पुरंदर विमानतळाची जागा लवकर ताब्यात घ्या : मुख्यमंत्री शिंदे   

पुणे : पुण्याजवळील पुरंदर विमानतळासाठी लागणारी जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी. यासाठी शेतकर्‍यांना चांगला मोबदला देवून काम मार्गी लावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
 
स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा मंच येथे विविध विकास प्रकल्पांची उद्घाटने आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपसभापती नीलम गोर्‍हे, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मेट्रोचे व्यस्थापकीय संचालक श्रवण हार्डिकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले  उपस्थित होते.
 
शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल २२ हजार कोटींची विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटने  होत आहेत. २८ सप्टेंबरला उद्घाटनाचा कार्यक्रम  पावसामुळे पुढे ढकलला. यावेळी उद्घाटन केले असते तरी विरोधकांना त्रास झाला असता. नाही केले तरी त्रास झाला. नागरिकांचा विचार करून हा कार्यक्रम पुढे घेण्यात आला होता. कोणतीही संकटे आली तरी पंतप्रधान मोदी विकासकामांना  ब्रेक लागू देत नाहीत. त्यामुळे तत्काळ हा कार्यक्रम घेण्यात आला.  जनता मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा प्रभाव वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न  कमी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळे वाढवणे ही काळाची गरज आहे. 
 
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर काही विकास प्रकल्पांना स्थगिती दिली.  आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा कामाला गती दिली.  महाविकास आघाडी सरकार आपल्याला मदत करणार नाही, असे उद्योजकांना वाटत असल्यामुळे राज्यात उद्योग बाहेर गेले होते. महायुतीचे सरकार सरकार आले आणि उद्योग परत येवू लागले. लाडकी बहिण योजनेचे १.९० कोटी बहिणींच्या खात्यात पैसे गेले. या योजनेसाठी पुढील वर्षाची अंदाजपत्रकामध्ये सुध्दा  व्यवस्था सरकारने केली आहे. योजना बंद पाडण्यासाठी विरोधक न्यायालयात गेले. मात्र काहीच झाला नाही.
 
यावेळी फडणवीस म्हणाले, वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा कार्यक्रम आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले  दाम्पत्यांनी सुरू केलेला वारसा पुढे न्यायचा हा कार्यक्रम आहे. मुलींना शिक्षण देण्याची पहिली शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. तो वारसा स्मृतीस्थळातून जपण्याचे भाग्य आम्हाला लाभले. हे स्मारक अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. समाजसुधारकांच्या अग्रभागी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. परवा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे गेला. अनेक जण छाती बडवत होते. त्यांच्या काळात मेट्रोचा एकही पिलर उभा राहिला नाही. सर्वाधिक वेगाने  काम झालेली ही देशातील पहिली मेट्रो आहे. स्वारगेट हे पहिले देशातील मल्टीमॉडेल स्टेशन आहे.  शहरातील कुठल्याही भागात मेट्रोने प्रवास करता येईल अशी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत.
 
यावेळी अजित पवार म्हणाले,   स्वारगेट येथील मेट्रो स्टेशन पाहिल्यावर अभिमान वाटेल असे काम झाले आहे. माजी खासदार अनिल शिरोळेंना वाटत होते मेट्रो भूमीगत व्हावी. मात्र खर्च पाहता यामधून मध्यम मार्ग काढण्यात आला. आता मेट्रोचे काम झाले आहे. विस्तार होणार आहे. पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे त्रास सहन करावा लागला. त्यांची सहनशक्ती संपत आली आहे. पण सुविधा निर्माण व्हावी यासाठी त्रास सहन करावा लागतो, असे ते म्हणाले.
 
राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, राज्यातील अकरा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. १० वर्षांत १० लाख कोटींची कामे केलीत. २०४७  पर्यंत देशात ४०० विमानतळ असतील. देशांतर्गत विमानसेवेत भारत जगात प्रथम असेल असा विश्वास आहे.
 
यावेळी भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या भिडे वाड्याच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन होत आहे याचा आनंद होत आहे. यासाठी वीस वर्षे लढा द्यावा लागला. अनेकांनी पुढाकार घेतला. अनेकांनी फुले दाम्पत्यांना एकाच समाजाने नाही, तर सर्वच समाजांनी विरोध केला. तसेच अनेक समाजांनी मदत केली.

पोलिसांनी बंदूक काय शोभेसाठी ठेवायची ?

बदलापूरमधील घटना घडल्यानंतर विरोधकांनी आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली होती. आता आरोपी चकमकीत मारला गेला, तर त्यांना आक्षेप आहे. विरोधक डबलढोलकीप्रमाणे वागत आहेत. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी काय करायचे. आता पोलिसांनी आरोपीला मारले तरी यांचे समाधान होत नाही. पोलिसांनी बंदूक काय शोभेसाठी ठेवायची का? असे शिंदे म्हणाले.
 

Related Articles