सत्तापिपासू हुकुमशहा!   

चर्चेतील चेहरे, राहुल गोखले  

बेलारूस या देशाच्या सार्वत्रिक निवडणुका ठरल्याप्रमाणे पार पडल्या आणि त्यांचे निकाल देखील ’ठरल्याप्रमाणे’च लागले. अलेक्झांडर लुकाशेन्को हे सलग सातव्यांदा अध्यक्षपदी ’निवडून’ आले आहेत. सोव्हिएत रशियाचेव   १९९१ मध्येी विघटन झल्यानंतर बेलारूस स्वतंत्र राष्ट्र झाले .१९९४ मधेय  लुकाशेन्को पहिल्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. तेंव्हापासून तेच बेलारूसचे अव्याहतपणे अध्यक्ष आहेत. मात्र याचे कारण ते लोकप्रिय आहेत हे नव्हे. त्यांचे विरोधक कारावासात तरी आहेत किंवा त्यांनी देशातून पलायन तरी केले आहे.
 
हे यंदाच्याच निवडणुकीतील चित्र आहे असे नाही. या अगोदरच्या प्रत्येक निवडणुकीत लुकाशेन्को यांची निवड वादग्रस्त ठरली आहे आणि तरीही ते अध्यक्षपदी कायम आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा असणारा पाठिंबा. युक्रेनवर रशियाने २०२२ मध्ये आक्रमण केलेे तेंव्हा शस्त्र डागण्यासाठी रशियाने बेलारूसच्या भूमीचाच वापर केला होता.  अमेरिका तसेच युरोपीय महासंघाने लुकाशेन्को यांच्या निवडीस मान्यता दिलेली नाही. तथापि रशियाचे भक्कम पाठबळ असल्याने अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांच्या मताला लुकाशेन्को धूप घालत नाहीत.
 
३० ऑगस्ट १९५४ रोजी बेलारूसमध्ये जन्मलेले लुकाशेन्को यांनी मोगीलेव विद्यापीठातून १९७५   मध्ये  इतिहास शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले; नंतर १९८५ मध्ये त्यांनी बेलारुशियन कृषी विद्यापीठातून अर्थशास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली.  १९७५ ते १९७७ या दोन वर्षांच्या काळात ते सीमा सुरक्षा दलात अधिकारी  होते. दोन एक वर्षे ते सोव्हिएत  लष्करात देखील होते. १९८७ नंतर पुढील पाच वर्षे ते एका समूहशेती प्रकल्पाचे प्रमुख होते. 
 
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीस ते बेलारूसचे संसद सदस्य म्हणून निवडून आले खरे; मात्र पहिल्यापासून ते रशियाधार्जिणेच होते. सोव्हियत महासंघातून स्वतंत्र होण्यासाठी बेलारूस संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला तेंव्हा त्या विरोधात मतदान करणारे ते एकमेव सदस्य होते. बेलारूस-सोव्हिएत सोशालिस्ट प्रजासत्ताक सर्वोच्च परिषदेचे ते उपप्रमुख होते आणि त्याच अंतर्गत त्यांनी आपला ’लोकशाहीसाठी साम्यवादी’ नावाचा गट स्थापन केला होता. १९९४ मध्ये स्वतंत्र बेलारूसच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. बेलारूसमध्ये मुक्त वातावरणात पार पडलेल्या त्या एकमेव निवडणुका होत्या असे मानले जाते. ३९ वर्षीय लुकाशेन्को हे त्या निवडणुकीत उमेदवार होते.
 
