’काळ’ कर्ते शिवरामपंत परांजपे   

गाऊ त्यांची आरती 

शिरीष चिटणीस (कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद)
 
लोकमान्य टिळक यांचे अनुयायी, पत्रकार, स्फूर्तिशाली निबंधकार, प्रभावी वक्ते इत्यादी विविध नात्याने शिवरामपंत परांजपे यांची ख्याती होती. सन १८९८ मध्ये चैत्र पाडव्याला ’काळ’ या साप्ताहिक पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात पदार्पण केले. त्यावेळचा काळ मोठा कठीण होता. रँड व आयर्स्ट यांची चाफेकर बंधूंनी हत्या केली होती. लोकमान्य टिळक अटकेत होते. इंग्रज सरकारची दडपशाही वाढली होती. अशा वातावरणात ’काळ’ या पत्राने जनमनाची विलक्षण पकड घेतली. त्यावेळच्या काळातही ’काळ’ या वृत्तपत्राचा खप बावीस हजारापर्यंत होता.
 
‘काळ’ वृत्तपत्र म्हणजे तरुण पिढीचे स्फूर्तिस्थान झाले. ’काळ’ पत्र म्हणजे अभिनव भारतसारख्या क्रांतीकारक संस्थेचा वेदमंत्र बनला. याच काळात सेनापती बापट यांनी देशाकरिता स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. ’काळ’ पत्राच्या या यशाने ब्रिटीश सरकारचे माथे भडकून गेले. ’टाइम्स’सारखी सरकारधार्जिणी वृत्तपत्रे ’काळ’ या वृत्तपत्रावर तुटून पडली. पण ’काळ’ कोणाच्याच धमक्याला न घाबरता काम करीत होता. या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे हे खंदे समर्थक शिवरामपंत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करीत होते. १९०७ च्या अखेरीस डिसेंबर महिन्यात सुरत येथे भरणार्‍या काँग्रेसच्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक यांचे समवेत शिवराम परांजपे आणि दादासाहेब खापर्डे हे होते. टिळक यांचा जहालमतवादी मताचा लोकांचा काँग्रेसमधील गट आणि फिरोज शहा मेहता यांचा मवाळ मताचा काँग्रेसमधील लोकांचा गट यांच्यामध्ये प्रचंड चुरस काँग्रेसच्या या अधिवेशनात होती. बंगालमधील स्वातंत्र्यचळवळ लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्त्वाखाली अरविंद घोष यांच्या प्रेरणेने शिखरास पोचली होती. अरविंद घोष, लाल लजपतराय तुरूंगातून सुटले होते. बापू बिपीनचंद्र पाल मात्र तुरूंगातच होते. या काँग्रेस अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रासबिहारी घोष होते. सुरत काँग्रेसच्या १९०७ च्या या अधिवेशनात २६ डिसेंबर रोजी सभेचे काम अर्धवट होऊन सभा उधळली. तर २७ डिसेंबर रोजी जहाल-मवाळ गटात मारामारी होऊन सभा उधळली. २८ डिसेंबर रोजी जहाल पक्षाचे म्हणजे लोकमान्य टिळकांचे अनुयायी काँग्रेस अधिवेशनाला न जाता अरविंद घोष यांच्या अध्यक्षतेखाली ज्या सुरतच्या गावभावात एकत्र रहात होते त्या परिसरात एकत्र आले आणि त्यांनी सभा भरवली. अरविंद घोष यांनी अध्यक्ष म्हणून ’ची. 'Mr. Tilak will explain the situation’ असे एकच वाक्य उचारून सभेचा ताबा लोकमान्य टिळकांकडे दिला. शिवराम परांजपे या सर्व परिस्थितीत लोकमान्य टिळक यांना मदत करीत होते.
 
