लोकमान्य टिळकांचे परराष्ट्रमंत्री - वासुकाका जोशी   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस

प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजगोपालचारी, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि इतर महनीय व्यक्तींच्या अनेकविध चळवळीत ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तसेच स्वतःकडे कोणतेही श्रेय न घेता आपले जीवन सत्तर वर्षांहून अधिक काळासाठी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी समर्पित केले ते म्हणजे क्रांतीकारक वासुकाका जोशी. लोकमान्य टिळक यांचे परराष्ट्रमंत्री असे त्यांना संबोधले जायचे.
 
स्वातंत्र्य लढ्याबरोबरच वासुकाका जोशी यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी उपलब्ध होणार्‍या सर्व साधनांचा आणि मार्गाचा वापर त्यांनी केला. ज्या काळात भारतामध्ये साधी लाठीसुद्धा वापरण्यास आणि घरात ठेवण्यास इंग्रज शासनाची बंदी होती, त्या काळात भारत देशाची गुलामगिरीतून सुटका व्हावी, म्हणून त्यांनी देशभक्तीसाठी वेगवेगळ्या आंदोलनाबरोबरच मळलेली वाट सोडून गुप्त राजनीती व क्रांतीकारितेचा काटेरी रस्ताही अंमलात आणला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी रक्त सांडल्याशिवाय पर्याय नाही, ही विचारधारा विशेषतः त्यावेळचा मुंबई प्रांत आणि बंगाल प्रांत यामधील क्रांतिकारकांच्या मनात खोलवर रुजली होती. हातात कोणतेही शस्त्र न घेता सशस्त्र क्रांतीच्या चळवळीला लोकमान्य टिळक आणि वासुकाका जोशी यांनी हातभार लावला.
 
रँडच्या खुनानंतर १८९७ मध्ये लोकमान्य टिळक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक झाली. त्या वेळी कोर्ट-कचेरीच्या खर्चासाठी जीवाचे रान करून पैसे जमा करण्यात वासुकाका जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अखिल भारतीय पातळीवर देशाचे पहिले नेते म्हणून लोकमान्य टिळक यांनाच मान्यता होती. सर्व प्रदेशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्यांचे नाव पोचले आणि सर्वच भागात ज्यांना अनुयायी लाभले त्या लोकमान्य टिळक यांच्यामुळे महाराष्ट्राचे नावही सर्वतोमुखी झाले. इतिहासात टिळक युग म्हणूनच याची नोंद झाली.

स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थान

स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व टिळकांचे निधन होईपर्यंत महाराष्ट्राकडेच होते. लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांतीमध्ये ज्यांचा विशेषतः बंगालच्या फाळणी विरोधात २० जुलै १९०५ रोजी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केल्यापासून सहभाग होता त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे बारींद्रकुमार घोष यांचे सहकारी हेमचंद्र दास. आपली स्थावर संपत्ती विकून हेमचंद्र दास यांनी १९०६ च्या सप्टेंबरमध्ये फ्रान्सला प्रयाण केले. तेथे अभिनव भारत या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संस्थेच्या सहाय्याने रशियन निहिलिस्टांशी संधान बांधून बॉम्बची विद्या हस्तगत केली. बॉम्बचा फॉर्म्युला घेऊन परतल्यानंतर त्यांनी पुणे येथे सुरत काँग्रेसच्या अधिवेशनानंतर चित्रशाळेचे वासुकाका जोशी यांच्या चित्रशाळेत लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांना या फॉर्म्युलाचे प्रात्याक्षिकही दाखविले. यानंतरच स्वातंत्र्यलढ्यात बंगालमध्ये बॉम्बचा प्रथम वापर झाला. वासुकाका जोशी आणि चित्रशाळा हे संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे पुण्यातील केंद्रस्थान होते.
 
