ओडिशात बटाट्याचे दर भडकले   

पश्चिम बंगालमधून पुरवठा रोखला

भुवनेश्वर : पश्चिम बंगालमधून पुरवठा रोखण्यात आल्यामुळे ओडिशात बटाट्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बटाट्याचे दर भडकले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालमधून ओडिशात बटाट्याचा पुरवठा रोखला आहे. त्यामुळे ओडिशातील स्वयंपाकघरातून बटाटा गायब झाला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा सीमेवर बटाट्यांच्या पोत्यांनी भरलेल्या शेकडो मालमोटारी उभ्या आहेत. त्यांना ओडिशात जाण्यास पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी देखील परवानगी दिली नाही. बटाटे खराब होतील, या भीतीने अनेक मालमोटारी परतही गेल्या आहेत. 
 
ओडिशातील व्यापार्‍यांनी सांगितले की, ३० ते ३३ रुपये प्रति किलोप्रमाणे आम्ही बटाटा विकत होतो. आता टंचाईअभावी तो ४० रुपये प्रति किलोप्रमाणे किरकोळ बाजारात विकावा लागत आहे. परिस्थिती सुधारली नाही तर किंमती आणखी वाढणार आहेत. 
 
ओडिशा सरकारने पश्चिम बंगाल सरकारशी तातडीने चर्चा करावी आणि बटाट्यांच्या पुरवठ्यासाठी मालमोटारीकरिता हिरवा कंदील देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अखिल भारतीय ओडिशा व्यापारी संंघटनेचे सचिव सुधारक पंडा यांनी केले. पश्चिम बंगालमधून बटाट्याचा पुरवठा रोखण्यात आला आहे. त्याचे परिणाम ओडिशाला भोगावे लागत असल्याचे अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्णा पात्रा यांनी दिली. ग्राहकांचे हित लक्षात घेता पंजाब आणि उत्तर प्रदेशातून बटाटा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.  दरम्यान, ओडिशात दिवसाला ॒४ हजार ५०० मेट्रिक टन बटाटा लागतो  त्याचा पुरवठा प्रामुख्याने पश्चिम बंगालमधून केला जातो. 

Related Articles