१८९८ ते १९०८ पर्यंत ’काळ’ या पत्राने स्वातंत्र्यलढ्याचा अखंड जयजयकार केला. शिवरामपंत परांजपे यांचे लिखाण भारतभर ’काळ’ या पत्राद्वारे स्वातंत्र्यलढ्याला चेतावनी देत होते. ’काळ’ या पत्राचा उत्कर्ष इंग्रज सरकारला सहन होणे शक्यच नव्हते. १९०८ मध्ये शिवराम परांजपे पुणे नगरपालिकेमध्ये निवडून आले. ’काळ’ या पत्रामध्ये, फितुरी केल्याबद्दल हिंदी लोकांना बक्षीसे द्यावयाची; पण एखाद्या इंग्रज माणसाने जर फितुरी केली तर त्याला मात्र फाशी द्यायचे. एकाच गुन्ह्याबद्दल एकाला बक्षिसी तर दुसर्‍याला फाशी ही काय ’न्यायप्रियता’ का? का न्यायप्रियतेचे सोंग? असा आशयाचा लेख. तसेच बंगालमध्ये बॉम्बगोळ्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वापराने हादरून गेला असता, शिवराम परांजपे यांनी ’काळ’ या पत्रात हिंदुस्थानात बॉम्ब गोळे येण्याला मूळ कारण इंग्रजी लोकच असा लिहिलेला अग्रलेख. यामुळे परांजपे यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. १९०८ मध्ये अटक झाल्यावर लोकमान्य टिळक यांनी परांजपे यांना जामीन मिळविण्यापासून खटला लढविण्यापर्यंत त्यांची सर्व बाजू सांभाळली. या खटल्याचे कामकाज शिवराम परांजपे यांनी स्वतःच चालविले. लोकमान्य टिळक त्यांच्या पाठीशी उभे रहात. ’हे पहा शिवरामपंत, तुम्ही तर सरकारी तोहमतीतच आहात. आम्हीही तुमच्या पाठोपाठ येतच आहोत. हे सतीचे वाण आहे हे लक्षात ठेवा.’ अशा पद्धतीने धीर दिला. एव्हढेच नव्हे तर कायद्याचे बारकावे समजावून दिले. आपले बचावाचे भाषण शिवरामपंत परांजपे यांनी अस्खलीत चार तास इंग्रजीत दिले. देशभक्तीने प्रेरित होऊन करीत असलेल्या या कार्याला इंग्रज शासनाने राजद्रोहाचा आरोप ठेवीत, एकोणीस महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तथापि १५ महिन्यांच्या बंदीवासानंतर ५ ऑक्टोबर १९०९ ला त्यांची मुक्तता करण्यात आली. या काळात ’काळ’ या वृत्तपत्राचे कामकाज त्यांचे सहकारी श्री. खरे व श्री. सोमण यांनी चालू ठेवले. शिवरामपंत परांजपे यांचा कारागृहातून सुटून आल्यावर सत्कार लोकांनी केला; पण ’काळ’कर्त्या परांजपे यांची मुस्कटदाबी करण्याची जय्यत तयारी इंग्रज शासनाने करायची ठरवली असल्याने त्या काळात ‘काळ’ पत्राकडून दहा हजार रुपयांचा जामीन मागण्यात आला. ते शक्य नसल्याने ’काळ’ पत्र शिवरामपंत परांजपे यांना कायमचे बंद करावे लागले. जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे ’काळ’ पत्रावर कायमची बंदी आणीत छापखान्यावर छापा घालण्यात येऊन ’काळ’ पत्राचे सर्व अंक व निवडक लेखांचे ग्रंथ जप्त करण्यात आले. 
 
शिवराम परांजपे यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी कुलाबा जिल्ह्यातील महाड येथे झाला. त्यांचे वडील महादेव परांजपे एक यशस्वी वकील होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. प्राथमिक शिक्षण महाड येथे झाल्यावर त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर शिक्षक म्हणून लाभले. यानंतर त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकरांसाठी प्रवेश घेतला. १८७५ मध्ये त्यांचा गोरेगावचे गणेशपंत गोखले यांची कन्या बयोताई हिच्याशी विवाह झाला. १८८४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि त्यांना संस्कृतची पहिली जगन्नाथ शिष्यवृत्ती मिळाली. १८९५ मध्ये ते एम.ए. झाले. या परीक्षेत त्यांना ’गोकुळदास’ आणि ’झाला वेदांता’ अशी दोन पारितोषिके मिळाली. या दरम्यान लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांना सामाजिक आणि राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी प्रेरीत केले होते. त्यानंतर पुण्यात नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्र कॉलेजात १८९६ आणि १८९७ मध्ये ते संस्कृतचे प्राध्यापक होते. तथापि टिळकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक चळवळीत त्यांचे समरसतेने सहभागी होणे त्या कॉलेजला अडचणीचे वाटू लागल्यामुळे त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून दिली. १८९८ मध्ये ’काळ’ या साप्ताहिक पत्राची सुरुवात केली. दर शुक्रवारी प्रसारित होणार्‍या या साप्ताहिक पत्रात तरुणांच्या हृदयातील सुप्त वा गुढस्थ देशाभिमानाला चेतवून त्यांच्यापुढे शुद्ध स्वातंत्र्याच्या कल्पना मांडणे हे महत्वाचे मुख्य कार्य असे. चार पानी या पत्रात वक्रोक्ती हा ’काळ’ पत्राचा एक असाधारण शैली विशेष असला तरी वक्रोक्ती बरोबरच यामधील लेख भावनेने ओथंबलेले, काव्यमय शैलीने मन मोहून टाकणारे आणि कधी कधी गुलामगिरीच्या तीव्र वेदनांविषयीची जाणीव देऊन युवकांना चेतविणारे असत. प्रभावी वक्ते असणार्‍या शिवरामपंत परांजपे यांची टिळकांबरोबर होणारी व्याख्याने लोकांमध्ये राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्य याचा प्रसार करणारी होती. विशेषतः मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषेवर प्रभुत्व असणार्‍या शिवरामपंत यांनी पत्रकारी बरोबरच मराठी साहित्यातही मौल्यवान भर घातली. ‘प्रणयिनीचा मनोभंग’ या ठाकूर सिंग यांच्या चित्त्रांचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानला जातो. नागानंद, अभिज्ञान शांकुतल, मृच्छकटिक या संस्कृत नाटकावरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत. 
 
