सजला बाजार, बहरला व्यापार   

मधुरा कुलकर्णीे  

 
दिव्यांचा सण दिवाळी. दिवाळी म्हणजे पाच वेगवेगळे अर्थपूर्ण सण. त्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या  विशेष पर्वाची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. जोरदार खरेदी मोहीम ही या सणाची ठळक ओळख. त्यामुळेच सध्या बाजारपेठा फुलल्या आहेत. कसे आहे या बाजारपेठांमधले वातावरण?
दिवाळी हा पाच सणांचा आनंदोत्सव असला, तरी त्याची प्रतीक्षा सर्वांना दिवाळी देशात साजरी होत असली, तरी त्याचा व्यापार फक्त देशांच्या सीमांपुरता मर्यादित राहत नसतो.  भारतातूनही बाहेरच्या देशात राहणार्‍या परदेशस्थ भारतीयांना मोठ्या प्रमाणात फराळ रवाना होत असतो. दिवाळीच्या निमित्ताने लोक अनेकदा बाजारात जातात. तरी ऑनलाईन खरेदीला  मोठ्या शहरांबरोबर छोट्या शहरांमधून आणि ग्रामीण भागातून प्रतिसाद वाढतो आहे,यंदा दिवाळीच्या काळातील उलाढाल सुमारे एक लाख कोटी रुपयांची असेल असा अंदाज आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारांनी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यातल्या फरकाची रक्कम, दिवाळीचा  बोनस आणि वेतन दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना बोनस देता आला नाही तरी सानुग्रह अनुदान आणि आगाऊ रक्कम दिली आहे. उद्योगविश्‍वातून आठ टक्कयांपासून एक महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम बोनसदाखल दिली जात आहे. त्यामुळे संघटित क्षेत्रातील लोकांच्या हाती पैसा खुळखुळतो आहे.  त्यामुळे  दुकानांमध्ये गर्दी उसळलेली आहे. दिवाळीच्या काळात नवीन कपडे खरेदी करतात, पूजेचे साहित्य खरेदी करतात. सोने-चांदी, नवीन फर्निचर, इलेक्ट्रॉनिकचे सामान खरेदी करतात. त्यामुळे मार्केटमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते.
 
विजेच्या दिव्यांच्या समया, इलेक्ट्रॉनिक्सचे दिवे, पाण्यावर चालणारे दिवे आणि महादेवाची पिंड, शोभेचे धबधबे, भिंतीवर अडकवायच्या इलेक्ट्रॉनिक शोभेच्या वस्तू, इत्यादी गृह सजावटीच्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये 20 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.कपड्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांची ग्गर्दी वाढत  आहे. नवीन धाटणीच्या पेहरावाने, गृहसजावटीच्या साधनांनी बाजारपेठ सजली आहे. सध्या बाजारात सजावटीसाठी मातीपासून निर्मित विविध आकर्षक वस्तूंना प्रचंड मागणी आहे. मातीपासून निर्मित वस्तू, दिवे, फुले ठेवावयाचे पॉट, दारावर टांगायचे तोरण, मातीच्या शोभेच्या वस्तू आदी वस्तूंना सध्या प्रचंड मागणी आहे. तसेच टेराकोटा आणि शाडूच्या मातीपासून निर्मित लक्ष्मी देवीच्या मूर्ती पाचशे ते दोन हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
 
