अमेरिकेचे तीन देशांबरोबर व्यापार युद्ध   

कॅनडा, मेक्सिकोसह चीनवर आयात कर लागू

पाम बीच: कॅनडा, मेक्सिको आणि चीनच्या आयात उत्पादनांवर अमेरिकेने रविवारी मोठा आयात कर लागू केला आहे. त्यामुळे या देशांत व्यापार युद्धास सुरूवात झाल्याचे मानले जात अहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्याबरोबरच आदेशावर शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. 
कॅनडा, मेक्सिको आणि चीनच्या उत्पादनांची मोठी आयात अमेरिकेत केली जाते. माल विकून तिन्ही देश श्रीमंत होत चालले असून त्याचा थेट फटका अमेरिकेच्या उद्योगांना बसत असल्याची तीव्र चिंता ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी ही बाब प्रकर्षाने मांडली होती. तसेच देशांवर मोठा आयात कर लागू करण्याचा इशारा दिला होता. एक प्रकारे तो लागू करुन त्यांनी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पाळल्याचे मानले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मोठा आयात कर लागू केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. 
 
ते म्हणाले, अमेरिकेच्या हितासाठी परदेशी उत्पादनांवरील कर आवश्यकच आहे. कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर तो आता लागू झाला आहे. या माध्यमातून मॅक्सिको आणि कॅनडातून होणारे बेकायदा स्थलांतर रोखण्यासही मदत मिळणार आहे. एकीकडे ट्रम्प यांनी कर लागू करण्याची घोषणा केली असली तरी अमेरिकेत महागाई वाढणार आहे. मात्र, त्यांनी सत्तेवर येताच किराणा माल, इंधन, गृह, वाहने आणि अन्य पदार्थांच्या किंमती कमी केल्या जातील, असे आश्वासन दिले होेते. त्याचे काय होणार ? असा प्रश्न सामान्यांंना पडू लागला आहे. या निर्णयावर कॅनडा आणि मेक्सिकोने नापसंती व्यक्त करत अमेरिकेवर कर लावण्याची घोषणा केली.
 
चीनचे जशास तसे उत्तर 
 
उत्पादनांवर मोठा आयात कर लागू केल्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केल्यामुळे चीन संतप्त झाला असून त्याने अमेरिकेच्या उत्पादनांवर कर लागू करुन जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार अमेरिकेवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. 

Related Articles