काचेच्या कारखान्यात चार कामगारांचा मृत्यू   

येवलेवाडीतील दुर्घटना 

पुणे : येवलेवाडी येथील इंडिया ग्लास सोल्यूशन या काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने रविवारी भीषण अपघात झाला. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
 
पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३) आणि अमित शिवशंकर कुमार (वय २७, सर्व रा. येवलेवाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. या घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटना घडलेली इंडिया ग्लास सोल्यूशन ही कंपनी हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.
 
कोंढवा अग्निशमन दलाचे प्रमुख समीर शेख यांच्या माहितीनुसार, इंडिया ग्लास सोल्यूशन या कंपनीमध्ये कंटेनरमधून दहा फूट रूंद आणि सात फुट उंचीच्या काचा बाहेरून आणल्या होत्या. 
 
या काचा उतरवण्याचे काम कामगारांमार्फत सुरू होते. काम सुरू असताना कंटेनरमध्ये दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या काचा कंटेनरमध्येच पडल्या. यावेळी कामगार काचांखाली अडकले. या अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून क्रेन आणि रेस्क्यू उपकरणांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढले. 
 
सर्व कामगारांना तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, सहा कामगारांपैकी चार कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर, एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सुरक्षिततेबाबत उपाययोजना नाही 

वर्षभरापासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, अशा अनेक राज्यातून येवलेवाडी येथील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामगारांची भरती केली जात आहे. इंडिया ग्लास सोलूशन यासह चंदन ग्लास, सफायर ग्लास, भोरेखान ग्लास अशा छोट्या मोठ्या काचेच्या कंपन्या कोंढव्यातील येवलेवडी भागात कार्यरत आहेत. मात्र, या ठिकाणी कामगारांकडे हॅन्डग्लोज, शूज अशा कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने कामगारांचे बळी जात आहेत, असे नागरिकांनी म्हटले आहे. 

निम्म्या कंपन्यांकडे परवानाच नाही 

येवलेवाडी भागात अनेक कंपन्या आहेत. त्यामध्ये निम्म्यांहून अधिक कंपन्यांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंडिया ग्लास सोलूशन या काचेच्या कंपनीत आजची ही भयंकर दुर्घटना घडली. सदरील कामगारांबाबत कंपनीने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले आहे. 

Related Articles