ट्रम्प यांचे निर्णय दूरगामी परिणाम करणारे   

बाळकृष्ण शिंदे, पुणे

मदमस्त हत्ती कसा धुमाकूळ घालू शकतो याचा प्रत्यय सध्या समस्त जग राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, लैंगिक आघाड्यांवर आपली वैयक्तिक दिवाळखोरी सिद्ध केलेल्या ’पॉलिटिकली इनकरेक्ट’ आणि तरीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसर्‍यांदा विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प नामक व्यक्तीच्या निर्णय धडाडी आणि संकुचित राष्ट्रवादी कृती प्रक्रियेतून घेत आहे.
 
’ग्लोबल वार्मिंग हे एक थोतांड आहे’ असे म्हणत अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राजवटीत वसुंधरा रक्षणाच्या पॅरिस करारातून माघार घेतली होती. त्या निर्णयाची न केवळ पुनरावृत्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसर्‍या राजवटीच्या सुरुवातीलाच केली आहे, तर ’ड्रील बेबी ड्रील’ या घोषणेतून आगामी काळात अमेरिका खनिज तेलासाठी अधिकाधिक खोदकाम करणार असा निर्धारही व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून देखील अमेरिका माघार घेत असल्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेला जगभरातून मिळत असलेल्या एकूण निधीपैकी तब्बल १८ टक्के वाटा एकट्या अमेरिकेचा आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला निधी पूर्ततेबाबत भविष्यात कशा प्रकारे सामोरे जावे लागू शकते याची पुरेशी कल्पना येऊ शकते. तथापि डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात महत्त्वाचा आणि दुरगामी परिणाम घडवून आणणारा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे ’बर्थराईट सिटीसनशिप’ रद्दबातलतेचा. ’बर्थराईट सिटीसनशिप’साठी अमेरिकेच्या राज्यघटनेत १४वी दुरूस्ती करण्यात आली होती; परंतु ’बर्थराईट सिटीसनशिप’ धोरणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी ’ब्रेक’ लावला आहे. जर ’बर्थराईट सिटीसनशिप’मधील बदल लागू झाले, तर अमेरिकन ग्रीन कार्ड आणि एच-१ व्हिसावर असलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या नागरिकत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कारण त्यांना जन्मत: आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. प्यू रिसर्चच्या माहितीनुसार २०२२ मध्ये अमेरिकेत एकूण ४८ लाख भारतीय होते. 
 
अमेरिकन सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के आहे. यापैकी ६६ टक्के स्थलांतरित होते, तर ३४ टक्के अमेरिकेत जन्मलेले होते. तथापि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीमागे अमेरिकेतील कथित राष्ट्रवादी अनिवासी भारतीयांचा देखील खारीचा वाटा आहेच! तसेच स्थलांतरित पुनर्वसन कार्यक्रमाला चार महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. मेक्सिको - टेक्सास सीमांवर इमिग्रेशन कॅम्प - स्थलांतर कक्ष बंद करण्यात आले आहे. तर अमेरिकेच्या दक्षिण-उत्तरी सीमेवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अमेरिकेचा जन्म आणि प्रगतीच मूळी स्थलांतरितांमुळे झाली आहे, तिथे आज ’मागा-मेक अमेरिका ग्रेट अगेन’, ’अमेरिका फस्ट’ या धोरणाच्या मांडणीतून संकुचित राष्ट्रवाद जोपासला जातो आहे. 
 
सरतेशेवटी; कोणत्याही देशाच्या वा व्यक्तीच्या इतिहासात असा एक काळ येतो, की जेव्हा त्या देशास वा व्यक्तीस प्रगतीचे नाहीत, तर अधोगतीचे डोहाळे लागतात, तो हा अमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प राजवटीचा काळ आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या दैदिप्यमान इतिहासातील डोनाल्ड ट्रम्प हे महाशय सर्वात खालच्या पातळीचे म्हणूनच नोंदवले जातील. 

Related Articles