नवे वर्षं, नवी अनुभुती!   

मृण्मयी देशपांडे,अभिनेत्री 

सध्याच्या काळात पर्यावरणविषयक प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे झाले असून संपूर्ण मानवजातीनेच माणूस म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज जाणवू लागली आहे. हे लक्षात घेता नव्या वर्षात डोळे उघडून आपला प्रांत, राज्य वा देशाकडेच नव्हे, तर संपूर्ण जगाकडे बघणे गरजेचे आहे, असे मला वाटते. शेवटी हद्दी माणसाने ठरवलेल्या असतात, निसर्गाने नव्हे. या समेवर नववर्षाचे स्वागत करु या...
 
आपल्यापैकी प्रत्येकालाच नवीन वर्षाबाबत कुतूहल असते. तसे औत्सुक्य मलाही आहे. मागील काही काळाप्रमाणे येणारे वर्षही अनेक नवनवीन प्रोजेक्ट्सने भरलेले,  आयुष्यात नवे रंग दाखवणारे असेल, अशी आशा आहे. आज आमच्याच नव्हे, तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला प्रचंड वेग आला आहे. एक वर्ष कधी संपते आणि नवे कधी सुरू होते, याचा हिशेबही कधी कधी लागेनासा होतो.  अर्थातच नवे वर्षही याच वेगाने पुढे सरकणार आहे. ऋतूबदलाचे एक चक्र अनुभवत आयुष्य पुढे सुरू राहणार आहे. तेव्हा या वर्षाचे आणि आयुष्याचे मोकळ्या मनाने स्वागत करु या.
 
भौगोलिक हद्दींच्या पलिकडे जात होणारा विचारच भविष्याला आकार देणारा ठरणार आहे.  चराचरातील एक प्रजाती म्हणून स्वत:ला शोधण्याची गरज मला प्रकर्षाने जाणवते. कारण हे केले नाही तर आपण आपल्या प्रजातीच्या नाशाला कारणीभूत ठरु. वेळीच पावले उचलली नाहीत, असेच निष्काळजीपणाने जगत राहिलो तर पुढील दहा वर्षांमध्येच आपल्याला अनेक धोकादायक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र या भीतीने गलितगात्र न होता, धीर न सोडता नव्या दमाने, नव्या विचारांनीशी दिवसाची सुरूवात करायला हवी, कारण निराश होत जगणे हे कधीच चांगले जगणे होत नाही. तेव्हा चांगले जगायचे तर आपल्याला आशावादी रहायलाच हवे. प्रत्येक वर्षाची सुरूवात मनात आशेचा अंकुर ठेवूनच झाली पाहिजे. तरच आपण शहाणे होऊ आणि वाढलेल्या बुद्ध्यांकांचा चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेऊ शकू. आधीपासून माणूस हुशार आहेच. पण आता तो शहाणा होणार का, हा खरा प्रश्न आहे. येत्या वर्षात याचे उत्तर शोधावे लागेल.
 
गेली काही वर्षे आम्ही निसर्गाचा निकटचा सहवास अनुभवत आहोत. नैसर्गिक शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग करत बरेच काही शिकत आहोत. या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांना भेटत आहोत. त्यातच एका मान्यवरांचे एक वाक्य मनाला भावले. गप्पा मारताना ते म्हणाले, आपण आपले तर घेतच आहोत, पण पुढच्या पिढीचेही आपणच संपवत आहोत. निसर्गामध्ये वावरत असताना हे सत्य अधिक तीव्रतेने आणि प्रकर्षाने जाणवत आहे. खरे तर निसर्गाच्या जितक्या जवळ जाऊ, तितक्या तुमच्या जाणीवा प्रगल्भ होतात, प्रखर होतात आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करु शकता. त्यामुळे येत्या वर्षात अनेकांनी निसर्गाशी सोयरेपण जपण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्या दृष्टीने आम्ही एक पाऊल उचलले आहेत. आता मागोमाग काही लोक येत आहेत. 
 
