E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
दिलासादायक उद्योगचित्र
Samruddhi Dhayagude
25 Nov 2024
कैलास ठोळे
गेल्या दहा वर्षांमध्ये प्राप्तिकर भरणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण दुचाकी विक्रीत 14.2 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, स्मार्टफोन निर्यातीचे मागील विक्रम मोडीत काढत आयफोन निर्यातीने मागील सात महिन्यांमध्ये साठ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला. भारताच्या सौर उत्पादनांची निर्यात गेल्या दोन वर्षांमध्ये 20 पटींनी वाढली. असाच विकासवेग अन्य क्षेत्रांमध्येही पहायला मिळत आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा कमी झाला आहे. विशेषत: 20 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गावरील कराचा बोजा कमी होत आहे, तर 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्राप्तिकराचे परतावे दाखल करणार्यांच्या संख्येत पाच पटींनी वाढ झाली आहे. गेल्या दशकात प्राप्तिकर भरणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते. सध्याच्या सरकारने लागू केलेल्या करचोरी आणि काळ्या पैशाविरोधातील कडक कायद्यांमुळे करदात्यांची संख्या वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न दाखवणार्या लोकांची संख्या 2023-24 मध्ये 9.39 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. हा आकडा 2013-14 मधील 1.85 लाखांपेक्षा पाचपट अधिक आहे. 50 लाखांपेक्षा जास्त कमाई करणार्यांचे प्राप्तिकर दायित्व 2014 मध्ये 2.52 लाख कोटी रुपयांवरून 2024 मध्ये 9.62 लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच 3.2 पटीने वाढले आहे. भारतीय दुचाकी बाजारासाठीही एक आनंदाची बातमी आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात दुचाकींची विक्री 21.64 लाख युनिट्सवर पोहोचली. ऑक्टोबर 2023 मध्ये हा आकडा 18.96 लाख होता. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने या संदर्भात नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण दुचाकी विक्रीत 14.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये दसरा आणि दिवाळी या दोन प्रमुख सणांमुळे चांगली खरेदी झाल्याचे ऑटोतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पारंपारिकपणे, या काळात लोकांना वाहने खरेदी करण्याची इच्छा असते. या उत्सवाचा वाहन उद्योगावर सकारात्मक परिणाम होत आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये ‘पॅसेंजर व्हेईकल’ने 3.93 लाख युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली. या दरम्यान तीनचाकी वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत 0.7 टक्क्यांची घट झाली आहे. काही बाजार विश्लेषकांच्या मते दुचाकींच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण ग्रामीण भागातील लोकांचे वाढलेले उत्पन्न आहे. एकूणच, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत संमिश्र कामगिरी पाहिली. ‘सियाम’च्या मते, ऑक्टोबरमध्ये भारतात एकूण 3,67,185 प्रवासी वाहनांची निर्मिती झाली. यामध्ये 1,28,097 प्रवासी कार, 2,26,924 युटिलिटी वाहने आणि 12,164 व्हॅनचा समावेश आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, भारतात 1,56,250 प्रवासी कार, 2,13,380 युटिलिटी वाहने आणि 12,759 व्हॅन्सची निर्मिती झाली. म्हणजेच, प्रवासी कार आणि व्हॅनच्या उत्पादनात अनुक्रमे 18 टक्के आणि 4.7 टक्क्यांची घट दिसून आली आहे; परंतु ऑक्टोबर 2024 मध्ये युटिलिटी वाहनांच्या उत्पादनात 6.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. असाच ट्रेंड देशांतर्गत विक्रीमध्येही दिसून आला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये 2,25,934 युटिलिटी वाहने विकली गेली, तर ऑक्टोबर 2023 मध्ये 1,98,356 युटिलिटी वाहने विकली गेली, म्हणजेच 13 टक्के वाढ झाली. ‘ह्युंदाई मोटर इंडिया’ वाहन उद्योगातील तेजीमुळे उत्साहित आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ह्युंदाईने अलीकडेच पुण्यात नवीन प्लांट बांधून उत्पादन क्षमता वाढवली. भारतीय बाजारपेठेचे चित्र लक्षात घेऊन धोरणात्मक उत्पादन केंद्र तयार करत असून मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वाढणार्या वाहनांच्या मागणीचा फायदा घेण्याची तयारी ह्युंदाई करत आहे. दुसरीकडे, भारताच्या मोबाईल मार्केटमध्येही विक्रमी व्यवसाय होताना दिसत आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये भारतात बनवलेल्या आयफोन्सच्या निर्यातीचा विक्रम सात अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. स्मार्टफोन निर्यातीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत आयफोन निर्यातीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल-ऑक्टोबर) साठ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. याचा अर्थ असा की दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले जातात. ‘अॅपल’ भारतातून केवळ आयफोन 14, 15 आणि 16 ची निर्यात करत नाही, तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्थानिक पातळीवर आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्सचे उत्पादन सुरू केल्यानंतर या मॉडेल्सचीही निर्यात करत आहे. प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सचे मूल्य इतर आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत सुमारे दीड ते दुप्पट जास्त आहे. त्याच वेळी ‘सायबर मीडिया रिसर्च’ या मार्केट रिसर्च फर्मने म्हटले आहे की जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये भारतातील टॅब्लेट पीसी बाजार वार्षिक आधारावर 46 टक्क्यांनी वाढला आहे. 20 ते तीस हजारांच्या दरम्यान असलेल्या टॅब्लेटच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 108 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 34 टक्के शेअरसह ‘अॅपल’च्या ‘आयपॅड’ने या विभागाचे नेतृत्व केले.
भारत सौर उर्जेच्या क्षेत्रातही सतत वाढ नोंदवत आहे. भारताच्या सौर उत्पादनांची निर्यात गेल्या दोन वर्षांमध्ये 20 पटींनी वाढून दोन अब्ज डॉलर झाली आहे. एका अहवालानुसार, 2022 ते 2024 या काळात भारताच्या सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) उत्पादनांच्या निर्यातीत 23 पट वाढ झाली आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अॅनालिसिस’ आणि ‘जेएमके रिसर्च अँड अॅनालिसिस’च्या अहवालानुसार भारतातील सौर उत्पादनांच्या क्षेत्रात ही लक्षणीय प्रगती आहे. भारतीय सोलर पीव्ही निर्यातीसाठी अमेरिका एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांमध्ये भारतीय सौर पीव्ही निर्यातीपैकी 97 टक्क्यांहून अधिक अमेरिकेला गेली. ‘एमएनआरआय’च्या मते, 453 गीगावॉटच्या एकूण वीजनिर्मिती क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा वाढून 46 टक्के झाला आहे. देशाची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 200 गीगावॉटच्या पुढे गेली आहे. भारताची अक्षय ऊर्जा क्षमता केवळ एका वर्षात 24.2 गीगावॉट (13.5 टक्के) ने वाढून ऑक्टोबर 2024 मध्ये 203.18 गीगावॉटवर पोहोचली आहे. दुसरीकडे, भारतीय दागिन्यांच्या ई-कॉमर्स मार्केटमध्ये जबरदस्त व्यवसाय होताना दिसत आहे. विक्रेते आणि खरेदीदार ऑनलाइन ई-कॉमर्सचा आनंद घेत आहेत. एका अहवालानुसार, ज्वेलरी ई-कॉमर्स मार्केटने तीन वर्षांमध्ये 22 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये ऑनलाइन विक्री वीस टक्क्यांपर्यंत वाढेल. ती सध्या एक टक्का आहे. सोन्याच्या खरेदीच्या पारंपरिक प्रवृत्तीला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे, असे या व्यवसायातील तेजीवरून दिसून येते.
भारतातील सणासुदीने विक्रमी व्यवसाय केला आहे. सणासुदीच्या हंगामातील विक्री 12 टक्क्यांनी वाढून 1.18 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे एका अहवालात म्हटले आहे. यामध्ये केवळ मोठ्याच नाही, तर छोट्या शहरांचाही समावेश आहे. फॅशनविश्वातील विक्रीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. सामान्य व्यावसायिक महिन्यांच्या तुलनेत सणांच्या काळात विक्री तिपटीने वाढली आहे. फॅशनशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती वस्तू आणि किराणा मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. अंतराळ गुंतवणुकीत भारताचे उड्डाण इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एक महत्त्वाची माहिती देताना सांगितले की ‘इस्रो’ने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाला 2.5 रुपये परतावा मिळतो. अंतराळ क्षेत्राने 2014 ते 2024 दरम्यान सकल देशांतर्गत उत्पादनात 60 अब्ज डॉलरचे योगदान देऊन लाखो रोजगार निर्माण केले आहेत. एस. सोमनाथ म्हणाले की या कामगिरीवरून हे दिसून येते की अंतराळ क्षेत्रात भारत जगात आघाडीवरचा देश म्हणून उदयास आला आहे. 2023 पर्यंत भारतीय अंतराळ क्षेत्राचा महसूल 6.3 अब्ज डॉलर्स इतका वाढला आहे. अवकाश क्षेत्राने 4.7 दशलक्ष नोकर्या निर्माण केल्या आहेत. त्यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 96 हजार नोकर्यांचा समावेश आहे.एकंदरीत, अनेक आघाड्यांवर देशातील उद्योग आणि सेवा क्षेत्राची वेगवान वाटचाल सुरु आहे. ही गती पुढील काही वर्षे अशीच सुरु राहण्याची अपेक्षा आहे.
Related
Articles
सत्ता लांबणीवर (अग्रलेख)
02 Dec 2024
अवधुतांचे परम शिष्य - स्वामी परमानंद
05 Dec 2024
हिंदुस्तान युनिलिव्हरचा आईस्क्रीम व्यवसाय होणार स्वतंत्र
02 Dec 2024
पीएमपीची पुणे पर्यटन बससेवेद्वारे प्रवाशांना सवलत
05 Dec 2024
'फेक कॉल', 'मेसेज' होणार बंद
02 Dec 2024
रोहित शर्मा सलामीला नाही?
03 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
निकालांनी काय दाखवले?
4
भाजपला आधार हिंदुत्त्वाचा
5
चक दे इंडिया
6
महागाईची धास्ती, महिलांची मालकी