यूपीएच्या काळात नियोजनाअभावी देशाचे नुकसान : पंतप्रधान मोदी   

मेट्रोसह विविध प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन

पुणे : यूपीए सरकारकडे विकासाची दूरदृष्टी आणि नियोजन नव्हते. त्यामुळे देशाला आणि राज्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. आमच्या सरकारने ही कार्यपध्दती पूर्ण बदलली. त्यामुळेच शहरांचा चेहरामोहरा बदलत असून सुविधा आणि विकास प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचे भूमिपूजन, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक वसाहतीचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
 
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य उपस्थित होते. मोदी म्हणाले, या पूर्वीच्या सरकारच्या काळात शहरांचा विकास रखडला, विकास प्रकल्पांची कामे हाती घेतल्यास दिरंगाईचा सामना करावा लागत होता. निर्णय क्षमतेचा अभाव होता. त्यामुळे योजनांच्या फाइल वर्षानुवर्षे अडकून राहात असत. अशा कार्यपध्दतीमुळे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागले. देशात सर्वप्रथम पुणे शहरामध्ये मेट्रोची चर्चा २००८ मध्ये सुरु झाली. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात आमचे सरकार आल्यानंतर २०१६ मध्ये सुरु झाले. आता हे काम पूर्ण झाले आहे. शहराचा विस्तार वाढत आहे. त्याच पध्दतीने विकासाचा वेगसुध्दा आम्ही वाढवतो आहोत. पुण्यातील राहणीमानात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाले. लवकरच विमानसेवा  सुरु होणार आहे. त्यामुळे  विठ्ठल भक्तांना आणखी एक सुविधा निर्माण झाली. यामुळे व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल. 
 
ते पुढे म्हणाले, पुणे शहराला शहरी विकासाचे केंद्र बनवायचे आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता गतिमान सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे. पुण्याची गरज ओळखून पूर्वीपासून काम करायची गरज होती. 
 
परंतु दुर्दैवाने त्यावेळी दूरदृष्टी नसलेले सरकार होते. योजना चर्चेत अडकत होत्या. याचे नुकसान पुण्याला व देशाला भोगावे लागले. मेट्रो असो, बुलेट ट्रेन असो आम्ही तातडीने निर्णय घेतले. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बिडकीन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रासाठी जेवढ्या पायाभूत सुविधांची गरज आहे, तेवढीच प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यामध्ये महिला वर्गाला पुढे न्यायला हवे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पाहिली शाळा सुरू करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे स्मारक उभे राहत आहे. हे सामजिक चेतनेच्या जन आंदोलनाला प्रेरणा देईल. महिला सक्षमीकरणाच्या अभियानाला हे स्मारक प्रेरणा देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
 
कार्यक्रमास उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोर्‍हे, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मेट्रोचे व्यस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले उपस्थित होते.

Related Articles