बलुचिस्तानमध्ये सात मजुरांची हत्या   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात रविवारी दहशतवाद्यांनी सात पंजाबी मजुरांची हत्या केली.पंजगूर शहरातील खुदा-ए-अबदान भागात घर बांधण्यासाठी हे कामगार काम करत होते. हे सर्व जण पंजाब प्रांतातील मुलतान जिल्ह्यातील रहिवासी असून हल्ल्याच्या वेळी ते दिवसभर काम करून एकाच छताखाली झोपले होते. 
 
यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. साजिद, शफीक, फैय्याज, इफ्तिखार, सलमान, खालिद आणि अल्लाह वसिया अशी मृतांची नावे आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारली नसली तरी पंजगूरचे एसएसपी फाजिल शाह बुखारी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.  ऑगस्ट महिन्यात या प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात बंडखोरांनी २३ जणांची हत्या केली होती.

Related Articles