जगातील उच्चश्रेणीत पुणे विद्यापीठाला स्थान मिळावे : उपमुख्यमंत्री पवार   

पुणे : देशातील एकही विद्यापीठ जगातील उच्च श्रेणीतील २०० विद्यापीठांच्या यादीत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून विद्यापीठाला सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी सकाळी ७ वाजता विद्यापीठाला भेट दिली.विद्यापीठातील विकास कामांचा आढावा घेतला.याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. चारुशीला गायके, आयआयएलचे संचालक डॉ.देविदास गोल्हार, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे, संदीप कदम आणि इतर संविधानिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
विद्यापीठाच्या प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थी केंद्रित तसेच विद्यापीठ विभाग आणि महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध कार्याचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. तसेच या पुढच्या काळामध्ये राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण देखील करण्यात आले होते. दरम्यान, शासन स्तरावर जी काही मदत प्रशासनाच्या वतीने लागेल त्यासाठी निश्चितपणे राज्य शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत उभे राहील,अशी ग्वाही अजित पवार यांनी विद्यापीठास दिली. 
 
सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यापीठात कन्व्हेन्शन सेंटर भरले जाणार होते. मात्र, त्यात वाद निर्माण झाला. परिणामी हा प्रकल्प रखडला. सिरम इन्स्टिट्यूटने कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या कामात पुढे जाण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकल्पात काय अडचणी आहेत, याची माहिती अजित पवार यांनी घेतली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी याबाबत सादरीकरण दिले. अजित पवार यांनी विद्यापीठाच्या विकास कामांचा आढावा घेतला. 

Related Articles