डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा   

 

हश मनी प्रकरणात दोषी; पण शिक्षा नाही
 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा दिला. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलीही शिक्षा देण्यात आली नाही. त्यांना कुठलाही दंड भरावा लागणार नाही, तसेच ते तुरुंगातही जाणार नाहीत. यासंदर्भात न्यूयॉर्क न्यायालयाने शुक्रवारी यासंबंधीचा निर्णय दिला. डोनाल्ड ट्रम्प यांचा येत्या १० दिवसात शपथविधी सोहळा होणार आहे, त्यापूर्वी हा महत्त्वपूर्ण निर्णय सुनावण्यात आला आहे.
 
न्यायालयाने या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले, मात्र त्यांना कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही. त्यामुळे त्यांचा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांच्यावरील खटला देखील निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे एखाद्या प्रकरणात दोषी ठरवले गेल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.
 
शिक्षेच्या सुनावणीवेळी मॅनहॅटन क्रिमिनल न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर झाले होते. न्यायाधीश जुआन मर्चेन यांनी शुक्रवारी त्यांच्या बिनशर्त सुटकेचा निर्णय सुनावला. या निर्णयानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले असले तरी त्यांना कोणताही दंड किंवा तुरुंगवास भोगावा लागणार नाही. यानंतर अवघ्या १० दिवसात डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
सुनावणी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचा पुनरुच्चार केला.
 

Related Articles