निर्लेप आनंद लुटू या   

डॉ. राजेंद्र बर्वे ,प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ 

सध्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये पराकोटीचा संघर्ष दिसतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.पण आसपासच्या सकारात्मक गोष्टी बघणे, वर्षाचे ,किमान दिवसाचे वेळापत्रक लिहिणे,कोणाला मदत करणे,निसर्गाचे रंग आणि बदल अनुभवणे यातूनही समाधान मिळू शकते.या पद्धतीने चिंता न करता नव वर्षाचा आनंद सर्वांनी लुटला पाहिजे.
 
नवीन वर्ष सुरू होत असताना दिवसेंदिवस जटिल होत जाणार्‍या मानसिक समस्या आणि अस्वास्थ्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळेच नव्या  वर्षाचे स्वागत करताना  या विषयाची व्यापकता समजून घ्यायला हवी. यायोगे आपण चांगल्या मनोवस्थेनिशी नववर्षाचे स्वागत करु शकू. आतापर्यंत मानसिक आरोग्य ही इतर आरोग्याच्या बरोबर जाणारी एखादी गोष्ट होती. याच दृष्टीने सगळे त्याकडे बघत होते. मात्र करोना नंतरच्या काळात परिस्थिती बदलली. मानसिक अस्वास्थ्य असल्यास केवळ मानसिक स्थितीच बदलते असे नाही तर तुमच्या आयुष्याचा अनुभव कंटाळवाणा, निराशाजनक असतो हेदेखील समजले. एवढेच नव्हे तर, यामुळे होणारे शारीरिक आजार, मनाचा, शरीराचा दुबळेपणा, वाढता संसर्ग यासारखे धोकेदेखील प्रकर्षाने समोर आले  याचा अर्थ आता मानसिक रुग्ण वाढले आहेत, असा होत नाही पण मानसिक त्रास नक्कीच वाढला आहे. त्यामुळेच नव्या वर्षाचे स्वागत करताना ही मन:स्थिती सुधारण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
 
पूर्वी १० ते १५ टक्के व्यक्तींना इतर व्याधींप्रमाणेच काही मानसिक आजार होते. त्यावर आम्ही इलाज करत आलो आहोत. मात्र आता हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून या लोकांना कोणाच्या वा कोणत्या तरी मदतीची गरज लागत असल्याचे समोर आले आहे. ही संख्या मोठी आहे. अर्थातच यातील सगळेच मनोरुग्ण नाहीत. मात्र त्यांना मानसिक अस्वस्थपणा जाणवण्याइतका आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. कौटुंबिक विवाद, शारीरिक व्याधी, व्यवसाय-धंद्यातील अडचणी आदी कारणांमध्ये कमालीची वाढ झाल्याचा हा परिपाक आहेच, मानसिक आरोग्य धोक्यात येण्याचे वयही आता कमी कमी होत आहे. यात साधारणपणे ३५ ते ४० वर्षे वयोगटाचा समावेश नोंद घेण्याइतका वाढला आहे, कारण त्यांना पुढच्या पिढीची सर्वाधिक चिंता आहे. आपल्या मुलांचे शिक्षण, शिकल्यानंतर मिळणार्‍या रोजगारसंधी, अर्थार्जन, त्यांचे वैवाहिक आयुष्य अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल त्यांना चिंता सतावते तर दुसरीकडे आपल्या  पालकांच्या वृद्धापकालीन स्थितीविषयीही ते चिंताक्रांत दिसतात. पालकांची उद्भवणारी दुखणी, त्याचा खर्च, त्यांच्याकडे लक्ष देणे आदी विषय या पिढीच्या अस्वास्थ्यामध्ये भर टाकत आहेत. 
 
हा वर्ग भरडला जाण्याला वाढती स्पर्धादेखील कारणीभूत आहे. मात्र्त्र सध्याची स्थिती बददलेल. उदाहरणार्थ ‘एआय’चे पुढे काय होणार याची आपल्याला या वर्षी पूर्ण कल्पना येईल आणि आपल्या आयुष्यातील त्याचे स्थान निश्चित करणे सोपे होईल. दुसरी बाब म्हणजे गेल्या वर्षामध्ये देश आणि राज्य पातळीवरील दोन महत्त्वाच्या निवडणुकांमधून आपण बाहेर आलो आहोत. आता दोन्ही सरकारे स्थिरावली आहेत. या अनुषंगाने गेल्या वर्षी बघायला मिळालेली अस्वस्थता या वर्षी बघायला मिळणार नाही. सध्याच्या स्थिरतेबरोबर आपण काही करु शकतो का, याचा विचार आणि विश्वास आता लोकांच्या मनात निर्माण होईल आणि मानसिक स्थिती सुधारेल, अशी आशा आहे.  येणार्‍या वर्षामध्ये नोकरी-धंद्याचे वेगळे  पैलू  निर्माण होताना दिसतील. व्यक्त होणारा हा बदलही अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल.  आता माहिती तंत्र्त्रज्ञान क्षेत्रामध्ये नव्या संधी निर्माण होत असल्याची चर्चा असून ती युवावर्गातील मानसिक अस्वास्थ्य दूर करण्यास पूरक ठरताना दिसत आहे. हे प्रमाण वाढेल तसतसे मानसिक आरोग्यविषयक प्रश्नही कमी कमी होतील. वैयक्तिक पातळीवर बघायचे तर नव्या वर्षातच नव्हे तर पुढच्या काळासाठी मानसिक आरोग्य तोलून धरणारे खांब मजबूत करणे ही निकड असणार आहे. यातील पहिला खांब शारीरिक स्वास्थ्याचा आहे. . रोजचा व्यायाम, ध्यानधारणा याकडे लक्ष देऊन हे नियमन साधता येईल. यासाठी  दिवसातील २० मिनिटे स्वत:साठी दिली तरी पुरेसे होईल. कितीही काम असले तरी प्रत्येकाने हा वेळ स्वत:साठी राखून ठेवायलाच हवा. या २० मिनिटांमधील १३ मिनिटे स्वस्थ बसून श्वासावर लक्ष ठेवावे. स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. यावेळी डोक्यात कोणताही विचार नसावा वा कोणत्याही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न नसावा. उरलेल्या काळात तुम्ही लिखाण करु शकता. आपण कोणत्या गोष्टी करण्यासाठी सज्ज आहोत, कोणत्या गोष्टी करण्याने आपल्याला आनंद मिळेल हे तुम्ही लिहून काढू शकता. 
 
वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला काय मिळवायचे आहे, साधायचे आहे हे एकदा ठरले की मन नकळत त्यासाठी सज्ज होते आणि रोज ठेवला गेलेला हा हिशेब आपल्याला सकारात्मक वळणावर घेऊन जातो. त्यामुळेच नव वर्षात प्रत्येकाने करावी अशी ही बाब असल्याचे अगत्याने वाटते. या सगळ्या गदारोळामध्ये प्रत्येकाने दररोज कृतज्ञता व्यक्त करण्याचा व्यायामही करायला हवा. पालकांनी जन्म दिला, पालनपोषण केले, शिक्षकांनी शिकवले ही सगळीकडे दिसणारी बाब आहे. पण बारीकसारिक गोष्टींप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, कारण यामुळे मिळणारी मन:शांती वेगळ्या पातळीवरची असते. त्याचबरोबर निसर्गाकडे पाहणे, त्यातील बदलांप्रती सजग असणे, निसर्गाचा मान ठेवणे हेदेखील येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आपण दररोज प्रवास करतो. रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळ गवत वाढलेले पाहतो. पण त्यावर फुललेली छोटी-छोटी फुले कितीजण पाहतात? त्यांचे देखणे रंग किती डोळ्यांना दिसतात? धकाधकीच्या प्रवासात क्षणभर तिकडे नजर टाकली आणि अशा रोपांभोवतीची माती, फुले पाहिली तरी खूप मोठे मानसिक समाधान मिळते. ट्रेन यायच्या वेळी येणारच असते. पण तोपर्यंत अस्वस्थ होण्याऐवजी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुटला तर मानसिक आरोग्याचा प्रश्न बिकट होणार नाही.
 
आपण घाईत असतो. डोक्यात अनंत विचार सुरू असतात. पण त्याच वेळी सिग्नलजवळ छोटी मुले येतात आणि पैसे मागतात. पलिकडच्या पदपथावर या जगातील दु:खापासून दूर असणारी काही निरागस मुले उघड्या अंगाने खेळत असतात. हातात मिळालेल्या छोट्याशा तुटक्या-फुटक्या खेळण्याशी खेळण्यात, एकमेकांशी मस्ती करण्यात, जमिनीवरचे उचलून खाण्यात त्यांचा वेळ जात असतो. प्राप्त परिस्थितीने शिणलेल्या माणसांनी कधी तरी या परिस्थितीची जाणीव नसणार्‍या मुलांकडेही बघायला हवे. जमली तर मदत करायला हवी. पैसे न देता जवळ बसवून त्यांना दोन घास द्यायला हवेत. ही प्रत्येक कृती आपल्या मनाची अवस्था सुधारुन जाईल, याची खात्री बाळगा कारण या छोट्याशा कृतीतून आपण खूप काही जमा करत असतो. समाधान घेत असतो. यालाच मी कृतज्ञता व्यायाम म्हणतो, जो आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा.
 
याच पद्धतीने खिडकीत येणार्‍या पक्षांच्या करामती बघण्याने, रस्ता ओलांडताना गोंधळलेल्या वृद्धांना हात दिल्याने, एकट्यांची क्षणभर सोबत केल्याने, जवळच्या नातेवाईकांची विचारपूस केल्याने, अनेक दिवस संपर्कात नसणार्‍या मित्रमंडळींना एखादा कॉल केल्यानेही आपण मोलाचे अनेक क्षण साठवू शकतो. वरकरणी ही बाब अत्यंत सामान्य वाटू शकते, पण याचे प्रमाण आणि प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो. तो पैशात न मोजता येणार्‍या सुखाचे मनावर लेपन करुन जातो. मनातील शंका-कुशंकांवर हलकी फुंकर घालून जातो. म्हणूनच नव्या  वर्षात असे निर्लेप सुख मिळवण्याचा प्रयत्न करु या आणि वधारलेल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यानिशी नव्या काळाचा आनंद लुटू या.
(शब्दांकन: स्वाती पेशवे)

Related Articles