बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा यांचे निधन   

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत

रांची : झारखंडचे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा नुकतेच वाहनाच्या टपावरून पडून जखमी झाले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिली.
 
झारखंड येथील कुंती जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी मंगल मुंडा (वय ४५)  वाहनाच्या टपावरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमांमुळे मेंदूतील दोन्ही भागांत रक्ताच्या दोन गाठी झाल्या होत्या. गंभीर जखमांमुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले; परंतु अपयश आले, अशी माहिती डॉ. हिरेन बिरुआ यांनी दिली. 
 
गुरूवारी त्यांना कुंती येथील सरदार रुग्णालयातून रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे अधिक उपचारासाठी हलविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगल मुंडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुंडा यांच्या जाण्यामुळे झारखंडमधील आदिवासी समुदायाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल संतोष गंगवाल, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन आणि अन्य नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  
 

Related Articles