व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी   

बायडेन यांचा पुढाकार; पाहुण्यांची रेलचेल

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यानिमित्त खास कार्यक्रम आयोजित केला होता. अमेरिकन भारतीय वंशाचे  सहाशेपेक्षा अधिक पाहुणे आणि खासदार, अधिकारी आणि उद्योगपती उपस्थित होते. 
 
अमेरिकेच्या अध्यक्षांचे व्हाइट हाऊस सरकारी निवासस्थान आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजवटीत तेथे दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली होती. ती परंपरा बायडेन यांनी सुरू ठेवली आहे. कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सहकारी उत्साहात सहभागी झाले होते. नौदल उपप्रमुख विवेक मूर्ती, अवकाशवीर सुनिता विल्यम्स, अमेरिकन भारतीय वंशाच्या तरुण कार्यकर्त्या श्रृष्टी अमुला यांनी देखील कार्यक्रमात भाग घेतला. सध्या सुनिता विल्यम्स आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. त्यांचा दिवाळीनिमित्तचा शुभेच्छा संदेश दृकश्राव्य पद्धतीने कार्यक़्रमात प्रसारीत करण्ण्यात आला.  
 
बायडेन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दिवाळी कार्यक्रमासाठी तुम्ही आलात. तसेच कार्यक्रमाचे यजमानपद भूषविण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, असे सांगितले. व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा मी कायम ठेवली आहे, त्याचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.  तत्पूर्वी बायडेन यांनी व्हाइट हाऊसमधील निळ्या रुममध्ये औपचारिकपणे आणि परंपरेप्रमाणे पणती प्रज्वलित केली. या वेळी शुभेच्छा संदेशात त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील अमेरिकन समुदायाने अमेरिकेच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे देशाचा विकास मोठा झाला आहे. त्याचे श्रेय मी त्यांना देतो.
 
मी उपाध्यक्ष असताना दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात हिंदू धर्मीयांसह बौद्ध, जैन आणि शीख धर्मीय सहभागी झाले होते, असे आवर्जून सांगितले. आता पुन्हा असा कार्यक्रम आयोजित करण्याचा मान मिळाल्याचे ते म्हणाले.  दरम्यान, निवडणूक प्रचाारात असल्यामुळे उपाध्यक्षा आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि बायडेन यांच्या पत्नी डॉ. जिली कार्यक्रमात सहभागी झाल्या नव्हत्या. 

Related Articles