धूम्रपानामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका   

पुणे : तंबाखूमुळे फुप्फुसांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. तंबाखूचा परिणाम प्रत्येक पेशीवर होतो. आपल्या श्वसनलिका आणि फुप्फुसाच्या पेशी यावर देखील तंबाखूचा विशेषतः धूम्रपानाच्या धुराचा दुष्परिणाम होतो. ज्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो त्यापैकी ९० टक्के नागरिकांना धूम्रपान केल्याने या जीवघेण्या आपत्तीला सामोरे जावे लागते, असे निरीक्षण फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
 
धूम्रपान करणार्‍यांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही धुरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. धूम्रपानात अनेक जण फिल्टर, डबल फिल्टरचा वापर करतात. परंतु तरीही फिल्टरमधून सूक्ष्म कण खोलवर पोहोचून आतमध्ये फुप्फुसात कर्करोग निर्माण करतात. धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरच्या एमडी रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ ज्योती मेहता यांनी सांगितले. 
 
धूम्रपान सोडल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांच्या आत फुप्फुसांची क्षमता १० टक्क्यांपर्यंत सुधारते. त्यामुळे खोकला कमी होतो आणि सहजतेने श्वास घेता येतो. वयाच्या विशी-तिशीत धूम्रपान करण्याचा फुप्फुसांवरील परिणाम जाणवत नाही. परंतु भविष्यात वाढत्या वयानुसार फुफ्फुसांची क्षमता कमी होते. धूम्रपान सोडल्यानंतर २ ते १२ आठवड्यांच्या आत रक्ताभिसरण सुधारते. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू किंवा सिगरेटसारखे तंबाखूजन्य पदार्थ हे फुफ्फुसांचा कर्करोगास कारणीभूत ठरतात. एखादा धूम्रपान करत असेल तर त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या शरीरातही तो धूर जात असतो. 

Related Articles