ब्रह्मचैतन्य   

विलास सूर्यकांत अत्रे

मो. 9850978450
 
सवयीप्रमाणे सकाळचे आवरून झाले आणि फिरायला निघालो. फिरायला निघताना नेहमीचाच मनातला वाद, आज कुठे जायचे. मला सकाळी उठून फिरायला जायला खूप आवडते. पण एकाच ठरावीक रस्त्याने फिरणे चाकोरीबद्ध वाटते. म्हणून मी दररोज त्याच रस्त्यावरून फिरत नाही. नवीन रस्ता शोधत निघतो. असे तीनचार फिरण्याचे माझे मार्ग निश्चित झाले आहेत. चाकोरीबद्ध नको नको म्हणताना चाकोरी मात्र सुटलेली नाही. ती मलाच काय कुणाला तरी चुकली आहे का?
मी कधी घरातून पायी  निघतो आणि लांबवर चक्कर मारून येतो. कधी स्कूटर काढतो बागेपाशी लावतो आणि डी.पी. रस्त्याच्या या टोकापासून निघतो ते त्या टोकापर्यंत, आणि परत माघारी. वाटेत रस्त्यावर लावलेले जीम मधील दोनतीन प्रकाराचे व्यायाम करून, कधी मोकळ्या मैदानावर स्कुटर लावून मैदाना भोवती चाललेले खेळ पहात त्या मैदानाला प्रदक्षिणा घालतो. प्रत्येक रस्त्यावर दिसणारा निसर्ग, भेटणारी माणसे ही वेगवेगळी नसतातही आणि असतातही. घरून पायी निघायचे ठरविले तर मानसिक ताण तणावाचे ओझ्या सोबत स्कुटरच्या किल्लीचे ओझे बाजूला ठेऊन मी घरा बाहेर पडतो. रस्ता नेहमीचाच, पंधरा मिनिटांवर वळण, तसेच पुढे. पहिल्या वळणावरच्या कोपर्‍यावर दोन तीन शाळा आहेत. तिथे दुचाकीवर माझ्या मागची पिढी, ती ही ड्रायव्हिंग सीट वर आणि तिच्या किँवा त्याच्या मागे तिची किंवा त्याची मुलगी किंवा मुलगा. नव्या नात्याने माझी नातवंडाची पिढी. सगळेच ताजेतवाने, टवटवीत, अगदी सकाळी सकाळी उमलणार्‍या मोगरीच्या फुलाप्रमाणे. क्षणभर माझे मन त्या शाळेत जाते, वर्गात बसते, माझ्या मित्रांना भेटते, माझे बालपण या वळणार नेहमी भेटते. आणि घंटा झाल्यावर शाळा सुटावी तसे नवे वळण आल्यावर मी शाळा सुटल्याच्या आनंदात स्वैरभैर होतो, ओरडतो नाचतो, मनातल्या मनात. आणि नव्या वळणावर वळतो नी क्षणात मी तरुण  होतो नेहमीसारखा. पुढच्या वळणावर वळतो.
 
या रस्त्यावर एक तीन मजली इमारत आहे. तारेचे कंपाउंड, आत अंगण आणि त्यामागे ती इमारत उभी आहे. अंगणात सोनचाफा, आंबा, अशोकाची झाडे आहेत. तळ मजल्यावर निम्या भागात पार्किंग, आणि उरलेल्या भागात एक हॉल आहे. कितीतरी वर्षे झाली, तिथून जाताना माझे त्या हॉलच्या दाराकडे लक्ष गेले दार लोखंडाचे आहे, त्याच्या वरच्या भागात आत लाईट चालू असतील तर आतील दिसू शकेल अशी जाळी आहे. दारावर पाटी आहे ’ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ’. हॉल चांगला लांब रुंद आहे. आणि दरवाजाच्या समोरच्या भिंतीवर गोंदवलेकर महाराजांच्या फोटोची तसबीर.अगदी रस्त्यावरून त्यांचे दर्शन स्पष्ट होईल अशी मोठी. तसबीरीला मोत्याच्या माळा घातलेल्या, तसबीरीच्या वर दिवा. अगदी पहिल्या भेटीत मी रस्त्यावर उभा राहून महाराजांचे दर्शन घेतले नमस्कार केला आणि पुढे माझी पदयात्रा सुरू केली. 
 
मी नास्तिक नाही,अजिबात नाही. पण माझा कर्मकांडावर विश्वास नाही. माझा देवावर विश्वास आहे. तो विश्वव्यापी आहे त्याला कुणी राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्तगुरु म्हणा, भगवान शंकर म्हणा किंवा त्याला अनाम म्हणा. नावात काय ठेवले आहे असे शेक्सपिअरनेच कशाला म्हणायला हवे.
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
सगुण निर्गुंण दोन्ही गोविंदू रे
असे शेक्सपिअरच्या आधी माऊलींनी म्हणून ठेवले आहे. त्यातही गोविंद हा उल्लेख असला तरी माऊलींच्या नजरेने तो देव आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, खरेतर तो अनाम आहे.
 