सरकारी कर्मचार्‍यांना चारचाकी घेता यावी, म्हणून सरकारने भरपूर कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची नोंदणी वाढणार आहे. राज्य सरकारने जुनी मोटार  खरेदी करण्यासाठी साडेसात लाख रुपयांची कर्जरक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. शंभर समान हप्त्यांमध्ये या रकमेची परतफेड करावी लागणार आहे. ही रक्कम हप्त्यांमध्ये वसूल केली जाणार आहे. ही रक्कम संबंधितांना बारा वर्षांमध्ये परत करावी लागणार आहे. दिवाळीला दिव्यांचा सण म्हणतात; पण या निमित्ताने लोक आपली घरे आणि आस्थापना केवळ रंगीबेरंगी झुंबरे आणि दिव्यांनी उजळून टाकत नाहीत, तर अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी सजवतात. या वस्तूंना दिवाळीपर्यंत मागणी असते. दिवाळीच्या निमित्ताने एकीकडे इलेक्ट्रॉनिक्सचा बाजार गजबजलेला दिसतो तर दुसरीकडे जुन्या समजुतीनुसार या दिव्यांच्या सणाला मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व असते. आजकाल इतर वस्तूंप्रमाणे डिझायनर दिव्यांनादेखील मोठी मागणी आहे. त्या किरकोळ बाजारात तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकले जात आहेत. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत गणेश लक्ष्मी, कुबेर, दुर्गा माता आणि इतर देवी-देवतांच्या मूर्तींना मागणी असते. मातीपासून किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या अशा साहित्याची या काळात मोठी उलाढाल होत असते. याशिवाय मेणबत्त्यांनाही मोठी मागणी असते. डिझायनर मेणबत्त्यांना नागरिकांची पसंती असते. नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि बुकिंगमुळे यंदाची दिवाळी वाहनांच्या बजारात  मोठ्या थाटामाटात साजरी होणार असल्याचे दिसत  आहे. नवरात्रीमध्ये काही हजार कार आणि दुचाकींचे बुकिंग झाल्याचे वाहन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यावरून लोक वाहन बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, कंपन्यांनीही नवीन ऑफर देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कार आणि बाईकचा व्यवसाय 25 टक्कयांनी वाढू शकेल, असे वाहन व्यावसायिकांचे मत आहे. सध्या  मध्यम श्रेणीच्या वाहनांना अधिक मागणी आहे, कंपन्या डाउन पेमेंटमध्ये सूट देत आहेत. 70 हजार ते एक लाख रुपये किमतीच्या दुचाकींना सर्वाधिक बुकिंग मिळाले आहे. लोकांनी पाच ते दहा लाख रुपयांच्या श्रेणीमधील गाड्या अधिक प्रमाणात ‘बुक’ केल्या आहेत. जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वित्तपुरवठा सोपा केला आहे.
गेल्या वर्षी बाईक खरेदीदारांना 15 ते 20 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवरच फायनान्स सुविधा दिली जात होती; मात्र या वेळी डाऊन पेमेंटचा आकडा केवळ सात ते आठ हजार रुपये आहे. कार शोरूम्सवर रोख सवलतीची सुविधा दिली जात आहे. या वेळी ऑटोमोबाईल क्षेत्रात एक्सचेंज ऑफरची भर पडली आहे. मोबाईल वॉलेट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. काहीजण वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास अडीच हजार रुपयांपर्यंत सूट देत आहेत तर काही ठिकाणी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास चार ते पाच हजार रुपयांपर्यंत सूट देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या वेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात अधिक तेजी आहे. नवरात्रीच्या काळात स्कूटीसह अडीच ते तीन हजार रुपयांच्या मोफत अ‍ॅक्सेसरीज देण्याची सुरू झालेली ऑफर अजूनही सुरूच आहे. लोक 60 ते 70 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत आहेत.
न सध्या व्यापारजगतातली परिस्थिती चांगली आहे. दिवाळी संपेपर्यंत व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर अडीच हजार रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत. एक्सचेंज ऑफरसह किंमतीत सवलतीही दिल्या जात आहेत. त्याच वेळी दिवाळी आणि छटपूजेमुळे विमानांच्या भाड्यात वाढ झाली आहे. याशिवाय रेल्वेगाड्यांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रवास करणार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमानात तसेच ट्रेन आणि बसमध्ये जागा नाही. भेटवस्तूंची उलाढालही वाढली आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या काळात पर्यटनस्थळांचे बुकिंग वाढले आहे. मोठ्या आणि अन्य शहरांमध्ये पाडव्याच्या दिवशी गृहखरेदीसाठी आधीच बुकिंग झाले आहे.
 

Related Articles