पुणे विमानतळावरून प्रवासी वाहतूक वाढली   

महिन्याभरात साडेआठ लाख प्रवाशांचा प्रवास 

पुणे : देशातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. त्यामुळेच देशातून विविध कामासाठी शहरात येणार्‍यांची तसेच जाणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. वाढलेल्या प्रवाशांमुळे पुणे विमानतळ ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहतूकीत नवव्या स्थानावर आले आहे. दिवसेंदिवस पुणे विमानतळावरून प्रवासी वाहतूकीत वाढ होत आहे. 
 
ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरून ८ लाख ५९ हजार २२९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे या महिन्यात पुणे विमानतळ देशात ९ व्या क्रमांकावर आले आहे. या महिन्यात पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढली होती. ही प्रवासी संख्या देशातील इतर विमानतळांच्या तुलनेत ९ व्या क्रमांकाची होती. समाधानकारक प्रवासी सुविधा पुरवण्यात पुणे विमानतळ जगात ७६ क्रमांकावरून ७४ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. नुकतेच विमानतळ प्राधिकरणाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार आता प्रवासी वाहतूकीमध्ये देखील पुणे विमानतळ ९ व्या क्रमांकावर आले आहे. 
 
प्रवासी वाहतूक संख्येत पहिल्या क्रमांकावर दिल्ली विमानतळ आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर मुंबई विमानतळ आहे. तिसर्‍या क्रमांकावर बंगळुरू, चौथ्या क्रमांकावर हैदराबाद, पाचव्या स्थानावर कोलकत्ता, सहाव्या क्रमाकांवर चेन्नई, सातव्या अहमदाबाद, आठव्या क्रमांकावर कोची तर नवव्या क्रमांकावर पुणे विमानतळ आहे. तसेच, दहावा क्रमांक गोव्यातील डाबोलिम विमानतळाचा लागत आहे. चांगल्या सुविधेमुळे पुणे विमानतळावरून प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांत वाढ होत असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सागण्यात आले. 

विमानांच्या उड्डाणात वाढ व्हावी

प्रवासी वाहतुकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पुणे पहिल्या दहा मध्ये आहे. आता नवीन टर्मिनलमुळे चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुण्यातून विमानोड्डाणांची संख्या अधिक वाढायला हवी, अशी अपेक्षा आहे. जेणेकरून पुणे विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचा क्रमांक अधिक चांगला येईल. क्रमवारीत अधिक सुधारणा होण्यासाठी विमानतळ प्रशासनाने उड्डाणे वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. 

धैर्यशील वंडेकर, हवाई तज्ञ

Related Articles