E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
‘पालक मंत्री’पद आणि खदखद
Wrutuja pandharpure
02 Feb 2025
राज्यरंग , नंदकुमार काळे
राज्यातील जनतेने महायुतीला दिलेला बहुमताचा कौल पाहता सरकारने वेगाने कामे करणे अपेक्षित होते; परंतु सरकार स्थापना, मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्र्यांची निवड या बाबींना लागलेला कालावधी पाहता हेच का ते ‘गतिमान’ सरकार आणि ‘हेच फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले खरे; पण मुख्यमंत्र्यांची निवड, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि नंतर पालकमंत्रीपदे अशा सगळ्या टप्प्यांवर महायुतीमध्ये रस्सीखेच आणि नाराजीनाट्य दिसून आले. मुख्यमंत्री परदेशात असताना पालकमंत्रीपदावरून आपल्याच सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरून मंत्रीसमर्थक आंदोलन करत असतील आणि त्यावरून सत्ताधार्यांमध्ये कलगीतुरा होत असेल तर सरकार एकदिलाने कारभार कसा करणार, हा प्रश्न उरतो. मंत्री जिल्ह्यात एकमेकांचा पाणउतारा करणार असतील, तर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा बाळगायची की त्यांच्यातल्या हाणामार्या पाहण्यात समाधान मानायचे, असे जनतेला वाटू शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील गावी गेले. नाराजी नसल्याचे सांगताना त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत अपेक्षा बाळगण्यात वावगे काय, असा सवाल करत भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांची पाठराखण केली.
सत्तास्थापने नंतर सुमारे दीड महिन्यांनी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आणि रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा बर्याच दिवसांपासून सुरू होती.रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांचे नाव जाहीर केले गेले; परंतु यावरून गोगावले यांनी उघड नाराजी व्यक्त केली. शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पालकमंत्र्यांच्या यादीत गोगावले यांचे नाव नसणे हे आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. गुलाबराव पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. या जाहीर वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये पालकमंत्रिपदांवरून ताळमेळ नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
जाहीर नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर आदिती तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. ‘गोगावले माझे सहकारी मंत्री आहेत. मला जबाबदारी दिली असली तरी गोगावले हेसुद्धा अनेक वर्षांपासून काम करत आहेत. यामुळे आम्ही समतोल राखून जिल्ह्यासाठी काम करू. कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे नाराजी राहत असते, कारण प्रत्येक पक्षाला प्रतिनिधित्व करण्याची संधी हवी असते, असे त्या म्हणाल्या; मात्र त्याच रात्री रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या.
एकूणच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले हे खरे असले, तरी महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. तीन मोठे नेते त्यांचे नेतृत्व करत आहेत. यात दोन प्रादेशिक पक्ष आहेत. आपल्या पक्षातील नेते, त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, पक्षसंघटन अशी मोठी जबाबदारी युतीतील दोन्ही मित्रपक्षांच्या नेतृत्त्वाच्या खांद्यावर आहे. महायुतीमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष असला, तरी आपल्या पक्षाला डावलले जाऊ नये किंवा तसा संदेश पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात जाऊ नये याचीही खबरदारी दोन्ही नेत्यांना सहाजिकच घ्यावी लागत आहे; परंतु हा समतोल कितपत शक्य आहे, असाही प्रश्न आहे.
मंत्रिमंडळात भाजपला अपेक्षेप्रमाणे जास्त खाती मिळाली. त्यांच्या बहुतांश मंत्र्यांना पालकमंत्रीपदे मिळाली. काहींना ‘सहपालकमंत्री’ करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्र्यांनी पाडला. शिंदे यांच्याही बहुतांश मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदे मिळाली; परंतु अजित पवार आणि तटकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्वरित मंत्र्यांना साडेचारशे ते साडेसहाशे किलोमीटर दूरच्या जिल्ह्यांत पालकमंत्रीपदे मिळाल्याने मतदारसंघ, पालकत्व असलेला जिल्हा व मंत्रालय सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होणार आहे. पालकमंत्रीपद अथवा अन्य कारणांवरून झालेली धुसफूस पाहता बहुमत असले, तरी सहमतीने निर्णय घेणे किती गरजेचे आहे हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पक्षातल्या लोकांना गृहीत धरून कारभार रेटू शकत नाही, याची जाणीव मित्रपक्षांकडून वारंवार करुन दिली जात आहे. पर्याय नसला तरी वाटेल त्या तडजोडी होणार नाही, असाही संदेश मित्रपक्षांकडून दिला जात आहे. समन्वयाचा कितीही आव आणला जात असला, तरी तसा तो नाही. त्यामुळेच वारंवार वाद होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीतील तीन्ही पक्षांमधील नेत्यांच्या विधानांवरून राजकीय संघर्षाचे चित्र दिसेल असे जाणवते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार केलेली भाषा, जिल्हास्तरावर हस्तक्षेप न करण्याची भूमिका आणि नंतर त्यावरचे घूमजाव इथे दखलपात्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती होत नसेल, तर स्वबळावर लढण्याचा दिलेला इशारा आणि राज्यातील महायुतीमधील कुरघोडीचे राजकारण पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकजिनसीपणे सामोरे जाणे किती कठीण आहे, हे स्पष्ट होते. . अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय संघर्ष दिसत असताना राज्याच्या सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतल्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवताना काय तोडगा काढतात, यात कोणाच्या बाजूने निर्णय होईल किंवा दोन्ही मित्रपक्षांमधील नेत्यांचे समाधान करता येईल का, हे येणारा काळच सांगेल. तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली असली, तरी हा पेच आता तरी सुटेल का हाही प्रश्न आहे.. मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेही पालकमंत्रिपद न दिल्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद दिल्याचे आता बावनकुळे सांगत आहेत, ते जाहीर होण्या अगोदर शिंदे यांना विश्वासात घेतले असते, तर नंतरचा तमाशा झाला नसता. रायगडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळायला हवे, असा दावा शिंदे गट करतो; परंतु मग याच दाव्याचा आधार घेतला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायला हवे होते.
विशिष्ट जिल्ह्याचे पालकत्वच या मंत्र्याकडे असते. मग त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतेही काम असो, किंवा अगदी शासकीय समारंभ असोत; पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निधीवाटपावर नियंत्रण आणि नियोजन त्यांच्याच हाती असल्याने समर्थकांच्या वाट्याला जास्त खिरापत मिळते. लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्रिपदाकडे पाहिले जाते. त्यातून मंत्रिपदापेक्षाही पालकमंत्रिपदाला जास्त महत्त्व आले आहे.
Related
Articles
व्यावसायिकावर गोळीबार चुलत भावाला अटक
13 Feb 2025
पीएमपीएमएलसाठी एक हजार बसची खरेदी
14 Feb 2025
महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती
14 Feb 2025
जैन जीवन जगण्याची कला अवगत करण्याची संधी
10 Feb 2025
दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी नड्डा -शहांमध्ये खलबते
10 Feb 2025
भ्रष्टाचारात वाढ (अग्रलेख)
15 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अमृता करंबळेकर प्रथम
2
आतिशी यांनी गड राखला
3
दिल्ली आपत्तीपासून मुक्त : मोदी
4
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत जाहीर
5
पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष
6
लय आणि अचूकतेचं मिश्रण