सशस्त्र क्रांतीसाठी प्रयत्न करणारा एखादा तरुण टिळकांच्याकडे आला की, त्याची पाठवणी चित्रशाळेत वासुकाका जोशी यांच्याकडे व्हायची. वासुकाका अशा गरजू व अडचणीत आलेल्या युवकांना आर्थिक सहाय्य करीत, तसेच वेळप्रसंगी दूरवरच्या वेगवेगळ्या संस्थानिकांच्या हद्दीमधील गावी त्यांना लपवून ठेवीत. १८९७ मध्ये रँडच्या वधानंतर वासुकाका जोशी दोन वर्षाहून अधिक काळ भूमिगत होते. छत्र्यांच्या सर्कशीबरोबर देश-विदेशात हिंडत त्यांनी हा काळ व्यतीत केला. चाफेकर बंधू यांच्या कट-कारस्थानात त्यांचा सहभाग होता असे म्हटले जाते. चाफेकर बंधूपैकी बाळकृष्णपंत चाफेकर यांना गायब करून त्यांची सुरक्षित व्यवस्था वासुकाकांनीच केली होती. दामोदरपंत चाफेकर यांना पकडल्यानंतर दक्षिणेत चाफेकर यांना बिसरहल्हीला दडवून ठेवले होते. चाफेकर बंधू बर्‍याचदा चित्रशाळेत बसत असत. चाफेकर प्रकरणाची धूळ खाली बसल्यानंतर वासुकाका जोशी पुण्यात प्रगट झाले. 
 
महाराष्ट्राच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात हिंदू राष्ट्र असलेले नेपाळ आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांच्या मदतीने ब्रिटीश भारतावर चाल करून देश स्वतंत्र करायचा अशी एक योजना मराठी तरुणांच्या मनात, घोळत होती. या योजनेला लोकमान्य टिळकांनी चालना दिली. १९०१ मध्ये कोलकात्याच्या अधिवेशनात लोकमान्य टिळक आणि वासुकाका जोशी यांनी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची भाची जी माताजी म्हणून कोलकात्यामध्ये स्वातंत्र्यलढ्यात गुप्तपणे सहभागी होती त्यांची भेट घेतली. माताजी यांची नेपाळ नरेशाशी संबंध असल्याने या दोघांची भेट करून देण्याचे त्यांनी कबूल केले. ठरल्याप्रमाणे भेटीगाठी झाल्या. लोकमान्य टिळक, वासुकाका जोशी आणि केसरीतील सहकारी व प्रसिद्ध नाटककार कृष्णाजीपंत प्र.खाडिलकर यांनी नेपाळ दरबारात जम बसविला. नेपाळमधून आठ विद्यार्थ्यांची एक तुकडी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी जपानला पाठविण्यात आली. जर्मनीमधील प्रख्यात क्रप्स कंपनीने लष्करी साहित्याची निर्मिती करणारा एक छोटा कारखाना नेपाळमध्ये सुरू करण्याची तयारी केली. त्या कारखान्याची काही यंत्रसामुग्री कोलकात्याला येऊन पडली; पण ही खबर ब्रिटीश सत्ताधार्‍यांना समजली आणि चौकशीची चक्रे सुरू झाली. त्यामुळे नेपाळच्या महाराजांनी लष्करी तयारीसाठी नेपाळात आलेल्या तज्ज्ञांना देश सोडून जाण्यास सांगितले. वासुकाका जोशी, कृ.प्र. खाडिलकर, कोल्हापूरचे दामू जोशी, जबलपूरचे हणमंतराव कुलकर्णी यांनी धडपड करून आखलेली चांगली योजना देशाच्या दुर्दैवाने फलद्रुप झाली नाही.

