मनसेची परीक्षा (अग्रलेख)   

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आतापर्यंत उमेदवारांच्या सहा याद्या जाहीर झाल्या असून विधानसभेच्या रिंगणात ११७ उमेदवार मनसेने उतरवले आहेत. हे उमेदवार कितपत आव्हान उभे करतात ते पाहायचे!
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका अनेकदा बुचकळ्यात टाकणार्‍या ठरतात. त्यामुळेच त्या जनतेत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणार्‍या असतात. लोकसभेच्या निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. महायुतीच्या काही उमेदवारांसाठी त्यांनी प्रचारही केला होता. त्याच राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. त्यांची ही भूमिका कोणाला पाठबळ देणारी ठरणार, हे निकालानंतरच लक्षात येईल. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेत मनसेचा अवघा एकेक उमेदवार निवडून आला होता. मधल्या काळात राज ठाकरे आपल्या विविध भूमिका मांडत राहिले. या निवडणुकीत त्यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांनाही उतरवले आहे. मुंबईतल्या माहीम मतदारसंघात त्यांची लढत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणार्‍या राज ठाकरे यांच्या चिरंजीवांची लढत सोपी व्हावी म्हणून शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी भाजपने अनुकूलता दाखवली आहे; मात्र सरवणकर उमेदवारीवर सध्या तरी ठाम आहेत. मनसे या निवडणुकीत स्वबळावर उतरली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती असा रणसंग्राम सुरू आहे. त्याचवेळी इतरही पक्ष आणि आघाडी यांच्याशीही मनसेची लढत आहे. एका अर्थाने ती मनसेच्या आगामी राजकारणातील अस्तित्वाची कसोटी ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीतही मनसेला आपले उमेदवार जिंकूनही आणून दाखवावे लागणार आहेत.

ताकदीचा अंदाज

पुणे शहरातील कोथरूड, कसबा, खडकवासला आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभेत कोथरूड मतदारसंघात मनसेचा उमेदवार होता; मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून तो २० ते २५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता. हडपसरमध्ये एकदाही निवडणूक न लढवणारा उमेदवार मनसेने दिला आहे. तेथे तिरंगी लढतीत ही जागा जिंकण्याचे मोठे आव्हान या पक्षासमोर असेल. एकूणच मनसेच्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीत येणार आहे. महायुतीशी असलेले राज ठाकरे यांचे सख्य लक्षात घेता महायुती आणि मनसे एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील अशी शयता वाटते. शिवडी, माहीम, वरळी यांसारख्या मतदारसंघांत महायुतीकडून मनसेला पाठिंबा अपेक्षित आहे. तेथे अनुक्रमे संदीप देशपांडे, अमित ठाकरे आणि नितीन सरदेसाई हे मनसेचे उमेदवार रिंगणात आहेत. या प्रतिष्ठेच्या लढाईत महायुतीने मनसेचे उमेदवार निवडून आणण्यास मदत करावी, त्या बदल्यात महायुतीला गरज असलेल्या मतदारसंघात उमेदवार उभे करून मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मताचे विभाजन करून महायुतीचा मार्ग सुकर करावा अशी रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे. मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देताना महायुतीने जाहीर केलेल्या किंवा इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या नाराजीचा सामनाही महायुतीला करावा लागणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचे शहरी भागातील मतदारांना आकर्षण आहे; पण २००९चा अपवाद सोडता तेवढे यश मनसेला आजपर्यंत मिळालेले नाही. त्यांच्या सभांना गर्दी होते; मात्र त्या गर्दीचे मतामध्ये रूपांतर होत नाही. आंदोलन करणारा पक्ष अशी मनसेची ओळख आहे; परंतु वारंवार बदललेल्या भूमिका आणि पक्ष संघटनेच्या बांधणीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मनसे मतदारांचा विश्वास संपादन करू शकलेली नाही. या निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी राहणार यावरच मनसेची भविष्यातील वाटचाल सुरू राहणार आहे. महायुतीच्या साथीने आगामी निवडणुकांसाठी आपला पाया भक्कम करून घेणे हाच राज यांचा या निवडणुका लढवण्यामागील हेतु दिसतो.

Related Articles