लठ्ठपणामुळे मुलांमध्ये होणार्‍या आजारांचे निदान आता रक्तचाचणीतून   

नवी दिल्ली : मुलांमधील लठ्ठपणा आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या संबंधित आजारांचे निदान आता रक्तचाचणीतून करणे सोपे  होणार आहे. त्यामुळे पुढील गुंतागुंत टाळता येणार आहे. याबाबत नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ मधील आकडेवारी नुसार, जगभरात ५ ते १९ वयोगटातील ३९ कोटी मुले लठ्ठपणामुळे पीडित होती. अलीकडच्या काळात मुलांममधील लठ्ठपणाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. ते गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्यावर आता रामबाण उपचार करता येणार आहेत. रक्तवाहिन्यांमधील स्निग्ध पदार्थ हा चरबीचा सर्वसाधारण प्रकार आहे. तसेच स्निग्ध आम्ल शरीरात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे कोलेस्टेरॉल निर्माण करते. याबाबतचे संशोधन लंडन येथील किंग्ज महाविद्यालयाने केले आहे. 
 
याबाबतचे संशोधन ‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकात छापून आले आहे. संशोधनात लठ्ठ, जाड, सडपातळ अशा एकूण १ हजार मुलांच्या रक्ताचे नमुने तपासले. त्यात दिसून आले की, रक्तातील स्निग्ध पदार्थांचे अस्तित्व रक्तदाबाला तर कारणीभूत ठरते. मात्र स्निग्ध पदार्थांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होत नाही. ती अतिरिक्त कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होते. 
 
या आधी लठ्ठपणाच्या निदानासाठी रक्तातील स्ऩिग्ध पदार्थांचे नमुने गोळा करून चिकित्सा केली जात असे. ही प्रक्रिया किचकटही होती. मात्र संशोधनानुसार आता केवळ रक्ताच्या नमुन्यांआधारे कमी वेळात चिकित्सा करणे  सोपे झाले आहे. रक्ताच्या साध्या तपासणीतून लठ्ठपणाशी संबंधित मधुमेहासारख्या धोक्याचे मूल्यमापन करता येईल. यामुळे वेळीच पुढील धोका टाळता येणार आहे. लठ्ठपणावरील उपचार्‍यांदरम्यान नेमक्या शरीरातील हानिकारक स्निग्ध पदार्थांचे प्रमाण तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. संशोधनामुळे तेही सुलभ होणार आहे.

Related Articles