E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
जागतिक शाश्वत वाहतूक दिवस कशासाठी?
Samruddhi Dhayagude
25 Nov 2024
मेधा इनामदार
‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम’च्या अंदाजानुसार वायू प्रदूषणामुळे दर वर्षी होणारे 2.4 दशलक्ष अकाली मृत्यू टाळले जाऊ शकतात. वाहनांमुळे श्वसन आणि कर्करोगजन्य रोगांसाठी कारणीभूत काळ्या कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असते. जागतिक हवामान बदलामध्येही वायूप्रदूषणाचा मोठा वाटा आहे. हा धोका ओळखून दर वर्षी 26 नोव्हेंबर रोजी जागतिक शाश्वत वाहतूक दिवस साजरा केला जातो.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दर वर्षी 26 नोव्हेंबर रोजी जागतिक शाश्वत वाहतूक दिवस साजरा केला जाईल असे घोषित केले आहे. 2016 मध्ये पहिल्या युनायटेड नेशन्स ग्लोबल सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट कॉन्फरन्समध्ये या कल्पनेची बीजे रोवली गेली. संयुक्त संघराष्ट्राने पर्यावरणपूरक वाहतूक आणि इतर प्रकारच्या वाहतूक समस्यांविषयी सार्वजनिक जागरूकता, माहिती आणि ज्ञान वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे निश्चित केले आहे. दर वर्षी विविध कार्यक्रमांद्वारे हा दिवस जगभर साजरा केला जातो. रोज विविध प्रकारची वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकीपासून अतिविशाल कंटेनरपर्यंत नानाविध वाहने पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. या वाहनांमधून उत्सर्जित होणार्या वायूंमुळे अनेक धोके निर्माण झाले आहेत. केवळ मनुष्यालाच नव्हे तर पशूपक्षी आणि अस्तित्वात असलेल्या इतर दृश्य आणि अदृश्य जीवांनाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या वाहतुकीच्या पद्धती आणि जीवाश्म इंधनावरील आपल्या अवलंबनामुळे पृथ्वीलाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, न जळलेले हायड्रोकार्बन्स आणि पार्टिक्युलेट मॅटर यासारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. हे प्रदूषक मातीत शिरतात किंवा पाण्याचा पुरवठा दूषित करतात, तेव्हा यकृताचे आणि इतर अवयवांचे नुकसान होते. यामुळे कधीही बर्या न होणार्या जन्मदोषांसह मुले जन्माला येतात. अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या तसे यावर उपाय शोधणेही आवश्यक वाटू लागले.
वाहतूक प्रणालींचा पर्यावरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. एकूण जागतिक ऊर्जेच्या वापरामुळे निर्माण होणार्या उत्सर्जनात कार्बन डाय ऑक्साईडचा 20 ते 25 टक्के भाग आहे असे लक्षात आले आहे. बहुतेक उत्सर्जन 97 टक्के जीवाश्म इंधनाच्या थेट जळण्यामुळे होते. युरोपियन युनियनमध्ये हरितगृह वायू उत्सर्जनाचा मुख्य स्त्रोत वाहतूक हाच आहे. 2019 मध्ये एकूण हरितगृह उत्सर्जन जागतिक उत्सर्जनाच्या सुमारे 31 टक्के होते आणि युरोपियन देशांचा यातील वाटा 24 टक्के होता. कार्बन डायऑक्साइडसारखे वायू वातावरणात सोडणे, वीजनिर्मिती आणि उष्णता उत्पादनासाठी जीवाश्म इंधन जाळणे यासारख्या क्रियांमधून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे हरितगृह वायू इन्फ्रारेड सक्रिय असतात. ते पृथ्वीचा पृष्ठभाग, ढग आणि वातावरण यांच्याद्वारे उत्सर्जित केलेल्या तरंगलांबीच्या श्रेणीमध्ये इन्फ्रारेड रेडिएशन शोषून घेतात आणि उत्सर्जित करतात. त्यामुळे ते हवेत मिसळले जातात आणि हवा प्रदूषित होते. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, ओझोन आणि पाण्याची वाफ यांचा समावेश हरितगृह वायूंमध्ये होतो. कार्बन डायऑक्साइड हा मुख्य हरितगृह वायू आहे. वाहतुकीतून हरितगृह वायू उत्सर्जन इतर कोणत्याही ऊर्जा वापरणार्या क्षेत्रापेक्षा वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले आहे. स्थानिक वायु प्रदूषण आणि धुक्याचा धोका निर्माण करण्यातही रस्ते वाहतुकीचा मोठा मोठा वाटा आहे. गेल्या 300 वर्षांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डाय ऑक्साईडच्या वातावरणीय सहभागात 45 टक्के वाढ झाली आहे.
मोटार वाहतुकीमुळे एक्झॉस्ट धुके देखील सोडले जाते. त्यात कणयुक्त पदार्थ असतात. ते मानवी आरोग्यासाठी घातक असतात आणि हवामानबदलासाठीही कारणीभूत असतात. वाढत्या वाहनांमुळे रस्ते अपघात, वायुप्रदूषण, शारीरिक निष्क्रियता, प्रवासात वाया जाणारा वेळ, इंधनाच्या वाढत्या किमती आणि रस्त्यांच्या देखभालीचा खर्च वाढतो. खरे तर गतिशीलता सुधारणे हा पारंपारिक वाहतुकीचा मुख्य उद्देश आहे. परंतु आजची वाहतुकीची स्थिती पाहता हा मूळ उद्देशच अयशस्वी होत आहे. वाहतुकीमुळे होणार्या फायद्यांपेक्षा त्यापासून होणारे तोटे अधिक आहेत हे लक्षात आले, तसे सर्व पाश्चिमात्य देश यासाठी एकत्र आले आणि त्यातूनच शाश्वत वाहतुकीची संकल्पना निर्माण झाली. पर्यावरणावर वाईट परिणाम न करणारे टिकाऊ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करणे आणि त्यांचा वापर करण्यासाठी उत्तेजन देणे ही यामागील मुख्य भूमिका आहे. यात रस्ता, पाणी किंवा हवाई वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या विशिष्ट वाहनांचा समावेश होतो. तसेच विविध प्रकारची आणि विविध मार्गानी होणारी वाहतूक म्हणजे रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग, कालवे आणि टर्मिनल या सर्व प्रकारांना सामावून घेण्यासाठी वापरल्या जाणार्या पायाभूत सुविधा, त्याविषयक ट्रान्सपोर्ट ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स तसेच ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट यांचाही समावेश केला गेला आहे. प्रदूषण न करणार्या वाहतुकीबद्दल लोकांना माहिती देणे, त्यासाठी पूरक वाहनांचा वापर वाढवणे आणि शाश्वत वाहतुकीसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणार्या गोष्टींचा प्रसार, प्रचार करणे हे हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख हेतु आहे.
भारतातील रस्त्यांचे जाळे सुमारे 66.71 लाख किलोमीटरपर्यंत पसरले आहे. रस्त्यांच्या बाबतीत संपूर्ण जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. सुमारे 64.5 टक्के मालवाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो. तर सुमारे 90 टक्के प्रवासी वाहतूकही याच मार्गाने केली जाते. भारतात पेट्रोलचा आणि डिझेलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सोयींची आवश्यकता यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 2013 ते 2023 या दहा वर्षांच्या काळात आपल्या देशातील पेट्रोलचा वापर 117 टक्के वाढला आहे. आपण सुमारे 82 टक्के पेट्रोल आणि डिझेल आयात करतो. परंतु भविष्यातल्या संकटांचा विचार करून वेळीच उपाययोजना करण्यासाठी आपल्या देशानेही पावले उचलली आहेत. पुढील काही वर्षांमध्ये इथेनॉल इंधनाचा वापर वाढवणे आणि ही आयात 67 टक्क्यांपर्यंत कमी करणे हे आपले ध्येय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरातही वाढ होते आहे. 2030 पर्यंत इ बाईक्स, इ कार्सचा वापर वाढवणे आणि सार्वजनिक वाहतुकीतही इ बसेसचा वापर वाढवणे हे आपले महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे इ वाहनांसाठी योग्य रस्ते बनवणे, इ दुचाकींसाठी विशेष मार्ग राखून ठेवणे, पर्यायी इंधनाचा वापर वाढवणे, रेल्वेसाठी सोलर पॅनलचा वापर करणे अशा प्रकारच्या योजना नजीकच्या भविष्यात राबवण्याचे ध्येय आपल्या देशाने समोर ठेवले आहे. त्यामुळे शाश्वत वाहतूक प्रणालीचा वापर करण्यात भारताचा लक्षणीय वाटा आहे आणि तो गुणांकाने वाढत जाणार आहे, हे निश्चित.
2023 चा शाश्वत वाहतूक पुरस्कार फ्रान्समधील पॅरिस या शहराला देण्यात आला. यावेळी भारतातील भुवनेश्वरचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला होता. मोबाइल बसेसचा आणि इ रिक्षांचा वापर या विषयावर लोकजागृती आणि लोकांचा वाढता सहभाग यामुळे भुवनेश्वरला नुकताच ‘सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट’ हा विशेष पुरस्कारही मिळाला आहे. प्रगती आणि प्रदूषणमुक्त जीवन साध्य करण्याचे शिवधनुष्य आता सगळ्याच देशांनी उचलले आहे. त्यामुळे अवकाशात साठणारे प्रदूषणाचे काळे ढग नक्कीच नाहीसे होतील. जागतिक शाश्वत वाहतूक दिनानिमित्त शाश्वत वाहतुकीचा अविभाज्य भाग म्हणून सायकलिंगला मान्यता देण्यात आली आहे. युरोपियन सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच ही संस्था राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय सरकारांना आपल्या देशांमधील सायकलिंगसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करते. सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील ही गुंतवणूक अधिक लोकांना सायकलिंग स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल अशी कल्पना आहे. सायकलिंगमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. सार्वजनिक आरोग्य सुधारते आणि शहरे अधिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होतील. सायकल हे जगभरात उपलब्ध असलेल्या शाश्वत वाहतुकीचे सर्वात जुने आणि लोकप्रिय वाहन आहे. हा वाहतुकीचा एक सहजसोपा मार्ग तर आहेच, त्याचबरोबर सायकल निरोगी जीवनशैलीकडेही घेऊन जाते. गर्दी आणि वायू प्रदूषणाच्या आव्हानांना हे एक उत्तम उत्तर आहे. तसेच कोणतेही वय असो वा सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी, सायकल सर्वांसाठी योग्य आणि परवडणारे वाहन आहे.याचबरोबर शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने हा देखील एक चांगला पर्याय आहे. ही वाहने कमीत कमी प्रदूषण करतात आणि उच्च क्षमतेने चालवता येतात.
Related
Articles
भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसर्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात
06 Dec 2024
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष
02 Dec 2024
अक्कलकोटमध्ये शंभर कुत्र्यांवर विषप्रयोग?
03 Dec 2024
दहशतवाद्यांशी संबंधाचा संशय;जम्मूत दोन महिला ताब्यात
04 Dec 2024
हिंदू नेत्याच्या अटकेचा मुस्लिम धर्मगुरूंकडून निषेध
05 Dec 2024
पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक
30 Nov 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
निकालांनी काय दाखवले?
4
भाजपला आधार हिंदुत्त्वाचा
5
चक दे इंडिया
6
महागाईची धास्ती, महिलांची मालकी