हिजबुल्लाचा आणखी एक म्होरक्या ठार   

जेरूसलेम : लेबेनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्ला दहशतवाद्यांचा आणखी एक म्होरक्या ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला. नबिल कौक, असे त्याचे नाव आहे.
हिजबुल्ला दहशतवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा नबिल कौक उपप्रमुख होता. शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला होता. गेल्या काही आठवड्यांपासून लेबेनॉन येथील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर इस्रायलकडून हवाई हल्ले सुरू आहेत. त्यात अनेक म्होरके ठार झाले आहेत. त्यामध्ये प्रमुख म्होरक्या हसन नसरल्लाह याचाही समावेश आहे. दोनच दिवसांपूवीं लेबेनॉन येथील दहशतवाद्यांचे मुख्यालायावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. इस्रायलने भुयारे नष्ट करणारे बाँम्ब फेकले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा आणखी एक हल्ला केला. त्यात नबिल कौक ठार झाला आहे.  तो दहशतवादी संघटनेसोबत १९८० पासून कार्यरत होता. यापूर्वी तो दक्षिण लेबेनॉनचा लष्करी प्रमुख होता. संयुक्त राष्ट्राने २०२० मध्ये त्याच्यावर जागतिक प्रतिबंध लागू केले होते.  
 
दरम्यान, दहशतवाद्यांची संपर्क यंत्रणाही नष्ट केली होती. पेजर, वॉकीटॉकी, मोबाइलमध्ये काही दिवसांपूर्वी अचानक स्फोट झाले होते. ते इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या स्फोटानंतर अचानक लेबेनॉनची राजधानी बैरूत आणि अन्य ठिकाणी जोरदार हवाई हल्ले इस्रायलने केले आहेत. त्यात शेकडो रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि बाँम्बचा र्स्वैर वापर केला.

Related Articles