E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
शैक्षणिक गुणवत्तेसाठी वाचन संस्कार महत्त्वाचा
Samruddhi Dhayagude
18 Oct 2023
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने परवा वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. शासकीय कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले, असे कार्यक्रम करण्याची वेळ का यावी ? हा खरा प्रश्न आहे. शाळांमध्ये वाचनाचे महत्त्व सांगणारी आणि वाचन संस्कार रूजवण्यासाठीचे उपक्रमांचे आयोजन केले गेले. एका दिवसाच्या उपक्रमाने खरच वाचन संस्कार रूजणार नाही हेही खरेच आहे. त्यासाठी सातत्याने वाचन संस्कार रूजवण्यासाठीचे प्रयत्न हवे. वाचन संस्कार रूजवण्यासाठीची पाऊलवाटच उद्याचा समृद्ध भारत उभा करेल.
शिक्षणाची हरवलेली गुणवत्ता, हरवलेले माणूसपण, शहाणपण आणि विवेकाची झालेली चुकामूक, समाजातील वाढती हिंसा, समृद्धतेचा अभाव, माणसांची हरवलेली उंची पाहता आपल्याला उद्यासाठी प्रकाशाचा दिवा हाती घेऊन उभे राहावे लागणार आहे. हा सतत तेवणारा प्रकाशाचा दिवा म्हणजे पुस्तक वाचनाची वाट असणार आहे. आज शिकलेली माणसे देखील पुस्तक हाती घेत नाही. तेव्हा त्यांना केवळ अक्षर ओळख आहे म्हणून साक्षर म्हणणे ठीक आहे; पण एका अर्थाने ते निरक्षरच समजायला हवेत. वाचता येऊनही न वाचने हे निरक्षरतेचे लक्षण आहे. वाचनापासून समाज दूरावत असल्यानेच आपण र्हासाकडे जात आहे. शिकलेल्या मंडळीमध्ये वाचन संस्कार रूजला तरच समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. पुस्तके काय करतात हे जाणून घ्यायचे असेल, तर आपल्याला कलामांच्या जीवनाकडे पाहायला हवे. पुस्तकांनी अनेकांची मस्तके घडवली आहेत. आज अशी मस्तके घडविणारी व्यवस्था कमकुवत होत चालली आहे. अंधानुकरण अधिक वेगाने घडत आहे. त्या पाऊलवाटेत विचारशुन्यता आहे. त्यामुळे समाज अंधाराच्या दिशेने प्रवास करत आहे. समाजात नेतृत्व करणारी माणसे जनतेला फसवत आहेत. समाजमन निराशेच्या गर्तेत सापडले आहे. संवेदना हरवलेल्या दिसत आहेत. माणसांच्या वाट्याला पोरकेपणा येत आहे याचे कारण आपले वाचनापासून सुटलेले बोट. हे बोट धरून चालण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्नांची गरज आहे.