’काळ’ या साप्ताहिकावर आणलेल्या बंदीनंतर परांजपे यांनी ब्रेक घेऊन साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. एक हजाराहून अधिक राजकीय आणि सामाजिक निबंध तसेच समीक्षा लिहिणार्‍या शिवरामपंत परांजपे यांनी १९१४ मध्ये नाट्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले होते. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील चळवळीशी स्वतःला परांजपे यांनी जोडून घेतले. रुबाबदार पोषाखाचा त्याग करून पांढरी शुभ्र खादीची वस्त्रे ते परिधान करू लागले. स्वातंत्र्यलढ्याच्या तरुणांच्या सहभागासाठी त्यांनी ‘स्वराज्य’ साप्ताहिक चालू केले. मुंबई प्रांतात महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला. पुढे १९२७ मध्ये वृद्धापकाळामुळे हे साप्ताहिक त्यांनी शंकरराव देव यांच्या स्वाधीन केले. १ मे १९२२ रोजी मुळशी सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. सायमन आयोगाला विरोध करण्यासाठी त्यांनी आंदोलनात भाग घेतला. १९२७ मध्ये ते जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि श्रीनिवास अय्यंगार यांनी स्थापन केलेल्या इंडियन इंडिपेडन्स लीगच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष बनले. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्राचे त्यांनी संस्कृतमध्ये केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. त्यांनी मराठ्यांच्या लढ्याचा इतिहास १९२८ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून १८०२ ते १८१८ मधील चौदा लढायांचा इतिहास त्या ग्रंथात दिला आहे. या ग्रंथातून मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा केली आहे.
 
शिवरामपंत परांजपे यांची देशभक्ती प्रखर होती. त्यांची मते स्पष्ट होती. त्यांच्या विचारसरणीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ नव्हता. देशाचे स्वातंत्र्य जवळ आणणार्‍या चळवळीला त्यांनी सदैव पाठिंबा दिला. पूर्वायुष्यात लोकमान्य टिळकांना जितक्या निष्ठेने साथ दिली, तितक्याच निष्ठेने पुढील आयुष्यात महात्मा गांधी यांनाही त्यांनी सहकार्य केले. मायभूमीचे स्वातंत्र्य एवढे एकच ध्येय त्यांच्यापुढे होते. २७ सप्टेंबर १९२९ ला मधुमेहाच्या आजाराने शिवरामपंत यांचे निधन झाले.
 
शिवरामपंत गेल्यावर महात्मा गांधी म्हणाले... ’वे बडा बहाद्दूर थे’. तर वि.दा. सावरकर म्हणाले.. ’परांजपे गेले पण ’काळकर्ते’ अमर झाले. ’काळ’ या साप्ताहिकातील त्या काळातील निवडक निबंध म्हणजे मराठी वाङ्मयातील अमोल ठेवा आहे. महाराष्ट्र सारस्वताचे ते अपूर्व लेणे आहे. ’काळ’ या साप्ताहिक पत्राने महाराष्ट्राची मौलिक सेवा बजावली आहे. ’काळाने’ १८९८ ते १९१० या काळात राष्ट्रांत नवचैतन्य निर्माण केले. 
 
या साप्ताहिकाने दुर्बलांना सबळ व भेकडांना धीट बनवले. ’काळाने’ धर्माला जागृती, जनतेला प्रगती, देशाला उन्नती, कल्पनेला गहन गांभीर्य आणि स्वातंत्र्याला जन्म दिला. १९०० ते १९०८ या कालखंडात प्रसिद्ध करण्यात आलेले ’काळ’ या साप्ताहिका पत्रातील निवडक निबंधाचे दहा खंडही १९१० मध्ये जप्त करण्यात आले. शिवराम पंत यांच्या मृत्यूनंतर १९३० मध्ये मडगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वामन मल्हार जोशी यांनी त्यांच्याबद्दल खालील 
सुमनांजली वाहिली.
 
ती भव्या मूर्ति गेली 
रसिकजनमनोमोहिनी गेलि वाणी ॥
गेली ती वक्र भाषा
छल निरतरवला भेदि जी छद्मवाणी ॥
गेला तो देशभाक्ति प्रचुर...
मधुवची स्फूर्ती दे जो जनाला ॥
संजीवी दास्यरुग्णा
यमसम कुंजना ’काळ’ कर्ताहि गेला ॥

Related Articles