अलिकडेच आम्ही फार्मवर काही कार्यशाळा सुरू केल्या आहेत. त्यातून काही समजून घेऊन आजूबाजूचे शेतकरीही आपल्या शेतजमिनींकडे बघत आहेत. त्यांना शेतीमध्ये नवे प्रयोग करायचे आहेत. सेंद्रिय शेतीतले नवे काही जाणून घ्यायचे आहे. रासायनिक खते न वापरता विषमुक्त शेती करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. आमच्याकडे बघून काही लोकांना असे करावेसे वाटणे ही देखील यश्श म्हणावे लागेल. शेवटी आम्ही स्वार्थासाठी  स्वच्छ हवा, चांगले आणि सकस अन्न, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, पाळलेल्या कुत्र्यांना चांगली आणि पुरेशी जागा देण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी यातून काहींना नवी दृष्टी मिळणे ही सुखावणारी बाब आहे.   लोकांपुढे चांगल्या गोष्टींचा आदर्श ठेवणे, त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळवणे ही मला जबाबदारी वाटते. ती पार पाडली जात असल्याचा निखळ आनंद सरत्या वर्षाने आम्हाला दिला आहे आणि नवे वर्षही तो देत राहील याची खात्री आहे.आपल्या देशामध्ये अगदी ६० वर्षांपूर्वीदेखील विषमुक्त शेती होती.  मात्र काळाच्या ओघात बरेच काही बदलले आणि बिघडले. ते सगळे पूर्ववत करणे आमच्या एकट्याच्या प्रयत्नाने साध्य होणारे काम नाही. पण किमान आमच्या कामाने समाजात जागृती निर्माण झाली आणि काही लोक प्रामाणिक प्रयत्न करुन चांगल्या दिशेकडे वळले तरी आपण बरेच काही मिळवू शकू, हा विचार सगळ्या कामामागे आहे. हे सगळे करत असताना माझ्या विचारांमध्ये झालेला बदलही प्रकर्षाने जाणवणारा आहे. अगदी आठ-दहा वर्षांपूर्वी पैसा असता तर एखादी आलिशान गाडी विकत घेण्यास मी प्राधान्य दिले असते. सगळी शक्ती पणाला लावली असती. पण आता पैसे असतानाही मला कोणत्याही ब्रँडच्या मागे धावण्याची इच्छा होत नाही. त्याऐवजी आणखी जमीन घेणे मला आवडेल. 
 
आज जंगलातील काही भाग विकत घेऊन निगराणी करणे, संरक्षित करणे मला अधिक आवडेल, कारण ती खरी संपत्ती असल्याचे आता मला समजले आहेत. थोडक्यात, निसर्गाच्या सहवासात राहून प्रगल्भ झालेल्या जाणीवांचाच हा परिपाक आहे. चकमकत्या आणि दिखावू विश्वात कार्यरत असले तरी आता घर, गाडी, बंगला, नोकरचाकर हा आमचा प्राधान्यक्रम राहिलेला नाही वा त्याचे अप्रूपही राहिलेले नाही. शेवटी एखाद्याच्या जाणीवा प्रगल्भ होतात तेव्हाच तो शहाणा होऊ लागतो. हुशारी योग्य दिशेकडे वळते. असे असताना तुम्ही तुमच्याबरोबर समाजाचे भले केले नाही तरी किमान कुठला नाश तरी करत नाही. सध्या याच दिशेने आमचा प्रवास सुरू आहे आणि नव्या वर्षातही  तो अशाच वेगाने सुरू राहील.
 
बाकीचे सगळे कामही सुरू आहेच. चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळत आहेत, याचा आनंद आहेच. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी शेतीच्या कामात अधिक रमत आहे. इकडची ओढ वाढते आहे. याचे एक कारण असेही आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने जागतिक पटलावरील भयावह परिणाम पाहता येत्या काही काळात काम करायला माझे क्षेत्र असेल की नाही, हेदेखील मला माहिती नाही. कारण आता मेहनत करुन मी चित्रपट करेन, नाटक करेन पण एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर बंद पडणारे पहिले क्षेत्रही माझेच असेल. कोरोनाकाळाने हे दाखवून दिले आहे. विनाशाकडील आपली घोडदौड वेगाने सुरू आहे. म्हणूनच आता आपण आपल्या रक्षणासाठी काय करतोय, हा विचार अधिक प्रभावी होत आहे. नाच, गाणे, अभिनय, फिरणे याची पॅशन तर आधीपासून होतीच. ती आजही आहे. त्यापलिकडे मला काही येतही नाही आणि कधी काही वेगळे केलेही नाही. पण आता एकाच वेगाने आणि रेषेमध्ये या दोन्ही गोष्टी सुरू आहेत. 
 
गेल्या तीन वर्षांपासून अनेक गोष्टी माझ्या आयुष्यातून बाद झाल्या आहेत. सतत काही तरी विकत घ्यायचे, ड्रेस रिपीट करायचा नाही हे विचारही आता स्पर्श करत नाहीत. यशस्वी अभिनेत्री  असूनही मला साधे राहणे जमते आहे. आता मी भारंभार कपडे विकत घेत नाही. ब्रँडेड चपलांचा अट्टाहास तर कधीचाच संपला आहे.  कारण या कशाचा आणि तुमच्या कामाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, हे आता समजले आहे. तुम्ही सेलिब्रिटी असाल तर समाजापुढे चांगले आदर्श उभे करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे, असे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच या नवीन कामात झोकून द्यायचे, घरात आधी कोणीच पायाखाली न घेतलेल्या वाटेवर प्रवास करण्याचे माझे प्रयत्न तर सुरू आहेत. या वर्षी ते अधिक यशस्वी होतील, या आशेनेच  नव्या वर्षाचे स्वागत करते.

Related Articles