बांगलादेशातील हिंदू नेत्यासह १७ जणांची बँक खाती गोठवली   

ढाका : हिंदू नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी आणि इस्कॉनशी संबंधित १७ जणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. खाती ३० दिवस गोठवण्याचे आदेश बांगलादेशच्या अर्थ प्राधिकरणाने दिले आहेत. 
 
ब्रह्मचारी आणि १७ जणांची बँक खाती गोठवावी, असे आदेश बांगलादेश बँक फायनान्स इंटलिजन्स युनिटने विविध बँकांना गुरूवारी दिले. खात्यांतून महिनाभर कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. याबाबतचे वृत्त प्रोथम अलो वृत्तपत्राने दिले. बँका आणि अर्थविषयक संस्थांनी बँक खात्याबाबतचा आणि व्यवहार कोणते झाले ? याचा तपशील देण्यास सांगितले आहे. संबंधित खातेधारक कोणता व्यवसाय करतात ? याची माहिती तीन दिवसांत देण्याचे आदेशही दिले आहेत.
 
दरम्यान, चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना ढाका येथील विमानतळावर गेल्या सोमवारी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यांची रवानगी तुरुंगात केली होती.  चिट्टोग्राम येथे सुरक्षा रक्षक आणि ब्रह्मचारी समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीवेळी एका वकील ठार झाला होता. या प्रकरणी त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोपही ठेवला होता. बांगलादेशातील मंदिरे आणि अल्पसंख्याक हिंदू धर्मीयांना सुरक्षा द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नुकताच मेळावा आयोजित केला होता. त्यामुळे कट्टरपंथी मुस्लिम धर्मीय संतप्त झाले होते. त्यांनी इस्कॉन, हिंदू नेते आणि समर्थकांवर खोटे आरोप केले होते. 

Related Articles