मुळशी सत्याग्रहात तुरुंगवास

१९२० मध्ये टिळकांचे निधन झाल्यामुळे देशाच्या राजकारणात नेतृत्त्वाची मोठी पोकळी निर्माण झाली; पण ती महात्मा गांधी यांनी भरून काढली. महाराष्ट्रामध्ये टिळक पंथीय आणि लोकमान्य टिळक यांच्या आतल्या गोटातले-जवळचे वासुकाका जोशी, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, शिवरामपंत परांजपे, गंगाधर देशपांडे यांनी महात्मा गांधी यांचे कर्तृत्व ओळखून संपूर्ण महाराष्ट्र महात्मा गांधी यांच्या बरोबर नेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. १९२१ मध्ये मुळशी सत्याग्रहात वासुकाका जोशी यांना तुरुंगवास घडला. १९३२ मध्ये महात्मा गांधी यांच्या आवाहनाप्रमाणे जेधे, पळसुले, ज.स. करंदीकर, दिवेकर, का. ठ.जाधव वगैरेंच्यासह कायदेभंगाची वासुकाका जोशी यांनी मिरवणूक काढली म्हणून त्यांना पकडण्यात आले व त्यांना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. वासुकाकांचे वय, सामाजिक दर्जा, आर्थिक परिस्थितीचा वगैरे विचार करून मॅजिस्ट्रेटने त्यांना तुरुंगासाठी ’अ’ वर्ग दिला. त्यावर्षी मुंबई प्रांतात सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, भुलाभाई देसाई एवढ्यांनाच त्यांच्याबरोबर ’अ’ वर्गाचा तुरुंगवास होता. वासुकाका ’अ’ वर्गात तुरुंगवासात असताना कलेक्टर फिरतीवर आले त्यावेळेस त्यांच्याकडे वासुकाकांनी ’मला खडी फोडण्याचे काम हवे आहे’ अशी मागणी करत आम्ही तुरूंगात कष्ट सोसण्याकरता आलो असून त्यामुळेच देशाचा उद्धार होणार आहे असे म्हटले. त्यावेळी वासुकाकांचे वय ७८ वर्षे होते.
 
वासुकाकांचा येरवड्यातील ’अ’ वर्ग लवकरच संपला आणि ’ब’ वर्गाच्या तुरुंगवासासाठी त्यांची नाशिकला रवानगी करण्यात आली. नाशिकला तुरुंगाला छोट्या काँग्रेसचे स्वरूप आले होते. वल्लभभाई पटेल, भुलाभाई देसाई, बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, जेधे, जावडेकर, नगिनदास, ब्रेलवी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन वगैरे मंडळी वासुकाका जोशी यांच्याबरोबर होती. तुरूंगवासातून सुटल्यानंतर त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य चालूच होते. १९३४ सालानंतर वयाची ८० पूर्ण झाल्याने पूर्वीचा वासुकाका जोशी यांचा जोम व उत्साह कायम राहिला नाही. १९३९ सालापासूनच त्यांची प्रकृती ढासळू लागली. १९३८ मध्ये त्यांचे एकुलते एक चिरंजीव रामभाऊ जोशी यांचे निधन झाले. १९४० मध्ये वैयक्तिक कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. वासुकाकांनी गांधीजींकडे वयाच्या ८६ व्या वर्षी भाग घेण्यासाठी परवानगी मागितली. त्यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष त्र्यं. र. देवगिरीकर होते. वासुकाकांच्या सूचनेप्रमाणे देवगिरीकर यांनी गांधींच्याकडून मंजुरी मिळविली. त्यामुळे त्यांना आनंद झाला; पण वासुकाकांची तब्बेत पुन्हा बिघडलेली बघितल्याने गंगाधरराव देशपांडे यांनी चित्रशाळेतून महादेवभाईंना पत्र लिहिले आणि महात्मा गांधी यांनी दिलेली मंजुरी रद्द केली. वासुकाकांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याचे त्यांना फार दुःख झाले. गंगाधररावांना ते म्हणत... ’माझ्यासारख्याला तुरूंगात मरण आलेले काय वाईट?’.