१९९० च्या दशकात बेलारूसची स्थिती केवळ दयनीय नव्हे तर भयावह होती. आर्थिक दाणादाण उडाली होती; महागाई कमालीची वाढली होती; गुन्हेगारी टोळ्यांची दहशत होती; भ्रष्टाचाराचा सुकाळ होता; कारखाने बंद पडले होते आणि दुकानांमधील फडताळ रिकामे होते. साध्या पावाच्या किंमती दिवसभरात अठरापटीने वाढत होत्या. अशा वातावरणात जनतेला नवीन व्यवस्था हवी असते. जनतेच्या प्रस्थापितांबद्दल भ्रमनिरासाचे आणि हतबलतेचे रूपांतर लुकाशेन्को यांनी स्वतःविषयीच्या सहानुभूतीत्त केले. आपण भ्रष्टाचार संपवू, देशाला स्थैर्य देऊ अशी आश्वासने त्यांनी दिली आणि मतदारांनी त्यास भुलून लुकाशेन्को यांना अध्यक्षपद दिले. ही स्थिती ज्यांच्यामुळे आली ते देशाचे पहिले पंतप्रधान केबिक यांचा पराभव करीत लुकाशेन्को अध्यक्षपदी निवडून आले. त्यांनतर गेल्या तीन दशकांत बेलारूसच्या वाट्याला स्थैर्य आले नाही. स्थिर झाली ती केवळ लुकाशेन्को यांची सत्ता!
 
अध्यक्ष झाल्यानंतर वर्षभरातच लुकाशेन्को यांनी आपली रशिया-प्रीती दाखविण्यास सुरुवात केली. बेलारूसचा झेंडा  बदलण्यासाठी आणि त्यात रशियाच्या  झेंड्याशी साधर्म्य आणण्यासाठी त्यांनी सार्वमत घेतले. रशियन भाषेला बेलारुशियन भाषेचा दर्जा त्यांनी दिला. रशियाप्रमाणेच त्यांनी सर्व उद्योग आणि शेतीवर शासकीय नियंत्रण ठेवले. सुरुवातीच्या त्यांच्या या प्रयोगांनी त्यांची प्रतिमा ’जनतेचा अध्यक्ष’ अशी झाली; किंवा तशी ती असल्याचा लुकाशेन्को यांनी दावा तरी केला. मात्र याच सार्वमतात संसद विसर्जित करण्याचे अधिकार लुकाशेन्को यांना देण्यात आले होते. निरंकुश सत्तेकडे जाण्याचा तो आरंभबिंदू होता. 
 
२००१च्या निवडणुकीत ते पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण ७५ टक्के इतके होते. घटनात्मक तरतुदीनुसार दोनपेक्षा अधिक वेळा अध्यक्षपदाची निवडणूक लढविणे शक्य नाही हे दिसताच लुकाशेन्को यांनी २००४ मध्ये पुन्हा एकदा सार्वमत घेतले आणि अध्यक्षांच्या कार्यकाळावरील निर्बंध काढून टाकले. अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कोंडलिझा राईस यांनी लुकाशेन्को यांचे वर्णन ’युरोपमधील उरलेला शेवटचा हुकुमशहा’ असे केले होते. अर्थात असल्या टीकेने संकोचून जाणारे लुकाशेन्को नव्हेत.
 
सत्ता आपल्याकडेच राहायला हवी आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची वेळ आली तरी त्यात विवेकबुद्धी आड येऊ द्यायची नाही असा त्यांचा खाक्या. विरोधक आणि बंडखोरांना नामोहरम करायचे हेच धोरण त्यांनी राबविले. त्यांचे राजकीय विरोधक ’गायब’ होऊ लागले. लोकशाहीवाद्यांची सर्रास धरपकड होऊ लागली. अन्य राष्ट्रांत जे रशियाधार्जिणे होते त्यांच्याशी लुकाशेन्को सलगी करू लागले. बेलारुसचे पुन्हा रशियात विलीनीकरण व्हावे याकरिता लुकाशेन्को यांनी पुढाकार घेतला होता. सर्बियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविच यांच्या सत्तेला युरोपीय राष्ट्र आणि नाटोचा विरोध असताना लुकाशेन्को यांनी बेलग्रेडला जाऊन मिलोसेविच यांना पाटिंबा  दिला होता..रशियाकडे लुकाशेन्को यांचा कल असला तरी १९९९ साली पुतिन सत्तेवर आले तेंव्हा त्या दोघांतील प्रारंभिक संबंध तणावाचे होते. मात्र दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांवर अवलंबून असल्याने दोघांनी सबुरी दाखविली. तरीही दोघांत संशयाचे वातावरण होतेच. हळूहळू मात्र ते ढग विरळ झाले आणि पुतिन-लुकाशेन्को यांचे संबंध सुरळीत झाले. याचे एक कारण म्हणजे सतत सत्तेवर राहण्यासाठी लुकाशेन्को यांना हवा असणारा पुतिन यांचा पाठिंबा. युरोप आणि अमेरिका यांनी लुकाशेन्को यांना मान्यता न दिल्याने रशिया हाच त्यांचा एकमेव आधार राहिला. पुतिन त्याची किंमत वसूल करतात हे निराळे सांगावयास नको.
 
