राज्यासह पुण्यात चिकुनगुनियाच्या संसर्गात वाढ   

‘जिनोम सिक्वेंसिंग’ तपासणी करण्यात येणार

पुणे : राज्यासह पुण्यात चिकनगुनियाचा संसर्ग वाढत आहे.  रुग्णांमध्ये विषाणुमध्ये बदल होत असल्याने या विषाणूचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’(जनुकीय क्रमनिर्धारण) तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढत असून वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे विषाणूमध्ये बदल झाला आहे का याचा शोध घेण्यासाठी ‘जिनोम सिक्वेंसिंग’करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
 
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे. विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून रक्त नमुने घेण्यात येणार आहे. रुग्णालयांनी एका रुग्णांचे दोन रक्तनमुने घ्यावे. एक रक्तनमुना एनआयव्हीला तर दुसर्‍या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवावा, अशा सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. रक्तनमुन्यांच्या तपासणीतून योग्य निदान व्हावे यासाठी सरकट सर्व रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी न पाठवता गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे दिसून आल्यापासून पाच दिवसांच्या आत रक्तनमुने तपासणीसाठी पाठवावे, अशा सूचना आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.
 
महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, चिकनगुनियाविषयी राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचना शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पाठविण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रुग्णालयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
 
काही रुग्णांमध्ये तोंडावर, कानावर काळे चट्टे येणे या प्रकारची लक्षणे दिसून येत असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी राज्यात २००६, २०१०, २०१६ या कालावधीत चिकनगुनियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. तेव्हा देखील काही रुग्णांमध्ये शरीरावर काळे चट्टे आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दर पाच ते सहा वर्षांनी चिकनगुनियाची साथ येते. माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर या आजाराचा संसर्ग वाढतो असे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु यंदा वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून तपासणी अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे जिनोम सिक्वेंसिंग करून या विषाणूमध्ये बदल झाला आहे का? याचा शोध घेतला जाणार आहे.

आतापर्यंत ३ हजार २५९ रुग्णांची नोंद 

 
राज्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये चिकनगुनियाचा संसर्ग वाढत असून पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर या महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत चिकनगुनियाच्या ३ हजार २५९ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १४७० रुग्ण या चार महापालिका क्षेत्रांमधील आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दुपट्टीने वाढल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस जास्त झाला. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने यंदा शहारांमध्ये झिका, डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाचे यासारखे किटकजन्य आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या वर्षी २०२३ मध्ये चिकनगुनियाच्या १७०२ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा २१ सप्टेंबरपर्यंत ३२५९ रुग्ण आढळून आले आहेत. यंदा रुग्ण वाढीबरोबरच प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत असून काही रुग्णांमध्ये गुंतागुंत दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
 
चिकनगुनियाची आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आलेल्या रक्तनमुने जिनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी योग्य असतात. त्यामुळे रुग्णांचे रक्तनमुने एनआयव्ही आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालाकडे तपासणीसाठी पाठवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग

सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे  

जिल्हा रुग्ण
पुणे :         १९३
कोल्हापूर : २१९
अमरावती : १५६
अकोला :     १२९

सर्वाधिक रुग्ण असलेले मनपा क्षेत्र  

महापालिका     रुग्ण
पुणे :             २२७
नागपूर :         ७४१
कोल्हापूर :       १६४
मुंबई :             ३३८
 

Related Articles