आईचा हिशेब...   

विरंगुळा , प्रा. डॉ. श्रीकांत तारे (इंदूर)

माझी आई हिशेबात नेहमी गल्लत करायची. तिच्या लहानपणी स्त्री शिक्षणाचा आग्रह नव्हता. त्यामुळे तिचे जुजबी शिक्षण झाले आणि भावंडांना सांभाळायला तिला घरी बसावे लागले. याने एक मात्र झाले, शिवणकाम, विणकाम, भरतकाम वगैरे कलांत ती तरबेज झाली. तिला जुजबी लिहिता वाचता येत असे, तिचे अक्षरही वाचनीय होते; पण कधी हिशेब करायची वेळ आली की, व्यावहारिक नसल्याने असेल कदाचित, तिच्या संवेदना नष्ट व्हायच्या. तिच्या मेंदूत गणितचा ‘ग’ ही स्थापित झाला नसावा. तिच्या लग्नानंतर माझ्या आजीने स्वयंपाकघर तिच्या हातात सोपवलं आणि तिनं या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हळूहळू हे स्वयंपाकघरच तिचं विश्व झालं. त्याकाळी हातोहात फोन नसल्यानं, सूचना न देता कुणीतरी ऐन जेवणाच्या वेळेला दत्त म्हणून उभं रहायचं; पण येणार्‍यासाठी न कंटाळता पिठलं टाकून आई भाकरीचं पीठ भिजवायला घ्यायची. अगदी वेळेवर दहा-बारा पाहुणे जरी आले तरी ती सहजच, अतिशय कमी वेळात त्यांच्या भुकेची सोय करीत असे. 
 
चुलीवर स्वयंपाक होत असे. पुढे कधी तरी घरात स्टोव्ह आला; पण त्याचा वापर चहा करणे किंवा पातेल्यातील अन्न गरम करणे इथवरच मर्यादित होता. भाकरीसाठी मात्र चुलीला पर्याय नसे. आम्ही दोन भाऊ, एक बहीण, माझा काका, आमच्या घरीच कायम वास्तव्य करून असलेला माझा आतेभाऊ आणि एखादा आला गेला अशी पाच सात मंडळी जेवायला बसायची आणि आई, रजनीकांत तोंडात बोट घालेल अशा वेगाने पोळपाटावर सर्वांसाठी भाकरी थापायची. 
 
अर्ध शतकाहून अधिक काळ लोटला; पण मला समोर शेगडीपाशी पाटावर गुडघा वर करून एका लयीत धपधप आवाज करीत भाकर्‍या थापत बसलेली आई डोळ्यासमोर स्पष्ट दिसते. अधून मधून ती पदरानं घाम पुसायची तेव्हा चुलीतील ज्वालांचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावरचं तेज अधिकच वाढवायचा आणि चुलीच्या धगीनं तेजाळली आहे आई की त्यातील लाल केशरी ज्वालांनी आईकडून तेज उसनं मागून घेतलं आहे हे जेवण आटोपेपर्यंत कळायचं नाही.
 
आम्हा भावंडांना भाकरी करून वाढताना आई हिशेबात चुकायची, हमखास चुकायची. गरम भाकरी, सोबत पिठलं, एखादी भाजी, अगदी लसणीची कोरडी चटणी असली तरी आम्ही तुटून पडायचे अन्नावर, उदरभरण अव्याहत चालू असायचं. तीन, चार, पाच... आईच्या हातची टम्म फुगलेली भाकरी पोटात शिरताच जणू स्वाहा होऊन जायची आणि एक हात पोटावर फिरवीत मी दुसरा हात पानावर आडवा ठेवायचा. का रे बेटा? झालं दोन भाकरीत? आई काळजीनं विचारायची.नाही ग आई, पाच झाल्या. मी जड पोटी म्हणायचा. 
 
हिशेब नाही ठेवता येत मला, पण बाळा मला कमी होणार्‍या पीठावरून तर अंदाज येतो ना. अजून दोनच तर झाल्या रे. ती त्याच काळजीनं म्हणायची आणि पाच झाल्या तरी ती दोनच म्हणते आहे हे ऐकून मी मनातल्या मनात हसत पानावरून उठायचा. तिला दोनच्यावर मोजताच यायचं नाही. 
‘आईचं गणित अतिशय कच्चं होतं.’
 