विश्वात अनेक शक्ती आहेत. त्यातल्या काहीचे ज्ञान माणसाला झाले आहे. त्या शक्तींना जाणणारा न्यूटन त्यानेच सांगून ठेवले आहे की, शक्ती निर्माण करता येत नाहीत किंवा नष्ट करता येत नाहीत. एका शक्तीचे रूपांतर दुसर्‍या शक्तीमधे होते. न्यूटनने मन:शक्ती, अध्यात्म शक्ती, नामाची शक्ती अश्या अनेक  अनाकलनीय शक्तींचा, त्याच्या शास्त्रात न बसल्यामुळे विचार केला नसावा. पण या शक्तीच. त्यांनाही नच आदी नच अंत हाच नियम लागू  होईल. 
मी देखल्या देवाला दंडवत घालणारा माणूस नाही. माझी जी काही श्रद्धास्थाने मग ते देऊळ असो, मठ असो, की आश्रम. मी तिथे जातो, नतमस्तक होतो, डोळे मिटून स्मरण करतो. या माझ्या श्रध्दास्थात तेव्हापासून हा गोंदवलेकर महाराजांचा मठ आला. त्या रस्त्याने फिरायला जाताना या मठापाशी हमखास मी थांबायला लागलो. रस्त्यावरूनच त्यांच्या तसबिरीपुढे हात जोडून, डोळे मिटून उभा राहू लागलो आणि रामरक्षेतील दोन श्लोक मनातल्या मनात म्हणून, माझ्या वाटेला लागू लागलो. ते क्षण विलक्षण शांती देऊन जातात.
 
कारण बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज?!
 
गोंदवलेकर महाराज, रामभक्त, त्यांच्यासाठी राम हा अंतर्बाह्य, सार्‍या चराचरात व्यापून राहिलेला. त्यांचे गुरू तुकाराम चैतन्य, तुकामाई नावाने सुद्धा ओळखले जातात. गुरूंनी कठोर परीक्षा घेऊन त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांनतरची गोदवलेकर महाराजांची तीव्र तपस्या. महाराजांचे मठ ठिकठिकाणी आहेत. त्यातलाच हा एक असावा. गोंदवल्याला न जाताही मला मठापाशी गेल्यावर महाराजांच्या दर्शनाचा आनंद मिळू लागला. सर्वत्र भरून राहिलेल्या रामाची जाणीव होऊ लागली आणि मग हळूहळू माझा फिरण्याचा रस्ता कोणताही असला तरी मला त्या मठाची ओढ वाटू लागली. कारण ब्रम्ह चैतन्य, म्हणजे वैश्विक शक्ती. ते ब्रह्म चैतन्य महाराजांचे हे एक शक्ती केंद्र आहे. पाय आपोआपच मठाकडे वळू लागले. माझ्या आयुष्यात त्यानंतर आपोआप एक नेम झाला. दररोज गोंदवलेकर महाराजांचे मठा जवळ जायचेच जायचे. रस्त्यावरून का होईना नित्यनेमाने दर्शन घ्यायचे. डोळे मिटून हात जोडायचे आणि रामरक्षेतील दोन श्लोक मनातल्या मनात म्हणायचे. माझ्या त्या दिवसाचा  फिरण्याच्या मार्ग त्यांचा मठावरून जात असो वा नसो, त्या वेळीं मी वाकडी वाट करून जायचो. ते शक्य नसले तर नंतर ऑफिसात जाताना किंवा भाजी आणताना  त्या मठावरून जायचो. अगदी काहीही कारण नसले तर मठात जायचेच म्हणून जायला लागलो. बहुतेकवेळा बाहेरचा दरवाजा बंदच असायचा, पण तसबीरीवरअसलेला दिवा, खाली लावलेले निरंजन यांच्या उजेडात महाराजांचे मुखकमलाचे दर्शन चांगले व्हायचे.
कधीकधी हे दिवे बंद असायचे, त्या वेळी डोळे मिटून उभा राहीलो की, त्यांचे रूप डोळ्यापुढेआणायचा प्रयत्न करायचो. आणि सर्वत्र राम भरला आहे याची कल्पना करायचो.
 
कधीतरी मी मठापाशी जायचो तेंव्हा पूजा किंवा आरती सुरू असायाची, आणि पूजा करणारा ब्राम्हण मला आरतीला हाक मारायचा. आरती झाली की खडीसाखरेचा प्रसाद घेऊन मी मार्गस्थ व्हायचो. हे नित्यनियमाने जाणे, दर्शन घेणे, आनंददायी क्षण, दिवसभरासाठी प्रसन्नता देत राहिले. कितीतरी वर्षे हा क्रम चालू आहे.
 
