मोटार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू   

सांगली : सांगलीनजीक कृष्णा नदीवरील अंकली पुलावरून मोटार नदीत कोसळून पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातात मरण पावलेले तिघेही सांगलीचे रहिवासी आहेत.
 
सांगलीत राहणारे खेडेकर आणि नार्वेकर कुटुंबीय कोल्हापूर येथील लग्नसोहळा आटोपून मध्यरात्री सांगलीकडे  परतत  होते. कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीवर जुना आणि नवा असे दोन पूल असून, ते एकमेका लगत आहेत. त्यापैकी जुन्या पुलावरून सांगलीकडे येणार्‍या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती दोन्ही पुलाच्या मधील भागातून नदीत कोसळली. मोटार पुलाच्या पिलर नजीकच्या कोरड्या भागावर आदळली. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस आणि जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहा जणांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय-३५), त्यांची पत्नी प्रेरणा (रा. मारुती रोड, गावभाग, सांगली), वैष्णवी संतोष नार्वेकर (वय-२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) या तिघांचा मृत्यू झाला. तर समरजीत प्रसाद खेडेकर (वय-७), वरद संतोष नार्वेकर (वय-१९) आणि साक्षी संतोष नार्वेकर (वय-४२) त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles