्या या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.
 
यंदा ‘एनडीए’च्या 145व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राष्ट्रपती मुर्मू संचलन सोहळ्यात उपस्थित राहून कॅडेट्सच्या वतीने मानवंदना स्वीकारतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये या प्रबोधिनीची 75 वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने ‘एनडीए’च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या प्रशिक्षण संस्थेने आजवर तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्याबरोबरच मित्र देशातील प्रशिक्षणार्थ्यांना देखील लष्करी प्रशिक्षण दिले आहे. दरम्यान, येथील वैद्यकीय प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘एएफएमसी’ने देखील आपल्या स्थापनेचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम पार पडले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी ‘एएफएमसी’ला ‘प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘एएफएमसी’मध्ये एक डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 

Related Articles