गेले काही दिवसांपासून मठाचा दरवाजा बंद आणि आत दिवाही नाही. पण त्यामुळे मला फरक पडला नाही. महाराजांचे दर्शन झाले नाही तरी हात जोडून डोळे मिटले की त्यांचे रूप डोळ्यांपुढे आणायचा प्रयत्न करायचा. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मार्गस्थ होत राहायचे. पंधरा एक दिवसांपूर्वी मठाच्या वरच्या मजल्यावरील एका सदनिकेच्या गॅलरीतील खिडक्या काढलेल्या दिसल्या. बहुधा मालकाने नूतनीकरण सुरू केले असावे. मागच्या चार सहा दिवसांपूर्वी अजून एका सदनिकेच्या गॅलरीतील खिडाक्या काढलेल्या दिसल्या, पण मनात माझ्या शंकेची पाल चुकचुकली नाही. कालही मठाच्या रस्त्यावर उभा राहिलो असताना, इमारतीमधील कुणाचाच वावर जाणवला नाही. मी घाईत असल्याने तसाच निघालो. पण मनात शंकेची पाल चुकचुकली.
 
आज फिरायला निघालो, नेहमीसारखे कोणत्या रस्त्यावर याचा मनात वाद सुरू होण्या आधीच मठाकडेच जाण्याचे निश्चित केले. मठापाशी पोचलो. मठाचा दरवाजा बंद होता. आत दिवा, निरांजन लावलेले नव्हते. तरीही नेहमीप्रमाणे हात जोडले, डोळे मिटले, महाराजांचे रूप डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला. रामरक्षेचे दोन श्लोक म्हटले, प्रसन्नतेचा अनुभव घेतला, आणि डोळे उघडले. डोळे उघडताच वेगळ्या  जाणिवा व्हायला लागल्या. इमारतीत कुणाचाच वावर नव्हता. मठाच्या दाराला आतून चादरीचा पडदा लावला होता. त्यामुळे आतील काही दिसणे शक्यच नव्हते. किती दिवस झाले असतील हा पडदा लावून? माझ्या लक्षातच आले नव्हते. इमारतीच्या अन्य सदनिकेतील गॅलर्‍यांच्या खिडक्या उतरवून ठेवल्या होत्या. थोडक्यात जुन्या इमारतीचे वर्तमान आणि भविष्य मला जाणवायला लागले होते.
 
तेव्हढ्यात इमारतीच्या गेटमधून एक माणूस आत आला. तिथे राहणारा निश्चित नव्हता. उतावीळपणे त्याला विचारले  इथं काय चाललं आहे?
आणि त्याने अपेक्षित उत्तर दिले
‘री डेव्हलपमेंटचे काम सुरू झाले आहे’
’इथे हॉलमध्ये मठ होता’ माझी चौकशी
’तो सध्या बंद केलाय’ त्याचे उत्तर
’महाराजांचा फोटो होता तो?’ माझा अस्वस्थपणा वाढत होता.
‘दुसरीकडे ठेवालाय तो’ 
‘कधी?’ 
मी ‘झाले असतील दोनतीन आठवडे’
म्हणजे गेले कित्येक दिवस, महाराज नसलेल्या रित्या खोलीला मी नमस्कार करत होतो? बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नाहीत म्हणजे राम नाही. राम गेलेल्या दागड मातीच्या  निर्जीव खोलीला मी नमस्कार करीत होतो?डोळ्याच्या कडा ओल्या होतील असे वाटत होते. माझे डोळे पुन्हा आपोआप मिटले गेले आणि तेव्हढ्यात समोरच्या माणसाने मठाच्या दारावर थापा टाकत मोठ्या आवाजात हाका मारायला सुरुवात केली  रामाऽऽ ए रामाऽऽ आहेस ना रे तू  आणि आतून आवाज आला आलो. 
 
दोन्ही आवाज ऐकले आणि क्षणात माझे डोळे खाडकन उघडले गेले. सर्व विश्वात राम भरून राहिलेला आहे. हे मी कसे विसरलो? मठात भले महाराजांची तसबीर नसेल पण विश्वाला व्यापून राहणारे चैतन्य तिथे नाही असे कसे होईल? विश्वचैतन्य असलेल्या ब्रह्मांडनायक गोंदवलेकर महाराजांना मला तेच सांगायचे असेल का? माझ्या मनाला आलेली काजळी झटकली गेली आणि मी, महाराजांची तसबीर नसलेल्या मठाच्या दिशेने, पुन्हा हात जोडले, मनोमन नमस्कार केला आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन नेहमीसारखा आनंदाने मार्गस्थ झालो.
 

Related Articles