वाचन हा शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचा राजमार्ग आहे. राष्ट्रीय व राज्य संपादणूक सर्वेक्षणात राज्यातील विद्यार्थी जेथे मागे पडतात ते क्षेत्र प्रामुख्याने स्वतःचे विचाराचे प्रतिपादन, स्वमताची मांडणी, सर्जनशील लेखन, विचार करणे हेच क्षेत्र आहे. त्यात विद्यार्थ्यांची चूक काय ? त्यांना त्या स्वरूपाचे अनुभव दिले नाही, त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली नाही, तर विद्यार्थी त्या क्षेत्रात यश कसे प्राप्त करणार ? सध्याच्या परीक्षा आणि मार्काभोवती केंद्रित झालेल्या शिक्षणाच्या प्रक्रियेत वाचन म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे या छोट्या उपक्रमाने सध्याच्या केंद्र सरकारच्या विषयनिहाय निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास हातभार लागेल. संस्काराच्या नावाखाली मुलांवर काही लादण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे फलित निश्चित चांगले मिळत नाही. त्यामुळे वाचनाचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याबरोबर समाज समृद्धतेसाठी देखील उपयोगी पडेल. लहानवयात घरात आजी आजोबा नावांची गोष्टींची विद्यापीठे होती. त्या विद्यापीठाच्या मुखी चिऊ काऊच्या गोष्टी होत्या. पंचतत्र, इसापसारखा शहाणपण पेरणार्या प्राण्याच्या गोष्टीतून मानवी समाज शहाणपणाचे दिशेने वाटचाल करू लागल्याचा इतिहास आणि वर्तमान देखील आहे. गोष्टींची पुस्तके पूर्वी शालेय अभ्यासक्रमात होती. छान छान गोष्टी नावांचे पुस्तक पूर्वी दुसरीत होते. त्यात रामायणातील प्रसंगाच्या केलेल्या गोष्टी होत्या. त्या गोष्टींनी या राज्यातील लाखो विद्यार्थी ऐकती झाली होती. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होत होता. गोष्टींनी केवळ मनोरंजनच होते असे नाही, तर त्यातून शहाणपणाची पेरणी होत असते. त्यातून विवेकाच्या पातळीवर जाण्याचा प्रवास घडतो. गोष्टींमुळे मुलांच्या मनाला सृजनशीलतेची बीजे मिळतात. चिकित्सक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होत असते, त्यामुळे वाचनाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवा.
शाळा स्तरावर गेले काही वर्ष राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, युनिसेफ, प्रथम बुक्स, स्टोरी विअर यांच्या संयुक्त विद्यमाने गोष्टीचा शनिवारी कार्यक्रम सुरू करण्यात आला. दर शनिवारी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट आणि त्यावरील प्रश्नोत्तरे आणि विविध उपक्रम स्वरूपातील स्वाध्याय दिले जात होते. उपक्रम छोटा आहे; पण गेले अनेक वर्ष राज्य व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात राज्याचा आलेख जेथे घसरताना दिसत आहे, त्या कौशल्यात या उपक्रमाने वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. आज आपला समाज चांगल्या साहित्यापासून कित्येक मैल दूर आहे. टागोरांच्या नंतर भारतीय म्हणून कोणालाच साहित्याचे नोबेल मिळालेले नाही. सृजनाला बहर येण्यासाठी पुस्तकांच्या वाटा सातत्याने चालण्याची गरज असते. नवनवीन कल्पना तर तेव्हा घर करतात जेव्हा आपण अधिकाधिक विचार, चिंतन, मनन करत असतो. त्यासाठी पुस्तकांनी मस्तकात विचार पेरण्याची गरज असते. त्याकरीता जीवनभर पुस्तकांच्या सहवासात राहण्याची गरज आहे. मनाचे पोरकेपण कमी करण्यासाठी पुस्तके अधिक उपयोगी पडतात. गोष्ट ही मानवी जीवनाच्या विकासात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या गोष्टींनी अनेकाच्या आयुष्याला प्रकाशाच्या वाटा दाखविल्या आहेत. गोष्टींनी अनेकांच्या जीवनात समृद्धतेचा प्रवास घडविला. गोष्ट म्हणजे इतिहास असतो. गोष्ट म्हणजे भविष्य आणि वर्तमानही. गोष्ट सांगत जाते मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास. माणसाला फुलविणार्या विचारांची पेरणी गोष्टीतून होत जाते. गोष्ट म्हणजे माणसांना प्रेरणा देणार्या प्रेरणेचा उर्जा स्रोत आहे. गोष्टीतून उलगडत जाते अनेकदा अनेकांचे आयुष्य आणि घडत जाते जीवनाच्या वाटचालीचे मार्गदर्शन. गोष्ट विचार पेरत जाते. सत्याचे दर्शन घडवत जाते. जीवनाला उभारी देते. गांधी नावाच्या महापुरूषाच्या आयुष्यात हरिचंद्र तारामती यांच्या सत्यावरील प्रेमाची गोष्ट आली आणि सत्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नरेंद्र दत्त यांच्या जीवनात वर्डस्वथ यांची कविता आली त्यांचा विवेकानंदाच्या दिशेने प्रवासास आरंभ झाला. अरिस्टॉटल यांच्या कथांनी अनेकाच्या आयुष्याला आकार दिला.
