नेपाळमधील पूरबळींची संख्या शंभरावर   

काठमांडू : नेपाळमध्ये पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी १२५ वर पोहोचली. ६४ जण अद्याप बेपत्ता असून, ६१ जण जखमी आहेत.संततधार पावसामुळे शुक्रवारपासून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग पाण्याखाली गेला असून, काही भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे.
 
३२२ घरे आणि १६ पुलांचे नुकसान झाले आहे. सशस्त्र पोलीस दलाने ३ हजार ६२६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवले आहे. पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये रविवारी सकाळपर्यंत कावरेपालनमध्ये ३४ जणांचा, ललितपूरमध्ये २०, धडिंगमध्ये १५, काठमांडूमध्ये १२, मकावानपूरमध्ये ७, सिंधुपालचौकात ४, डोलाखामध्ये ३ आणि पंचथर आणि भक्तपूर जिल्ह्यात प्रत्येकी ५ मृतदेह सापडले आहेत. धनकुटा आणि सोलुखुंबू येथे प्रत्येकी दोन, तर रामछाप, महोत्तरी आणि सुनसरी जिल्ह्यात प्रत्येकी एक मृतदेह हाती आला आहे.
 
काठमांडूच्या सीमेला लागून असलेल्या धाडिंग जिल्ह्यात दरड कोसळून एक बस गाडली गेल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक महामार्ग आणि रस्ते पाण्याखाली गेले असून, शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. हजारो प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत.

५६ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

काठमांडूमध्ये गेल्या ५४ वर्षांतील हा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पूर आणि पावसाचा फटका चार लाखांहून अधिक नागरिकांना बसणार असल्याचा प्राधिकरणाचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने ७७ पैकी ५६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Related Articles