चित्रशाळेमुळे ओळख

वासुकाका जोशी ओळखले जात ते त्यांच्या ’चित्रशाळा’ नावाच्या प्रकाशनगृह आणि देशातील स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांचे चळवळीचे पुणे येथे केंद्रीय ठिकाण म्हणूनच. सातारा जिल्ह्यातील वाई या इतिहासप्रसिद्ध गावापासून पाच-सहा मैलांवरील धोम या कृष्णातीरावरील गावात वासुकाकांचा जन्म २८ एप्रिल १८५४ रोजी झाला. लोकमान्य टिळकांपेक्षा ते सव्वादोन वर्षांनी मोठे होते. १८६८ मध्ये ते शिक्षणासाठी पुण्यात दिलेल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. मॅट्रिकऐवजी त्यांनी शेतकी शाळा निवडली; पण हे शिक्षणही त्यांचे पूर्ण होऊ शकले नाही. वासुकाकांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे निबंधमालेचे व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारल्यामुळे. पुण्यामध्ये चिपळूणकर सरकारी हायस्कूलमध्ये नोकरी करीत; पण त्यांच्या निबंधमालेच्या कार्यामुळे त्यांची बदली रत्नागिरी येथे करण्यात आली. निबंध मालेचा व्यवसाय पाहण्यासाठी चिपळूणकरांना एका होतकरू तरुणाची आवश्यकता होती. त्र्यंबकराव जोशी यांच्या शिफारशीवरून वासुकाका जोशी निबंधमालेचे व्यवस्थापक झाले आणि त्यांनी आर्थिक शिस्त लावून आपले व्यवहारज्ञान व व्यवस्थापन कौशल्य सिद्ध केले. पुढे विष्णुशास्त्री चिपकूणकरांच्या सगळ्याच संस्थांशी त्यांचा संबंध आला. चित्रशाळेची आपल्या कल्पकतेने त्यांनी भरभराट घडवून आणली.
 
दरम्यान चिपळूणकरांनी टिळक, आगरकर, नामजोशी आदी तरुणांच्या मदतीने ’न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा स्थापन करून नंतर ’केसरी’ व ’मराठी’ ही पत्रेही सुरु केली. या सर्व स्थापनेमध्ये वासुकाका जोशी होतेच. करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्यावरील ‘केसरी’ आणि ’मराठा’ मधील कडक लिखाणाबद्दल आगरकर आणि टिळक यांच्यावर बदनामीचा खटला दाखल झाला तेव्हा त्यांना जामीन देण्यासाठी जोतीराव फुले यांचे निकटस्नेही रामशेठ उरवणे यांनी दहा हजार रुपयांची तजवीज केली; परंतु प्रत्यक्ष खटला चालविण्यासाठी अजून चार हजार रुपयांची गरज होती. चिपळूणकर यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. वासुकाकांना कळल्यावर त्यांनी आपल्या जवळचे सोन्याचे दागिने तारण ठेऊन ती रक्कम उभी करून चिपळूणकर यांना दिली. वासुकाका यांनी १८८२ मध्ये चित्रशाळेत रामपंचायतनचे रंगीत चित्र छापले. हे चित्र एवढे लोकप्रिय झाले की, चित्रशाळेचा उत्कर्षच झाला. अमेरिकेमध्ये स्वामी रामतीर्थ त्यांना भेटले जे वासुकाका यांना गुरुस्थानी मानत. लोकमान्य टिळक व वासुकाका यांचा ४० वर्षे संबंध होता. टिळकांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी भाग घेतला, नंतरच्या काळात २४ वर्षे ते महात्मा गांधींशी जोडले गेले. ९० व्या वर्षी १२ जानेवारी १९४४ रोजी निधन होईपर्यंत ते स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत होते. अर्वाचीन इतिहासात नोंद असणार्‍या एका थोर व कर्तृत्वसंपन्न व्यक्तीस भारत स्वतंत्र झाल्याचे बघण्याचे भाग्य लाभले नाही; पण त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अविस्मरणीय आहे.
 

Related Articles