युद्धखोर जगाला शांततेच्या संदेशाची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस   

पिंपरी : युद्धखोर जगाला शांततेच्या संदेशाची गरज असून बौद्ध, महावीर आणि गांधींची भूमी हा संदेश देऊ शकते! असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ज्ञानदीप विद्यालय, रूपीनगर, तळवडे येथे  व्यक्त केले.
 
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ.  सबनीस बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागप्रमुख डॉ. महेश देवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच कृषिभूषण सुदाम भोरे, रूपीनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर दळवी, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
पाली - मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वार्षिक शब्दोत्सवाच्या सहाव्या उपक्रमांतर्गत ज्ञानदीप विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सूर्यकांत भसे यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागातील डॉ. लता देवकर (लोकशिक्षक बाबा भारती पाली भाषा पुरस्कार), पिंपरी - चिंचवड महापालिका शाळा मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले (लोकशिक्षक बाबा भारती शिक्षकप्रतिभा पुरस्कार), ज्येष्ठ पत्रकार नारायण बडगुजर (लोकशिक्षक बाबा भारती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार), कवयित्री सविता इंगळे (लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार), लेखक प्रभाकर वाघोले (लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. 
 
पुरस्काराला उत्तर देताना सूर्यकांत भसे यांनी, कामगारांनी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत दीर्घकाळ काम करायला मिळाले याचा आनंद आहे. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत हे संस्थेचे धोरण असल्याने हा पुरस्कार शाळेचा आहे! अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सुधाकर दळवी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या; तर सुदाम भोरे यांनी, आपल्या वडिलांनी पाली भाषेसाठी केलेले कार्य समाजापुढे यावे यासाठी महेंद्र भारती सातत्याने प्रयत्नशील आहेत, ही स्तुत्य बाब आहे! असे मत व्यक्त केले. डॉ. महेश देवकर यांनी आपला जीवनप्रवास कथन करीत, नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेण्यापेक्षा जीवनात आनंद निर्माण होईल असे शिक्षण घ्या! असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. 
 
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, जगाला प्रेम अर्पावे म्हणणारे सानेगुरुजी आणि लोकशिक्षक बाबा भारती यांचा पेशा एकच होता. इस्लामपूरसारख्या ग्रामीण भागात वास्तव्य करूनही पाली भाषेसाठी केलेल्या कार्यामुळे बाबा भारती यांच्या कार्याचा सुगंध श्रीलंकेपर्यंत जाऊन पोहोचला. सध्या देशातील किंबहुना जगातील वातावरण गढूळ झाले आहे. जातीय आणि धार्मिक अस्मिता टोकदार झाल्या आहेत. बौद्ध धर्म माणूस माणसाला जोडण्याचे काम करतो; तसेच महावीर आणि गांधी यांच्या अहिंसेचे तत्त्वज्ञान शांततेचा संदेश देणारे आहे. बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध धर्मातील माणूस जोडण्याचे काम सुरू आहे!
 
डॉ. भीम गायकवाड यांनी गायलेल्या गीताने आणि वृक्षपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी खरा तो एकचि धर्म... ही प्रार्थना आणि स्वागतगीत गायन केले; तर प्राचार्य सुबोध गलांडे यांनी शाब्दिक स्वागत केले. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून बाबा भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles