E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
तुरुंगात खितपत पडलेला निर्भीड पत्रकार!
Samruddhi Dhayagude
25 Nov 2024
चर्चेतील चेहरे : राहुल गोखले
परकीय सत्तेपासून मुक्तता मिळाल्यानंतर स्वकीयांचे राज्य चालू होते तेंव्हा ते समस्त जनतेच्या हिताचे असावे अशी स्वाभाविक अपेक्षा असते. तथापि त्या अपेक्षेला तडे जावेत अशा राजवटीची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. पूर्व आफ्रिकेतील इरिट्रिया हे असेच राष्ट्र. दक्षिण सीमेवरील इथियोपियाच्या परचक्रातून मुक्तता व्हावी यासाठी इरिट्रियाचा तब्बल तीस वर्षे वर्षे तुंबळ संघर्ष सुरु होता. अखेरीस 1993 साली इरिट्रियाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा त्या देशात लोकशाही प्रस्थापित होईल अशी अपेक्षा होती. तथापि नवस्वतंत्र राष्ट्राचे पहिले अध्यक्ष ठरलेले इसाइयस अफवेरकी यांच्या राजवटीने त्या अपेक्षेस तडे दिले. गेले तीन दशकांहून अधिक काळ तेच अध्यक्षपदी आहेत आणि देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी संकल्पना औषधालाही शिल्लक राहिलेल्या नाहीत. तरीही या एकाधिकारशाहीच्या विरोधात काही जण धैर्याने आवाज उठवितात. आपल्या जीवाची बाजी त्यासाठी लावतात. डाविट आयझॅक हे त्यापैकीच एक. त्यांनी पत्रकार म्हणून अफवेरकी यांच्या राजवटीला टोकदार प्रश्न विचारले. परिणामतः त्यांची रवानगी अफवेरकी यांनी तुरुंगात केली. गेली 23 वर्षे आयझॅक तुरुंगात आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीपासून ते हयात आहेत किंवा नाही येथपर्यंत कोणतीही ठोस माहिती कोणालाही नाही. आयझॅक यांनी दाखविलेल्या या धाडसाची दखल घेत स्वीडनची राजधानी स्टॉकहोमस्थित एडेलस्टॅम फाऊन्डेशनने ’एडेलस्टॅम पारितोषिक’ जाहीर केले आहे. मानवाधिकारांसाठी धाडसाने संघर्ष करणार्यांचा या पारितोषिकाने गौरव होतो. आयझॅक यांची निवड अगदी सार्थ आहे असेच म्हटले पाहिजे.
आयझॅक यांची लढाई अफवेरकी यांच्याशी असण्याचे काहीही कारण नव्हते. मात्र परकीय सत्ता जाऊन स्वकीयांची राजवट सुरु झाल्यावर आयझॅक यांचा झालेला अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास यांची परिणती त्यांच्या या संघर्षात झाली. वास्तविक आपले राष्ट्र स्वतंत्र व्हावे यासाठी स्वतः आयझॅक हेही प्रयत्नशील होते. 27 ऑक्टोबर 1964 रोजी इरिट्रियाच्या अस्मरा शहरात जन्मलेले आयझॅक यांना लहानपणापासून रुची होती ती इतिहास आणि वाङ्मयात. त्यांच्या आईने त्यांना या दोन्हीच्या अभ्यासासाठी प्रोत्साहनही दिले. तो काळ इरिट्रियावर इथियोपियाची सत्ता असण्याचा होता. वय लहान असले तर स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षातील घडामोडी आयझॅक यांच्या कानावर पडत असणारच. माध्यमिक शाळेत शिकत असतानाही आयझॅक यांनी सेन्सॉरशिपचा निषेध करणारे एक नाटक लिहिले होते त्यामागे स्वातंत्र्याचीच उर्मी होती. त्यामध्ये सरकारवर टीका असल्याने स्वाभाविकच त्या नाटकावर निर्बंध घालण्यात आले. अर्थात परकीय सत्तेकडून मिळालेल्या या वर्तणुकीचे आयझॅक यांना फारसे आश्चर्य वाटले नसावे. याचे कारण त्याच परकीयांच्या विरोधात देश लढत होता. तथापि स्वातंत्र्यानंतर देखील आयझॅक यांना तसाच अनुभव आला तेंव्हा मात्र त्यांना धक्का बसला असणार.
1985 साली आयझॅक स्वीडनला गेले. इरिट्रिया-स्वीडन संबंध एकोणिसाव्या शतकापासून असल्याने आयझॅक यांनी तोच देश निवडला यात आश्चर्य नाही. स्वीडनला गेल्यावरही त्यांचा स्वदेशाशी संबंध तुटला नाही आणि स्वीडनमधील इरिट्रियन समुदायाशी देखील त्यांचा संपर्क प्रस्थापित झाला. इरिट्रियाच्या स्वातंत्र्यासाठी आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आयझॅक यांनी स्वीडनमधून केला. तद्वत तेथेच त्यांच्यातील नाटककार आणि कलाकारही प्रगल्भ होत गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय्य समाजनिर्मितीमध्ये मःयामांची भूमिका याबद्दल त्यांच्या जाणिवा तेथेच स्पष्ट होत होत्या. स्वीडनने आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले तरी आयझॅक आपल्या देशाला विसरू शकत नव्हते. स्वातंत्र्यासाठीच्या सार्वमतात सहभागी होण्यासाठी त्यांनी इरिट्रियाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. या दोन्ही देशांदरम्यान त्यांनी अनेकदा प्रवास केला. अखेरीस इरिट्रियाला 1993 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यांनतर माध्यमांना स्वातंत्र्य देण्याची तरतूद असणारा कायदा नवस्वतंत्र इरिट्रियाने लागू केला. सेटीट नावाचे वृत्तपत्र 1997 साली सुरु झाले होते. आयझॅक 1997 साली त्या वृत्तपत्राचे भागीदार झाले. इरिट्रियामध्ये या वृत्तपत्राची भूमिका सरकारला उत्तरदायी करण्याची असेल अशी स्वप्ने आयझॅक यांनी पाहिली होती. दरम्यान 1998 साली इथियोपिया आणि इरिट्रियामध्ये पुन्हा संघर्ष उफाळला आणि आयझॅक यांनी स्वीडन गाठले. 2001 साली आयझॅक इरिट्रियाला परतले तेंव्हा त्याना स्वराज्याचे भेसूर दर्शन घडले. देश एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसू लागले होते; मतभेदांविषयी असहिष्णू भूमिका घेतली जाऊ लागली होती. पत्रकार म्हणून आयझॅक आपली जबाबदरी विसरले नव्हते. त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून सरकारला खडे सवाल विचारण्यास सुरुवात केली.
काही संसद सदस्य, मंत्री आणि स्वतंत्र पत्रकार अशा सुमारे पंधराएक जणांच्या एका गटाने राजकीय सुधारणांची मागणी करणारे एक अनावृत्त पत्र जारी केले होते. आयझॅक यांनी त्या पत्रास आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी दिली. अफवेरकी राजवटीला हे सहन होणारे नव्हते. तेंव्हा 2001 साली आयझॅक यांना ताब्यात घेण्यात आलेच; पण माध्यमांची पूर्णपणे मुस्कटदाबी करण्यात आली. सरकारवर टीका करण्याची मुभा राहिली नाही. आयझॅक यांच्यासह अन्य अनेकांना अटक झाली. त्यावरून काहूर उठला आणि आयझॅक यांच्या भावाने स्वीडनचे दरवाजे ठोठावले. पण स्वीडनला करण्यासारखे विशेष काही नव्हते. आयझॅक यांच्यावर कोणतेही आरोपपत्र ठेवण्यात आलेले नाही आणि तरीही गेली 23 वर्षे ते गजाआड आहेत. 2005 साली त्यांची सुटका करण्यात आली. आयझॅक यांनी आपल्या पत्नीला तसे कळवलेही. किंबहुना आयझॅक यांना स्वीडनला नेण्याची तयारी सुरु होती अशीही वदंता होती. तथापि कदाचित याचीच चाहूल लागल्याने असेल पण आयझॅक यांना इरिट्रियाच्या यंत्रणांनी त्याच दिवशी पुन्हा अटक केली. गेल्या दोन दशकात आयझॅक यांना ना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्यात आले आहे; ना त्यांना कायदेशीर सल्ला घेण्याची मुभा देण्यात अली आहे. मुदलात ते आहेत कुठे; त्यांची प्रकृती कशी आहे; आणि खरेच ते हयात आहेत किंवा नाही अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठत असले तरी अफवेरकी यांना त्याचे सोयरसुतक नाही.
आयझॅक यांच्याबरोबर अटक झालेल्या अनेकांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचे मानले जाते. देशाचे पहिले अर्थमंत्री याच प्रकारच्या दडपशाहीचे बळी पडले आहेत. 2018 साली त्यांनी अफवेरकी हुकूमशहा असल्याची टीका केली. त्यांना अशाच क्रूर पद्धतीने अटक करण्यात आली आणि अलीकडेच म्हणजे यंदा ऑगस्ट महिन्यात त्यांचा तुरुंगात मृत्यू झाला. आयझॅक यांचा ठावठिकाणा कोणालाही माहीत नाही. आयझॅक यांच्या सुटकेची मागणी जगभरातून होत असते. पण अध्यक्ष त्या मागणीला धूप घालत नाहीत. आयझॅक यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून अटक करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी यंत्रणा करतात. आयझॅक हे देशद्रोही असल्याचे इरिट्रियाचे मत आहे. अर्थात हे कोणाही विवेकी व्यक्तीला पटणारे नाही. एडेलस्टॅम पारितोषिकाच्या निमित्ताने आयझॅक यांच्या मुक्ततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येईल यात शंका नाही. आयझॅक जिवंत आहेत असे गृहीत धरले तरी ते काही पारितोषिक स्वीकारणास जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा त्यांच्या वतीने त्यांची कन्या ते स्वीकारतील. दडपशाही करणार्या राजवटी पत्रकारांना अटक करत असतात याचे अनेक दखल देता येतील. तथापि सर्वाधिक काळ तुरुंगात असणारा पत्रकार आयझॅक हेच आहेत. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याचे धाडस त्यांनी दाखविले हे त्यांची रवानगी तुरुंगात होण्याचे कारण. एडेलस्टॅम पारितोषिक म्हणजे डाविट आयझॅक यांची धडाडी आणि निर्भीडतेचा गौरव आहे असेच म्हटले पाहिजे!
Related
Articles
चिंचवड रेल्वे मार्गावर उभारणार नवीन पूल
04 Dec 2024
भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसर्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात
06 Dec 2024
संभळचा वाद (अग्रलेख)
06 Dec 2024
दिल्लीत भाजपला आणखी एक धक्का
06 Dec 2024
बांगलादेशात चिन्मय दास यांच्या वकिलावर प्राणघातक हल्ला
04 Dec 2024
सक्षमा प्रकल्प नेतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे
03 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
निकालांनी काय दाखवले?
4
भाजपला आधार हिंदुत्त्वाचा
5
चक दे इंडिया
6
महागाईची धास्ती, महिलांची मालकी