आमदारांचा बैठकांचा धडाका   

अंदाजपत्रकात तरतूद मिळवण्यासाठी प्रयत्न

पुणे : पुणे महापालिकेत गेल्या साडे तीन वर्षांपासून नगरसेवक नाहीत. त्यामुळे प्रभागातील अनेक कामे रखडली आहेत. महापालिकेत प्रशासकराज असल्याने कामे होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे नागरिक थेट तक्रारी घेवून आयुक्तांकडे येत आहेत. त्यात आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या आमदरांकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावणे तसेच प्रभागातील रखडलेली कामे आणि नवीन कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी विद्यमान आमदारांकडून प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विभागातील अधिकार्‍यांची धावपळ उडाली आहे.
 
महापालिकेच्या काही दिवसात निवडणुका लागतील. निवडणुका न्यायालयीन प्रकरणात अडकल्याने लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाचा एकदा निर्णय झाला की येत्या तीन महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणुकीची तयारी काही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यात आता महापालिकेच्या अर्थसंकल्प तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या अर्थसंकल्पात शहरातील विविध प्रकल्पांसाठी तसेच छोट्या-मोठ्या कामांसाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. तसेच विभाग प्रमुखांकडून विविध कामे सुचवली जाणार असून त्यासाठी आर्थिक तरतूदीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यामुळे आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील प्रभागातील विविध कामे सुचवणे, तसेच रखडलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहेत.
 
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील भाजपच्या आमदारांची बैठक नुकतीच घेतली होती. या बैठकीत त्यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यात ज्या वेगाने प्रकल्पाची कामं व्हायला हवीत, त्या वेगाने होताना दिसत नाहीत, असे म्हणत राज्यमंत्री मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणावरही नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता थेट कारवाईचे त्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार अधिकार्‍यांनी कारवाई देखील सुरु केली होती. 
 
मोहोळांनी महापालिका प्रशासनाला घरचा आहेर दिल्यानंतर राज्याचे मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील हे मोहोळ यांच्या मदतीसाठी सरसावले होते. यापुढे दर महिन्याला महापालिका प्रशासनाबरोबर बैठक घेतली जाईल. मागील बैठकीत महापालिका प्रशासनाने काय आश्वासन दिली होती त्याचा आधी आढावा घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.
 
दरम्यान, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी बैठका घेवून त्यांच्या मतदारसंघातील तसेच प्रभागानुसार कामांचा आढावा घेतला आहे. तर आज हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी सुध्दा बैठक घेतली.   पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्याच्या मंत्री माधुरी मिसाळ यांची बैठक होणार आहे. एकूणच या आमदारांकडून अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या मतदारसंघातील कामांसाठी आर्थिक तरतूद घेण्यासाठी बैठकांचा धडाका लावला जात असल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. 

Related Articles