शहरातील तपमानात आजपासून वाढ   

पुणे : मागील आठवडाभरापासून घटलेल्या तपमानामुळे सायंकाळनंतर हवेत गारवा वाढत होता. त्यामुळे थंडीत वाढ झाली होती. मात्र आज (शुक्रवार) पासून किमान तपमानात वाढ होणार असल्याने थंडीत घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरूवारी शहरात २९ अंश कमाल व १०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली. 
 
तपमानात वाढ झाल्याने हवेतील गारवा कमी झाला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत किमान तपमानात २ ते ३ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवेतील गारवाही गायब होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवसांत शहर आणि उपनगरातील किमान तपमान १५ अंशापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. दिवसभर थंडी गायब होणार असली, तरी रात्रीच्या किमान तपमानात मात्र घट कायम राहणार असल्याने रात्री हवेत काही प्रमाणात गारवा टिकून राहू शकतो, असेही हवामान विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. 
 
शहर आणि उपनगरात काल सकाळी हवेत गारवा होता. त्यामुळे पहाटेपासून सकाळी आठपर्यंत थंडी जाणवत होती. त्यानंतर मात्र ऊन पडले होते. दुपारी सर्वत्र ऊन पडल्याने हवेतील गारवा कमी झाला होता. सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ झाल्याने काही अंशी हवेत गारवा जाणवत होता. रात्री किमान तपमानात घट झाल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र मागील आठवडाभराच्या तुलनेत थंडी कमी झाल्याने रात्री तसेच सकाळी नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. 
 
दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाडड्यात काही ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत घट झाली. काल राज्यात नागपूर येथे नीचांकी ८.२ अंश किमान तपमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे असणार आहे. 

Related Articles