मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले   

 

बिछान्यावर सापडले तीन मुलांचे मृतदेह
 
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह एका घरात सापडले आहेत. त्यापैकीं तीन मुले असून त्यांचे मृतदेह  बिछान्याच्या कप्प्यात सापडले. त्यापैकी एकाचे वय एक वर्ष आहे. कौटुंबिक वादातून पाचही जणांची हत्या झाल्याचे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरुन स्पष्ट होत आहे. 
 
आई आणि वडिलांचे मृतदेह बेडशीट आणि प्लास्टिकमध्ये तर मुलांचे मृतदेह बिछान्याच्या कप्प्यात ठेवल्याचे दिसून आले. या प्रकरणी दोघांसह अनेक संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. पाच जणांच्या डोक्यावर जखमा आणि गळ्यावर वार केल्याच्या खुणा होत्या. 
ज्येष्ठ पोलिस अधिकारी विपीन टाडा म्हणाले, मृत महिलेच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. प्रमुख दोन आरोपी आणि संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी सांगितले की, मुलांच्या पालकांचे मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळले होते. मुलांचे मृतदेह बिछान्याच्या कप्प्यात होते. सर्वजण गजबजलेल्या सुहेल गार्डन परिसरातील घरात राहात होते. जवळच लिसारी गेट पोलिस ठाणे आहे. प्रकरणातील एक संशयित बेपत्ता आहे. त्याला लवकरच पकडण्यात येईल. सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच प्रकरणाचा छडा लागेल. 
 
कौटुंबिक वादातून खून? 
 
मोईन उर्फ मोईउद्दीन (वय ५२), त्यांची पत्नी अस्मा (वय ४५) आणि मुली असिफा (वय ८), अझिझा (वय ४) आणि अबिदा (वय १), अशी त्यांची नावे आहेत. आस्मा यांचा बंधू शाहीम याने तक्रार दाखल दिली होती. अस्मा यांची वहिनी नझराना आणि तिच्या दोन भावांनी खून केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली आणि पाहणी केली. 
 

Related Articles