अनेकदा गोष्टी म्हणजे अभ्यासापासून दुरावणे असे वाटते; पण गोष्ट म्हणजे अभ्यास असतो हे कसे विसरता येईल. अभ्यासासाठी लागणारी पूरक माहिती गोष्टीतून मिळत असते. पाठातील लेखक, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक यांचा जीवनपट, त्यांची जडणघडण अतिरिक्त माहिती मिळत जाते. गोष्टीतून पाठाच्या संबंधी आशयाच्या जवळ पोहचण्यास मदत होते. कधीकधी पाठाच्या जन्मकथा देखील वाचण्यात आल्यावर त्या पाठाच्या संबंधाने विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण होण्यास मदत होते. गोष्टीने नवनवीन शब्द जाणून घेऊन शब्दसंपत्तीत वृद्धी होते. शब्दांचे उपयोजन करण्याची क्षमता उंचावते. भाषेच्या विविध लकबी, शैलीची समज वाढते. परिसराची माहिती मिळते. जगाच्या संस्कृतीचा परिचय होतो. गोष्टीतून शहाणपणाची पेरणी होते. मुलांना विचार करण्यासाठी प्रेरित करण्याची शक्ती गोष्टीत सामावलेली असते. विचार मिळतो त्याप्रमाणे कल्पनेची भरारी घेण्याची शक्ती मिळते. अनेकदा अर्धी गोष्टी वाचून मुले स्वतःच्या अनुभवाशी जोडून त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नाने मुलांना कल्पनेची भरारी घेण्याची शक्ती येत असते. गोष्टीतून इतिहास आणि त्या काळातील परिस्थिती, साधने, जीवनव्यवहार, लोकव्यवहार कळत असतो. त्यामुळे गोष्ट निश्चित परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी गोष्ट उपक्रमाची गरज होती. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर भाषिक कौशल्याची वृद्धी आणि समृद्धतेची वाटचाल चालणे घडणार आहे. सृजनशीलतेला बहर येईल. खरेतर पुस्तके वाचायची असतात ती कल्पक बनण्याच्या दृष्टीने सृजनशक्तीचा विकास व्हावा या करिता. प्रत्येक वयोगटाला अनुरूप ते प्रश्न आहे. जसे पुस्तकातील कोणती चित्रे तुम्हाला आवडली ? असा प्रश्न आहे. प्रश्न सोपा असला तरी यामागे कार्यकारण भावाचा विचार आहे. आवडणारी चित्रे पाहून मुलांना अभिरूची जाणता येणार असते. जिभेला चकवा देणार्या शब्दरचना विचारण्यात आल्या आहेत. त्या स्वरूपाच्या रचना देण्यात आलेल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांना त्या शोधणे, तयार करणे. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे चिंतन व मनन करणे घडणार आहे. या गंमतीतून मुले भविष्यात काव्य लेखनाच्या दिशेने आपला प्रवास करू शकतील. तुम्हाला गोष्टीतील उडणार्या रिक्षातून प्रवास करायला मिळाले तर तुमचे गाव कसे दिसेल याची कल्पना करा. यात शहर, गावातील नकाशा तयार करणे. शहरातील मुख्य ठिकाणे दाखविणे अपेक्षित आहे. यात भूगोल असला तरी नकाशाचे प्रमाण आहे, गणित शिकणार आहे. यामुळे विद्यार्थी किमान शहरात काय महत्त्वाचे आहे ते कोठे आहे हे दाखवतील. त्यातून त्यांना त्या संस्था समजणे, त्या निर्देशित करणे, त्यासाठीचे चिन्हे वापरणे घडेल. यासारखे कल्पक स्वाध्याय, कृती विद्यार्थ्यांना कल्पक बनवतील, यात शंका नाही.
