नेतन्याहू घेणार ट्रम्प यांची भेट   

हमासवरील विजयावर चर्चा 

तेल अवीव : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आगामी बैठकीत गाझा पट्टीत हमासवर विजय, इराणविरोधातील कारवाई आणि आरब देशांशी असलेले राजनैतिक संबंध यावर चर्चा करणार असल्याचे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले
 
नेतन्याहू मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांची परदेशी नेत्यासोबतची ही पहिलीच भेट असेल. अमेरिका आणि अरब यांनी गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांची सुटका करण्यासाठीच्या चर्चेत मध्यस्थी केली. आजपासून (सोमवार) युद्धविराम कराराच्या पुढील टप्प्यावर सहमत होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यात युद्धविराम लागू झाल्यानंतर गाझा पट्टीवर पुन्हा ताबा मिळवणारा अतिरेकी गट हमासने युद्ध संपल्यानंतर आणि इस्रायल सैन्याच्या पूर्ण माघारीनंतरच ओलिसांना दुसर्‍या टप्प्यात सोडले जाईल, असे म्हटले आहे. मार्चच्या सुरुवातीला युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्यानंतर या युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर नेतन्याहू यांनी आपला दबाव कायम राहण्यासाठी पुन्हा युद्ध सुरू करण्याचा इशारा दिला होता, तसेच सर्व ओलीसांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले होते. 
 
इस्रायल-हमास युद्धाबाबत ट्रम्प यांची भूमिका काय आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पण ते इस्रायलचे कट्टर समर्थक आहेत, परंतु त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याचे आश्वासन दिले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारात मध्यस्थी करण्यास आणि गाझामध्ये मदत करण्याचे श्रेय देखील ट्रम्प यांनी घेतले आहे. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या पश्चिम आशियातील शांततेच्या आवाहनाचे समर्थन केले आहे. रविवारी वॉशिंग्टनला रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात नेतन्याहू यांनी इराणने हमास आणि मध्यपूर्वेतील इतर अतिरेकी गटांना दिलेल्या पाठिंब्याचा संदर्भ देत म्हटले, की हमासवरील विजयावर आणि इस्रायलच्या सर्व ओलीसांची सुटका करण्यासाठी आम्ही ट्रम्प यांच्या पाठीशी उभे आहोत. इराण-समर्थित दहशतवादी संघटनांचा नाश करण्यासाठी आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. आम्ही एकत्रीत काम करून सुरक्षा मजबूत करू आणि जगात शांतता वाढवू, असे त्यांनी नमूद केले. 
 
हमासकडून तीन ओलिसांची सुटका 
 
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने तीन इस्रायल ओलीसांची शनिवारी सुटका केली. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडून १८३ पॅलेस्टिनी कैद्यांची आणखी एक तुकडी सोडण्यात येणार आहे. १९ जानेवारीपासून युद्धविराम लागू झाल्यानंतर ही चौथी बंधकांची देवाणघेवाण आहे. ऑफर कॅल्डेरॉन आणि यार्डन बिबास, दोन्ही फ्रेंच-इस्रायल नागरिक, खान युनिसच्या दक्षिण गाझा शहरात मारले गेलेले हमास नेते याह्या सिनवार यांच्या घरासमोर रेड क्रॉसकडे सुपूर्द करण्यात आले. आयडीएफने याला दुजोरा दिला आहे.  

Related Articles