या दरम्यान लुकाशेन्को २०१०, २०१५ मध्ये अध्यक्षपदी निवडून अले आणि तेही किमान ८० टक्के मते जिंकून. २०२० मध्ये करोनाची साथ जगभरात पसरली तेंव्हा लुकाशेन्को यांनी जनतेने व्होडका हे मद्य केवळ सेवन करू नये तर त्यानेच हात दखल धुवावेत अशी सूचना केली होती. त्याच दरम्यान झालेल्या निवडणुकीत लुकाशेन्को पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघी दहा टक्के मते मिळाली. 
 
बेलारूसमध्ये संतापाची लाट उसळती आणि जनतेने उत्स्फूतपणे निदर्शने केली. ती लुकाशेन्को यांनी बळाचा वापर करीत मोडून काढली. सुमारे पस्तीस हजार निदर्शकांना अटक करण्यात आली. हजारो जणांना पोलिसांच्या लाठ्या झेलाव्या लागल्या. किमान पंधरा निदर्शक ठार झाले. एका निदर्शकावर तुरुंगात अतिप्रसंग करण्यात आला. निवडणुकीत ’विजयी’ होऊनही आपण पराभूत झाल्याचा विदारक अनुभव लुकाशेन्को यांना आला आणि ते अधिकच बिथरले. त्यांची दडपशाही अधिकच वाढली. २०२१ मध्ये ग्रीसहून ल्युथिनियाला जाणारे एक विमान सक्तीने बेलारूसच्या राजधानीत उतरविण्यात आले. बॉम्ब ठेवल्याची ’खबर’ असल्याने सुरक्षेच्या कारणावरून ही कार्यवाही करण्यात आली असे स्पष्टीकरण बेलारूसने दिले; पण ते किती पोकळ होते याचा प्रत्यय लवकरच आला. त्या विमानातून प्रवास करणार्‍यांमध्ये लुकाशेन्को यांच्या विरोधातील एक बंडखोर पत्रकारही होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी हा सगळा बनाव रचण्यात आला होता. त्यासाठी ते विमान बेलारूसच्या विमानतळावर तब्बल सात तास जमिनीवर होते! लुकाशेन्को यांची पाताळयंत्री वृत्ती त्यातून दिसते.
 
स्वतंत्र माध्यमे नाहीत; स्वतंत्र कामगार संघटना नाहीत; मुक्त न्ययालये नाहीत; आणि विरोधक-बंडखोरांना देशात स्थान नाही अशी लुकाशेन्को यांची कारभाराची रीत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या व्रिरोधात चार उमेदवार होते; त्यांतील एकाचीही महत्वाकांक्षा लुकाशेन्को यांचा पराभव करण्याची नव्हती. त्या सर्वांना मिळून सुमारे दहा टक्के मते मिळाली आणि लुकाशेन्को अध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला तर २०३० साली त्यांच्या एकाधिकारशाहीला छत्तीस वर्षे पूर्ण होतील आणि ते वयाची पंचाहत्तरी गाठतील.  तरीही त्यांची सत्तेची भूक शमणार नाही. मात्र त्या देशात अर्थव्यवस्था डळमळीत आहे. जनतेत रोष आहे. जनता कधी उठाव करेल याची शाश्वती नाही. परिणामतः लुकाशेन्को जास्तीत जास्त असहिष्णू भूमिका घेत आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाचा सातवा कार्यकाळ सुरु झाला आहे. सत्तापिपासू, मस्तवाल आणि निगरगट्ट अशा अलेक्झांडर लुकाशेन्को नावाच्या ‘साडे साती’तून बेलारुसची कधी सुटका होणार हा कळीचा मुद्दा आहे!

Related Articles