विद्यार्थ्यांना पाठांतर आणि प्रश्नोत्तरे परीक्षेपुरते हवे असले तरी यासारख्या उपक्रमातून त्यांना आनंद मिळणार आहे. या कृती आनंदाने करतील. गोष्टीचा आशय आणि कृतीसाठी दिशा यातून त्याची नवी गोष्ट निर्माण होईल. कधीकधी गोष्टीतील अनुभवाची कविता देखील जन्म घेईल. मुलांचे भावविश्व आणि कल्पनेच्या भरारीमुळे मुले अधिक सृजनशील होतील हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे ही गोष्ट नेहमी वर्गात व्हायला हवी. वाचनाने व्यक्ती समृद्ध होईल; पण त्यासोबत समाजाची उंची उंचावण्यास मदत होणार आहे. वाचनासाठीचे प्रयत्न सरकारसोबत समाज व विविध सामाजिक संस्थांनी देखील करण्याची गरज आहे. वाचनाने समाज अधिक गतीशील आणि प्रगतीच्या दिशेने झेपावतो. त्यामुळे मुलांच्या मनावरील ताण, अभ्यासाचा जाणवणारे ओझे कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांची तणावातून मुक्ती होईल. पुन्हा एकदा आनंदाच्या वाटा या निमित्ताने उभ्या राहतील. त्या वाटा तुडविताना विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका होणार आहे. सध्या समाजमाध्यमांचा प्रभाव वाढत आहे. घरात आलेल्या दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांनी मुलांच्या कल्पनेच्या भरारीची क्षमता आणि विचार प्रक्रिया कुंठीत केली आहे. अनेकदा त्यातील गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणार्या असतील असे नाही. त्या वयाला अनुरूप काय आहे हे जाणून घडेलच असे नाही. जीवनाला प्रेरणा देणार्या त्या गोष्टी नसतील तर त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर होतो. पाहून कृती करणे, चिंतन करणे, विवेकाच्या दिशेने शहाणपणाची पाऊलवाट चालणे होईल असे नाही. त्यामुळे मुलांच्या शहाणपणासाठी गोष्टी अधिक उपयोगी ठरू शकतात. याकरिता पुस्तकांचा विचार अधिक गंभीरपणे करायला हवा आहे. पुस्तकांमध्ये वर्गांचा विचार करून, चित्रे, आशय दिलेला आहे. त्या पुस्तकामध्ये शब्दांचा आकार, भाषा, चित्रे, प्रसंग या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. त्यांचा विचार सुक्ष्मतेने झालेल्या आहेत. श्रेणीबद्ध विचार करीत पुस्तके मुलांच्या हाती पडणार असल्याने मुलांना निश्चित वाचनीय आणि अभ्यासपूरक काही मिळणार आहे. त्यामुळे किमान ज्यांच्या हाती ते मिळतील त्यांना तरी त्याचा लाभ होऊ शकेल. त्यामुळे पुस्तके वाचनाला कोणताही पर्याय असू शकत नाही. जग कितीही वेगाने गती घेत असले तरी शहाणपणासाठी पुस्तकांना पर्याय नाही. हाती पुस्तके घेऊन समृद्ध झाला तर उद्च्या महानतेचा प्रवास घडेल. त्यातच उदयाचा उषःकाल आहे.
Related
Articles
दिल्ली पोलिसांकडून रेल्वे कर्मचार्यांना अतिदक्षतेचा इशारा
12 Sep 2024
हवामानातील बदल, बदलते मनही !
08 Sep 2024
वनराज नव्हे तर, संपूर्ण आंदेकर टोळीलाच संपवायचे होते
08 Sep 2024
खेळाडूंनी जास्तीत जास्त सुवर्ण पदके मिळवावी : मनसुख मांडविया
08 Sep 2024
अमानतुल्ला यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
11 Sep 2024
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन