E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
संपादकीय
भाजपची पहिली यादी (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
22 Oct 2024
उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. पुण्यात पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड या मतदारसंघातील उमेदवारांची नावे अपेक्षेप्रमाणेच आहेत.
भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे नेते आणि जुने आमदार यांचे या यादीत प्राबल्य आहे. श्रीगोंदा, चिंचवड, रावेर, इचलकरंजीसह काही ठिकाणी भाजपने नवे उमेदवार दिले आहेत. प्रस्थापित उमेदवारांची यादी असल्याने नाराजीचा सूर उमटणार नाही, अशी पक्षाची अपेक्षा असावी; मात्र तरीही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याची दक्षता घेण्यात आलेली दिसते. याचबरोबर अन्य मागासवर्गीय, आदिवासी, भटके - विमुक्त अशा समाजघटकांनादेखील यात स्थान दिले आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढविणार आहे. अर्थात, मित्र पक्षांच्या हक्काच्या जागांची संख्या कमी होणार, हे ओघानेच आले. गेल्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने लढविलेल्या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम दावा केला; पण भाजपचे ज्येष्ठ त्यांच्या आग्रहाला दाद देणार नाहीत, हे उघड आहे. भाजपच्या पहिल्याच उमेदवारी यादीतून ते समोर आले. शिंदे यांच्या शिवसेनेने मागितलेल्या जागांपैकी काही जागांसाठी भाजपने आपले उमेदवार घोषित केले. यामध्ये उरण, धुळे, अचलपूर, देवळी आणि नालासोपारा या मतदारसंघांचा समावेश आहे. ‘सत्तांतरानंतर मुख्यमंत्रिपद शिंदे यांना देऊन भाजपने त्याग केला’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, असे वृत्त अलीकडेच झळकले होते. अशावेळी शिंदे यांनी मागितलेल्या सर्वच जागा त्यांना द्यायच्या नाहीत, जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या, हे भाजपचे तंत्र अधोरेखित होते. तो एका अर्थाने एकनाथ शिंदे यांना दिलेला इशाराच मानावा लागेल. मात्र, तडजोडीशिवाय पर्याय नसला तरी शहा यांचे कथित विधान आल्यावर शिंदे गप्प बसले नव्हते. ‘आमच्यामुळेच सत्ता आली‘ हे त्यांनी भाजपला सुनावले! पहिल्या उमेदवारी यादीत बर्याच विद्यमान आमदारांना संधी देतानाच, सरसकट सर्व आमदारांना उमेदवारी मिळेल हा संदेश जाणार नाही, याची काळजी भाजपने घेतली आहे. त्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर न झालेल्या विद्यमान आमदारांपैकी अनेकांची धाकधूक वाढली. पक्षश्रेष्ठांच्या भेटीगाठींसाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
पाहणी अहवालांचे ‘शस्त्र’
निवडणुकीच्या आधी भाजपने प्रत्येक मतदारसंघात पाहणी केल्याचे सांगण्यात येते. विविध पाहण्यांमधून अनेक मतदारसंघांत विद्यमान आमदारांबद्दल असलेली नाराजी पुढे आल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात येत होते. या पाहण्यांचा वापर भाजपकरता युतीतील मित्र पक्षांबरोबरच काही विद्यमान आमदारांच्या महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी देखील होत असल्याचे दिसत आहे! सुधीर मुनगंटीवार यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला फायदा झाला नाही. अशोक चव्हाण यांंना राज्यसभेत संधी देण्यात आली. आता विधानसभेकरता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून भाजपने संधी दिली आहे. रावसाहेब दानवे यांना लोकसभेत मतदारांनी नाकारले. त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना पक्षाने भोकरदनमधून उमेदवारी दिली आहे. पर्वती मतदारसंघातून इच्छुक असलेल्या श्रीनाथ भिमाले यांना महामंडळ देण्यात आले. त्याचवेळी माधुरी मिसाळ यांची उमेदवारी निश्चित झाली. त्या सलग तीन वेळा पर्वतीमधून निवडून आल्या आहेत. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील दुसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात होती. चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीत जसे आलबेल नाही, तसे तसे ते महायुतीतसुद्धा नाही. पक्षांतर्गत नाराजी आणि मित्र पक्षांच्या मागण्यांबद्दल भाजपला कशा रीतीने कसरत करावी लागणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
Related
Articles
निवडणूक नियमातील बदलांना आव्हान देणार्या अर्जावर उद्या सुनावणी
14 Jan 2025
राजीनामा न दिल्यास जनताच धनंजय मुंडे यांना खेचून बाहेर काढेल
08 Jan 2025
जीम प्रशिक्षकास सक्तमजुरी दहा हजारांचा दंड, विशेष न्यायालयाचा निकाल
10 Jan 2025
ट्रम्प शपथविधी सोहळ्यासाठी जयशंकर भारताचे प्रतिनिधी
12 Jan 2025
शैक्षणिक अर्थसाह्य योजनेचा लाभ साडेचौदा हजार विद्यार्थ्यांना
13 Jan 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्यांना पकडले
13 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
आरटीई प्रवेश प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार
3
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
4
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
5
शेअर बाजारात उसळी
6
त्रुदो पायउतार (अग्रलेख)