कालानुरूप आईला दोन सुना आणि एक जावई आले, बाबा गेल्यानंतर तिनं हळूहळू संसारातून निवृत्त व्हायचं ठरवलं आणि तसं केलंही. वाट्याला आलं तेवढं आयुष्य सुख समाधानात जगून अल्पशा आजारानं आई गेली, तेव्हा घर काही काळासाठी का होईना, ओकंबोकं झालं. तिच्या अवसानामागुनचे सोपस्कार यथासांग पार पडले आणि तिघा भावंडांच्या साक्षीनं, वडिलकीचा मान माझ्याकडे ओढवून घेत, गेल्या कित्येक वर्षांत आमच्यापैकी कुणीही हात न लावलेलं तिचं लाकडी कपाट मी उघडलं. 
 
कुलूप नव्हतंच त्या जुनाट कपाटाला, निश्चित उंचीवर आडव्या फळ्या रचून तीन खण तयार केले गेले होते. त्यापैकी खालील खणांत एकीकडे जुन्या दोन चादरी, व्यवस्थित घडी घातलेल्या काही साड्या, तर घडी न मोडलेल्या, वरील वेष्टनही न काढलेल्या आठ-दहा साड्या वरील खणांत जपून ठेवल्या होत्या. सर्वात वरच्या तिसर्‍या खणांत काही धार्मिक पुस्तकं, लहानपणी मी शाळेत नेत असलेल्या अल्युमिनियमच्या चौकट डब्यात रबर बँड लावून जमवून ठेवलेल्या काही नोटा, खूपशी सुटी नाणी. त्याच चौकट डब्यात माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला तयार केलेली सोन्याची अंगठी, महागाचे मोती जडलेल्या दोन सोनेरी कुड्या, एक गोदरेजच्या कुलुपाची किल्ली आणि... आणि डब्यात एक मुडपलेली, पाठ पोट लिहिलेली एक चिठ्ठी. 
 
त्या चिट्ठीत तिनं बँकेच्या लॉकरबद्दल माहिती लिहून ठेवली होती. त्या लॉकरमधील जिन्नस एकाखाली एक व्यवस्थित लिहून ठेवले होते. एवढंच नव्हे, तर चिट्ठी लिहिल्या दिवसाला त्या जिनसांची अंदाजे किंमतही प्रत्येक जिन्नसासमोर लिहून ठेवली होती. यामागील पानावर, मोठ्या सुनेला हे, धाकटीला ते, मुलीला अमुक रोख रक्कम, लाडक्या नातीच्या लग्नात तिला घालण्यासाठी, आईच्या आजेसासूनं आईसाठी खास कोल्हापूरहून घडवून घेतलेलं मंगळसूत्र, नातवाकरता चार वर्षापूर्वी करून ठेवलेली एफ डी आणि त्याच्या तरुणपणी या एफडीची मिळणारी संभाव्य रक्कम, राहत्या घराचा खालचा मजला माझ्या नावानं, वरील मजला धाकट्या भावाच्या नावानं, दारापुढील आंगण आणि गच्ची दोघांनी वापरात घ्यावी, अशी स्पष्ट सूचना लिहून ही सूचना अधोरेखित केली होती. 
 
बाप रे... हे सारं वाचताना तिथे हजर असलेल्या प्रत्येक सदस्याची अवस्था विकट होत होती, आम्हाला एकमेकाला सांभाळणं कठीण जात होतं. बहीण  ढसढसा रडत होती, आम्हालाही पुढील प्रत्येक शब्द वाचताना क्षणोक्षणी डोळे कोरडे करावे लागत होते. आईनं तोळा माश्याच्या हिशेबासकट सारं लिहून ठेवलं होतं. याला एक ग्राम कमी नाही, की त्याला एक मिलीग्राम जास्त नाही. चिठ्ठीच्या शेवटी सार्‍या रकमेची बेरीज करून, खाली एखाद्या गजेटेड ऑफिसरसारखी झोकदार सही आईनं करून ठेवली होती, त्याखाली सुमारे दोन महिन्यापूर्वीची तारीख. आणि.... आणि आम्हाला भाकरी वाढताना, मोजण्यात कायम चुकायची हिशेब न करू शकणारी आई, हे आयुष्यभर जाणवत राहिलेलं मिथक त्या दिवशी, म्हणजे ती गेल्याच्या चौदाव्या दिवशी तुटलं. आई हिशेबात कच्ची होती?नो वे..... आईचे हिशेब खूप, आमच्यापैकी कुणाहीपेक्षा कितीतरी अधिक पक्के होते.

Related Articles