समाजाच्या उत्थानासाठी ग्रंथालयांची गरज   

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे 

सध्या शाळांना दीपावलीची सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती असलेली अभ्यासाची पुस्तके सुटली. मुलांसाठी अभ्यासाच्या पुस्तकाशिवायचा प्रत्येक दिवस आनंदी असतो असे त्यांना वाटते. अभ्यास म्हणजे एक प्रकारे शिक्षा आहे असे त्यांना वाटते. पाठयपुस्तकांचा अभ्यास हेच खरे शिक्षण ही पालकांची समजूत झाल्यांने त्यांच्यासाठी तीच वाट महत्वाची मानली गेली आहे. वर्तमानातील सारे शिक्षण हे पुस्तकाभोवती केंद्रित झालेले आहे. त्यामुळे पाल्यांच्या हातून पाठ्यपुस्तके सुटली की पालकांना चिंता वाटू लागते.
 
शिक्षण म्हणजे पाठयपुस्तके इतकाच अर्थ बनल्यानंतर शिक्षणाचा मूलभूत अर्थच हरवला जात आहे. सुट्टी म्हणजे शिकण्यासाठी नवी उर्जा घेऊन प्रवास करणे आहे. सुट्टी म्हणजे शिकण्यासाठीच्या अनुभवाची शिदोरी आहे. सुट्टीत केली जाणारी प्रत्येक कृती एक प्रकारे शिकणेच असते. सुट्टीत मुले पंचज्ञान इंद्रियाचा उपयोग करत विद्यार्थी विविध स्वरूपाचे अध्ययन अनुभव घेत असतात. पंचज्ञान इंद्रियाव्दारे जे शिक्षण होते तेवढेच दीर्घकाळ स्मरणात राहाते. या काळात विद्यार्थी विविध प्रकारचे किल्ले बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. त्यातून मुलांच्यामध्ये सौंदर्यदृष्टी निर्माण होण्याबरोबर नवनिर्मितीचा आनंद मिळवणे सहज शय आहे. अशा विविध मार्गाने शिक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे. अशावेळी अखंड जीवनभर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहावे इतकीच त्यांची अपेक्षा असते. मात्र त्यापलिकडे जात विद्यार्थ्यांना या सुट्टीचा उपयोग करत अवांतर वाचनाची अभिरूची विकसित करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

ग्रंथालयांचे महत्त्व

सुट्टीत होणारे हे वाचन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा भाग आहे. विद्यार्थी जेव्हा वाचत असतो तेव्हा तो स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याची वाट चालत असतो. शाळा आणि समाजात ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या शालेय स्तरावरील राज्य अभ्यासक्रम आराखड्यातही ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आजवरच्या विविध आयोग, आराखडे, शासकीय अभिलेखांमध्ये सतत ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या अभिलेखांमध्ये ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करूनही समाज वाचता होण्याच्या दृष्टीने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. समाजात वाचन संस्कार नसेल तर विद्यार्थी वाचता होण्याची शयता नाही.आपला भोवताल पाहून विद्यार्थी अनुकरण करत असतात.त्यामुळे वाचता समाज हिच वर्तमानातील विकासाची वाट आहे.त्यादृष्टीने विविध स्वरूपाचे प्रयत्नांची गरज आहे.दीपावली सुट्टीत पालकांनी विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाची पुस्तके,दीपावली अंक,त्यांच्या अभिरूचीला पोषक असणारे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खाऊची भेट देण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी देखील पावले टाकण्याची गरज आहे.
 
वर्तमानात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या सभा, होणारी भाषणे ऐकली, की आपल्या भाषेचा आणि विचाराचा दर्जा किती खालावला आहे हे लक्षात येते. एकेकाळी सभागृहातील भाषणे ऐकण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती आवर्जून उपस्थित राहात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे विरोधी पक्षातील अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित राहात. या उपस्थितीमागे केवळ अभ्यासपूर्ण मांडणींचा विचार होता. त्यामुळे अनेकांना उपस्थित राहावे असे वाटत होते. त्यात पक्षीय विचार नव्हताच. सभागृहात नाथ पै, प्रा.मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी यांसारखी कितीतरी माणसे सभागृहात अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणे करत. सर्वच पक्षीय सदस्य हे स्वतः उपस्थित राहत. यामागे लोकांचा वाचन विचार होता. वाचनाबरोबर चिंतन, मननाची भूमिका होती. समाजाविषयीची तळमळ होती. त्यातून विचारांचे प्रगटीकरण घडत होते. आज अशी विचारांची भूक भागवणारी, मस्तके घडविणारी भाषणे कमी होत चालली आहेत का? शेवटी भाषणे ही समाजाची मने घडवत असतात. त्या भाषणांमुळे समाजाच्या समृद्ध वाटा निर्माण होत असतात. शाळांमध्ये ग्रंथालये असावीच, त्याप्रमाणे समाजाच्या उत्थानासाठी देखील ग्रंथालयाचा विचार करायला हवा. त्याशिवाय समाजाचे व राष्ट्राचे उत्थान घडणार नाही.

