लिहिता, वाचता न येणार्‍यांसाठी तुकोबा-ज्ञानोबांनी साहित्य निर्मिती केली : डॉ. राजा दीक्षित   

पिंपरी : कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला असा पूर्वी वाद व्हायचा. मात्र साहित्य-कला हे आपल्या जीवनासाठीच असते. ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांसाठी त्या काळात तुकोबा- ज्ञानोबा यांनी साहित्यनिर्मिती करून ठेवली. आज परकीय भाषा-संस्कृतीचे आक्रमण होत आहे. अशा जागतिकीकरणापासून वाचण्यासाठी आपण आपली संस्कृती, साहित्य, भाषा जपणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी मोशी येथे व्यक्त केले.
 
मोशी येथील इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसर्‍या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, साहित्यिक डॉ सागर देशपांडे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, मावळते अध्यक्ष अरुण बोर्‍हाडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, सल्लागार संतोष बारणे आदी उपस्थित होते.
 
यावेळी अरुण बोर्‍हाडे संकलित कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील अग्रलेखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधक संदीप तापकीर लिखित रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : (कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्यिक दादा गावडे यांना प्रज्ञावंत पुरस्कार, तर जेजुरीच्या मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील सत्ता आणि सत्ताधारी यांच्यासाठी पथ्य हा केवळ लेख नसून हा एक प्रकारचा आजच्या राजकारण्यांसाठी आरसा आहे. मात्र आज खरं बोलण्यापेक्षा बरं बोलावं लागते, ही शोकांतिका आहे. राजकीय कलगीतुरा किंवा मसालेदारपणा असेल, तर त्याला समाजात जास्त प्रसिद्धी मिळते. पण मसालेदार हे कसदारच नसते. साहित्य समाजाचा आरसाच आहे. साहित्यिकांनी साहित्यातून समाजाला आरसा दाखवला पाहिजे. साहित्यातून बरेवाईट दोन्ही प्रतिबिंब दाखवली पाहिजेत. साहित्य गंगा लहानशा डबक्यापर्यंत न थांबता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली पाहिजे. यामुळे संस्कृती, संस्काराचा ठेवा जपता येईल. त्यातून भविष्यात राष्ट्रनिर्मिती होईल.
 
अध्यक्षीय भाषणामध्ये सोपान खुडे म्हणाले, मानवाला केंद्रबिंदू मानून साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. जातधर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण साहित्यामध्ये त्याला स्थान दिले पाहिजे. मानवतेचे दर्शन होणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून माणूस उभा केला पाहिजे. यासाठी विचारांची पेरणी केली पाहिजे. विचार पेरा माणसे उगवतील. जगाच्या पाठीवर माणूस म्हणूनच ओळख निर्माण झाली पाहिजे.
 

Related Articles