सृजनशीलतेचा विकास

शालेय राज्य अभ्यासक्रमात आराखड्यात नमूद केले आहे की, वाचनालय, ग्रंथालयाचा शैक्षणिक गुणवत्ता विकासात पुस्तकांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने ज्ञानप्राप्तीसाठी शालेय पाठ्यपुस्तकांबाहेरील पुस्तके वाचावीत असे म्हटले आहे. मुळात स्वयंप्रेरणा असण्याचे प्रमाण किती हाही संशोधनाचा विचार आहे. अनेकदा आज वाचता असलेल्या समाज केवळ गरज म्हणून वाचत असतो. स्पर्धा परीक्षेतील तरूण वाचत आहेत हे खरे; पण ते काय आणि कशासाठी वाचत आहेत याचाही विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने विविध स्वराच्या अभिलेखांमध्ये शालेय वेळापत्रकात सुध्दा काही तासिका वाचनासाठी राखीव ठेवण्याची भूमिका घेतली आहे. जगभरातील शैक्षणिक विकासाच्या प्रक्रियेचा विचार करता ग्रंथालयांचे स्थान अधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणूक उंचावण्यास मदत होत असते. ग्रंथालयाचा उपयोग उंचावल्यास विद्यार्थ्यांच्या सृजनशक्ती विकासाला अधिक बळ मिळत जाते. कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे पुस्तकांचे स्थान शिक्षणाच्या प्रक्रियेत अधिक आहे हे लक्षात घ्यायला हवे. अलीकडे माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अर्थात नव्या वाटा चालण्याची गरज आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विविध ज्ञानानुभव घ्यावेत; मात्र अलीकडे माहिती तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. विविध स्तरावर त्यासाठी लोकसहभाग उंचावत आहे. 
 
शाळांची वैशिष्ट्ये नोंदवताना समृद्ध ग्रंथालय असा उल्लेख असलेल्या शाळांची संख्या किती? याचाही शोध घ्यावा लागणार आहे. आराखड्यात म्हटले आहे की, शालेय ग्रंथालय समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पुस्तकांनी सुसज्ज असावे. शय असेल तिथे वर्गात वाचनपेट्या किंवा वाचन कोपरे, वाचन कट्टे उपलब्ध करून देण्याचा विचार केला जावा. ही गरज नव्या वातावरणात अधिक अधोरेखित होऊ लागली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमोर विविध प्रकारची पुस्तके दिसायला हवीत. पुस्तके असली तरी ती कपाटात असता कामा नये. शेवटी ती दिसली तर विद्यार्थ्यांना पाहता येतील, त्यांना ती दिसायला हवी. 
 
वाचनालयासाठी जागा निश्चित करताना विद्यार्थी संख्या व वयोगट विचारात घ्यायला हवा असतो. वैविध्यपूर्ण पुस्तके, विविध साहित्य प्रकारातील पुरेशी पुस्तके, साहित्य तसेच वयोगटांनुसार, विद्यार्थी संख्येनुसार जागतिक, भारतीय तसेच स्थानिक भाषेतील पुस्तके उपलब्ध असायला हवीत. वाचनासाठीच्या पुस्तकांचा विचार करताना शालेय इयत्तांचा विचार करून चालत नाही. एकाच इयत्तेत शिकणारी मुले वाचन कौशल्याच्या दृष्टीने जशी विविध स्तरावर असतात, त्याप्रमाणे ती अभिरूचीच्या दृष्टीने देखील विविध स्वरूपाची असू शकतील. त्यामुळे ही विविधता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या भाषा शिकतात त्या सर्व भाषांची आणि सर्व स्तरांची पुस्तके उपलब्ध असायला हवी. ती उपलब्ध नसतील तर विद्यार्थी वाचन संस्कारापासून दुरावण्याचा धोका अधिक असतो. ही पुस्तके ज्ञान, विज्ञान याचबरोबर समृद्ध भारतीय जीवनप्रणाली, ऐतिहासिक, काल्पनिक, वैज्ञानिक, सामाजिक, नैतिक मूल्य, आनंद देणार्‍या गोष्टींचाही विचार महत्त्वाचा आहे. अशा सर्व विषयांवरची असावीत. अलीकडे द्विभाषिक पुस्तकांचा विचारही समोर येतो. त्यांचा विचार करून काही प्रकाशक द्विभाषिक पुस्तके प्रकाशित करत आहेत. त्या स्वरूपाची पुस्तके भाषा शिकण्यासाठी देखील मदत करणारी ठरत आहे. त्याबरोबर शाळेत विविध प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी असतात. त्यांचा विचार करण्याची गरज आहे. त्यात श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रवणीय पुस्तकांचा विचार केलेला असावा. विविध साधनस्त्रोत, दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील पुस्तके असावीत. वाचनासाठीच्या सोयी व सुविधा शाळा स्तरावर उपलब्ध असाव्यात. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून संधी योग्य प्रमाणात उपलब्ध असाव्यात. आराखड्यात केलेला विचार महत्त्वाचा आहे; मात्र केवळ विचार करून चालणार नाही, तर त्यादृष्टीने पावले पडण्याची गरज आहे. शालेय ग्रंथालयात ही पुस्तके विकत घेताना शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्या सहविचारातून ही पुस्तके खरेदी करावीत. याचे कारण शाळेतील विविध अभिरूचीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध असायला हवीत.

ग्रंथालये कशी असावीत?

शाळांमध्ये असलेली ग्रंथालये ही, शाळेत उपलब्ध जागेनुसार तीन प्रकारची ग्रंथालये उभारण्याचा विचार प्रतिपादन करण्यात आला आहे. शाळेचे ग्रंथालय हे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पद्धतशीरपणे मांडलेले, पुरेशा फर्निचरसह सुसज्ज असायला हवे. वाचन पातळी व भाषा विषयानुसार वर्गीकरण केलेली पुस्तके असलेले ग्रंथालय म्हणून वापरण्याची ही वेगळी खोली असायला हवी. ग्रंथालयांमध्ये मल्टिमीडिया व दृक्श्राव्य अध्ययन संसाधनेदेखील समाविष्ट असायला हवीत. विद्यार्थ्यांना आरामात बसण्यासाठी आणि वाचनालयातील संसाधनांचा वापर करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे. लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दोरीचा वापर करून खालच्या बाजूला पुस्तके टांगलेली असायला हवीत. त्याप्रकारे नियोजन करून सुलभता आणणे शय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गखोलीतील वाचन कोपरा निर्माण करता येईल. शाळेमध्ये जागा मर्यादित असल्यास वर्गखोल्यांमध्ये त्या त्या इयत्तेसाठी उपलब्ध साहित्यासह वर्गाच्या एका भागात एक वाचन कोपरा स्थापित केला जाऊ शकतो. त्यामध्ये पुस्तकपेटीचाही समावेश असू शकेल. सामुदायिक शालेय वाचनालय, स्थानिक समुदायाच्या वापरासाठी शाळा आपले वाचनालय विस्तारित करून ते शालेय वेळेनंतरही खुले ठेवू शकेल. जे शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतच माजी विद्यार्थी, तरुण, प्रौढ वाचकांना विविध उपक्रमांसाठी खुले असेल. असे वाचनालय विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेनंतर एकत्र येऊन गृहपाठात एकमेकांना मदत करण्यासाठी हक्काची अभ्यासिका बनू शकेल, अशी भूमिका आराखड्यात नमूद केली आहे.
 
अर्थात ही भूमिका अत्यंत चांगली आहे; मात्र प्रत्यक्षात त्या दिशेने प्रवास घडण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. केवळ शिफारस करून ही वाट चालता येणे शय नाही. त्यामुळे त्यासाठीची आर्थिक गुंतवणुकीची वाट कशी चालणार? हा प्रश्न आहे. शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. ते उपक्रम हे वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे. शालेय ग्रंथालयाचा प्रभावी वापर आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी पुस्तक परीक्षण, पॉप-अप बुस, लेखकांशी भेट इत्यादी उपक्रम घेण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. पुस्तकांची देवाणघेवाण, हाताळणी, काळजी, बांधणी यादृष्टीने प्रबोधनासाठी विविध स्वरूपाचे कृतिकार्यक्रम घेणे. पुस्तकातील आशयाची भित्तिपत्रके, पुस्तकांचे मुखपृष्ठ तयार करणे, प्रश्नमंजुषा, पुस्तकावर आधारित सादरीकरण यांसारख्या उपक्रमातून वाचन संस्कृतीचा विकास करता येईल. वापर, स्थानिक जनसमुदायाकडून किंवा अन्य स्रोतांतून पुस्तकांचे संग्रहण केले जावे अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. या वाटा समाजाच्या समृद्धतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या आहेत.
 
ग्रंथालयाच्या संदर्भाने आराखड्यात बरेच काही म्हटले असले तरी राज्यात ग्रंथालये उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या फारशी नाही. आता शिक्षण हक्क कायदा विचार करता कायद्याने जे निकष निश्चित केले आहे, त्यात ग्रंथालय असणे सक्तीचे आहे; मात्र ही ग्रंथालये ही केवळ निकषाची परिपूर्ती करण्यापुरती मर्यादित आहेत. ग्रंथालयांचा विचार करता केवळ निकषापुरता विचार नको आहे, तर त्या माध्यमातून समृद्ध शिक्षणाची वाट चालण्याच्या दिशेने विचार व्हायला हवा. आपण जोवर वाचता समाज निर्माण करत नाही, तोवर समाजामध्ये माणूस घडण्याची शयता नाही. समाजाचा स्तरही खालावत जाणार यात शंका नाही. पुस्तकेच माणसांची मस्तके घडवत असतात. वाचता समाज राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोठा हातभार लावत असतो, त्या दिशेने विचार होण्याची गरज आहे.

Related Articles